Skip to main content
x

कदम, ज्योत्स्ना संभाजी

          क सर्जनशील व मनस्वी चित्रकर्ती असणाऱ्या ज्योत्स्ना संभाजी कदम यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर येथे झाला. आईचे नाव कुमुदिनी. पूर्वाश्रमीच्या ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी यांचे शालेय शिक्षण बदलापूरमध्येच झाले. त्या १९७४ मध्ये एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्या. बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. बदलापूरला सह्याद्रीच्या सान्निध्यातच त्यांचे लहानपण गेल्याने सह्याद्रीनेच त्यांना चित्रप्रेरणा दिली. चित्रकलेकडे त्यांचा कल असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी १९७५ मध्ये मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला. निसर्गाच्या साक्षीने विकसित झालेल्या चित्रकलेला शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची जोड मिळाली.  त्या १९७९ मध्ये रंग व रेखाकला विभागाची ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पुढे त्यांनी १९८० मध्ये ‘आर्ट मास्टर’ची पदविकाही प्राप्त केली. त्याच काळात योगायोगाने ज्येष्ठ व्यक्तिचित्रकार, सौंदर्यमीमांसक व जे.जे. स्कूलचे अधिष्ठाता असलेले प्रा. संभाजी कदम त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांच्या कलाजीवनाला वेगळीच कलाटणी मिळून प्रगल्भताही लाभली. त्या संभाजी कदम यांच्याशी १९८२ मध्ये विवाहबद्ध झाल्या.

          ज्योत्स्ना कदम यांचे व्यक्तिचित्रणाबरोबरच अमूर्त शैलीतल्या चित्रांवरही प्रभुत्व आहे. त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनासाठी पाठविलेल्या व्यक्तिचित्राला १९८५ साली पारितोषिक मिळाले. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनांत त्यांनी पाठविलेल्या रंगचित्राला १९८८, १९९० व १९९३ मध्ये तर महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात १९९५, १९९७ व २००० मध्ये त्यांना राज्य पुरस्कार मिळालेे. विजू सडवेलकर: ‘वुमन आर्टिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या त्या १९९९ साली मानकरी ठरल्या. भारत सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाची ‘सीनियर आर्टिस्ट’ फेलोशिपही त्यांना २००० ते २००२ या वर्षांसाठी प्राप्त झाली होती.

          सह्याद्री चित्रमालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला ज्योत्स्ना कदम यांचा चित्रप्रवास व्यक्तिचित्रण आणि आता अमूर्त चित्रशैलीपर्यंत झालेला असून तो सर्जनशीलतेची ग्वाही देणारा आहे. आता तर त्या रंग, रेषा आणि आकार यांच्या साहाय्याने ‘दृश्यचित्र’ साकारतात, ज्याला त्या ‘दृश्यभाषा’ म्हणतात. या दृश्यभाषेतूनच त्या कलारसिकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. अशा काही चित्रांची प्रदर्शने त्यांनी विविध ठिकाणी भरवली. सुरुवातीला संभाजी कदमांच्या समवेत त्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे ‘एकल’ प्रदर्शने भरवली. त्यांत जहांगीर कला दालन, मुंबई (२००४, २००९), नेहरू कला दालन, वरळी (२००३), आर्टिस्ट सेंटर, काळा घोडा (२००८) अशा विविध कला दालनांचा समावेश आहे. त्यांची चित्रे देश-परदेशांत, विविध ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक कलासंग्रहांत संग्रहित करण्यात आली आहेत. दिल्ली, भोपाळ, रायपूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये ज्योत्स्ना कदमांनी सहभाग घेतलेला आहे.

          चित्रणाबरोबरच ज्योत्स्ना कदमांचे लेखनावरही प्रभुत्व आहे. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ऋतुरंग’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’ यांमध्ये त्यांनी चित्रकलेबरोबरच ललित लेखनही केलेले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये  चित्रकार के.के. हेब्बर, बी. प्रभा, आबालाल रहिमान, विनायक मसोजी, बा.द. शिरगांवकर, माधव सातवळेकर, संभाजी कदम, प्रल्हाद अनंत धोंड, नागेश साबण्णवार, देवदत्त पाडेकर, श्रीकांत जाधव अशा अनेक चित्रकारांवर त्यांनी लेखन केलेले आहे. याशिवाय निसर्गावर आधारित ललित लेखन केलेले आहे. मराठी विश्‍वकोशात कलाविषयक नोंदींचे लेखन त्यांनी केले असून ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात, तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या लेखांचा समावेश झालेला आहे. 

          मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी त्यांनी चित्रकलाविषयक व्याख्याने दिली व चर्चासत्रांतसुद्धा सहभाग घेतला. आकाशवाणी व चित्रवाहिन्यांवर त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत.

          जे.जे. स्कूलचे माजी अधिष्ठाता व त्यांचे पती  संभाजी कदम यांच्या सतरा-अठरा वर्षांच्या सहजीवनावर आधारित ज्योत्स्ना कदम यांनी ‘सर आणि मी’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. या पुस्तकाला २०१० मध्ये ‘भैरू रतन दमाणी’ साहित्य पुरस्कार व २०११ साली ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार मिळाला.

          या आत्मकथनपर लेखनातून एका सर्जनशील व मनस्वी चित्रकर्तीचे अंतरंग उलगडत जाते.

-https://youtu.be/w-b7GCJyCaM/node/3438/edit

कदम, ज्योत्स्ना संभाजी