Skip to main content
x

कदम, बाबूराव शंकर

             नस्पती आनुवंशशास्त्रातील मूलभूत संशोधनाचा पाया रचणार्‍या डॉ. बाबूराव शंकर कदम यांचा जन्म गुजरात राज्यातील धामनगर येथे झाला. १९४० मध्ये त्यांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून कोशिका व वनस्पती आनुवंशशास्त्रात पीएच.डी.ची पदवी संपादन केली. १९३०-४२ या कालावधीत मुंबई राज्याचे पीक वनस्पतिशास्त्रज्ञ व नंतर १९४२ ते ४४ या काळात संशोधन उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात १९४४-४५ या वर्षासाठी साहाय्यक कृषि-आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली. नंतरच्या काळात त्यांनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी उच्चपदे भूषवली. त्यामध्ये १९४७-५४ या काळात संचालक, तंबाखू संशोधन संस्था, राजमहेंद्री; १९५४-५६ या काळात कृषि-संचालक, सौराष्ट्र; १९५७-५८ या काळात कृषि-विस्तारआयुक्त, नवी दिल्ली; १९५८-६० या काळात सहसंचालक, मुंबई राज्य आणि १९६०-६२ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे कृषी व उच्चशिक्षण संचालक म्हणून त्यांनी काम केले.

             प्रशासकीय कामाबरोबरच त्यांनी संशोधन कार्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवला. भात, गहू, बाजरी व तंबाखू अशा विविध पिकांवर संशोधन करून त्यांनी विशेष गुणवत्ता असलेले सरसवाण विकसित केले. रामैय्या यांच्या सहकार्याने त्यांनी भातामधील जनुकांच्या नामकरणाची पद्धत विकसित केली. हीच पद्धत सध्या जगभर वापरली जाते. गव्हाच्या काळ्या-तपकिरी व पांढर्‍या कुसळातील आनुवंशिक संबंध सर्वप्रथम प्रस्थापित करण्याचा मान डॉ. कदम यांच्याकडेच जातो. भारतीय, अमेरिकन व जपानी भाताच्या वाणातील अंथोसायनीन रंगाचे प्रकार ठरवण्याच्या कामाबद्दल ते सर्वपरिचित होते. त्यांच्या तंबाखू पिकाच्या संशोधनातून चार नवीन लिंकेज ग्रूप्स व २० नवीन जनुकांचा शोध लागला. तसेच, तंबाखूच्या पानांच्या आकाराचे त्यांनी आनुवंशशास्त्रदृष्ट्या विवरण केले. या त्यांच्या संशोधनकार्याचा सन्मान म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १९८२ साली 'डॉक्टर ऑफ सायन्स' या पदवीने त्यांना सन्मानित केले.

             डॉ. बाबुराव कदम यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अनेक शास्त्रीय मंडळांवर तज्ज्ञ म्हणून काम केले. १९६१-६३ या कालावधीसाठी इन्सा (INSA) चे ते सभासद होते. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंगचे संस्थापक व १९५० मध्ये अध्यक्षही होते.

     - संपादित

कदम, बाबूराव शंकर