Skip to main content
x

केली, पॅट्रिक

       पॅट्रिक केली हे मुंबईमधील अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जात असत. कायदा अमलात आणताना जुलूम-जबरदस्ती करू नये आणि शक्यतोे लाठीचा वापर टाळावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती. पोलीस अधिकार्‍याने पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे काम केले, तर ते लोकांच्या विश्वासास नक्कीच पात्र ठरतात, असे सर केली मानत असत. त्यामुळेच महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीच्या काळात आणि तसेच केली यांच्या कार्यकालात निर्माण झालेल्या जातीय तणावांच्या पार्श्वभूमीवरदेखील त्यांना सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि पाठिंबा प्राप्त झाला हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

      मुंबईच्या पोलीस पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी मुख्यत्वे दोन कामे स्वीकारली. पहिले काम म्हणजे पठाण टोळीचे पारिपत्य करणे. त्या वेळी या पठाण टोळ्यांनी अनेक ठिकाणी दरोडे, खून, लुटालुट करून दहशत निर्माण केली होती. सर केली यांनी स्वीकारलेले दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे कापसाच्या सट्टेबाजीवर नियंत्रण निर्माण करणे. हे काम मात्र ते तडीस नेऊ शकले नाहीत. पण पठाण टोळ्यांचा मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला. पठाण लुटारूंवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांनी वायव्य प्रांतातील अधिकार्‍यांची मदत घेतली. या अधिकार्‍यांकडून त्यांनी पठाणांचे मानसशास्त्रही जाणून घेतले. त्यांनी पठाणांना देवाची भीती दाखवली. पठाणांसारख्या लढाऊ जमातीवर अशा प्रकारे वचक निर्माण करणे हे अत्यंत कठीण काम होते.

       डिसेंबर १९३२मध्ये मुंबई शहर पोलिसांचा मोटार ट्रान्सपोर्ट विभाग सुरू करण्यात आला आणि घोडेस्वार दल विभाग पूर्णपणे रद्द करण्यात आला त्या वेळेस सर केली यांनी मोटारकारच्या युगातही घोडेस्वार दलातील पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात हे सरकारला पटवून दिले. अजूनही  जगातल्या सर्वोत्तम पोलीस दलांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी घोडदळांचा समावेश केला जातो.

       ५फेब्रुवारी१९२९ या दिवशी पठाणांच्या एका टोळीने पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. हल्लेखोर पठाण समोर दिसेल त्याच्यावर तुटून पडत होते. एका पोलीस शिपायाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असताना सर केली यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले. या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल त्यांना १९२१ मध्ये किंग्ज पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. लोकांच्या मनांत त्यांच्याविषयी अत्यंत आदराची भावना होती. सर केली निवृत्त झाले तेव्हा मुंबईतील जनतेने उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन त्यांचा पुतळा मुंबईच्या पोलीस मुख्यालयासमोरील चौकात उभा केला होता. सध्या तो पुतळा क्रॉफर्ड मार्केट येथील संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे.

        - संपादित

केली, पॅट्रिक