Skip to main content
x

केळकर, रघुनाथ बाळकृष्ण

चित्रकार व व्यंगचित्रकार

गेल्या शतकाच्या तिसर्या दशकात म्हणजे मराठी व्यंगचित्रांच्या अगदी सुरुवातीच्या काळात सामाजिक जाणिवेतून तत्कालीन घटनांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे काढणारे र.बा. केळकर कदाचित पहिलेच व्यंगचित्रकार असावेत. आपल्या व्यंगचित्रांमधून कम्युनिझमच्या अंगाने ज्ञानेश्वरांचे विश्वकुटुंबाचे तत्त्व प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न असतो, असे ते सांगत.

रघुनाथ बाळकृष्ण केळकर यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण अंमळनेर येथे झाले. त्यांचे  वडील फौजदार होते, व घरात सांस्कृतिक वातावरण होते. घरी येणार्या पंचमासिकातील चित्रे ते कुतूहलाने पाहत असत. पंचहे त्या काळी ब्रिटनमध्ये प्रसिद्ध होणारे विनोदाला वाहिलेले प्रसिद्ध नियतकालिक होते. शाळेत साने गुरुजी हे त्यांचे गुरू होते. त्यांनी हस्तलिखितासाठी चित्रे काढायला केळकरांना खूप प्रोत्साहन दिले.

शं.वा. किर्लोस्कर यांनी केळकरांचे काम पाहून त्यांना किर्लोस्करमासिकात चित्रकार म्हणून नोकरी दिली. त्यांचे पहिले चित्र १९२९ साली किर्लोस्करमध्ये छापून आले. पुढे स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू झाल्याने ते पुन्हा अंमळनेरला साने गुरुजींकडे आले. गुरुजींच्या सल्ल्यानुसार त्यांनी सभांसाठी व्यंगचित्रात्मक भित्तिचित्रे काढायला सुरुवात केली. ती पाहून दहा व्याख्याने म्हणजे एक व्यंगचित्र’, असा अभिप्राय साने गुरुजींनी दिला.

नागपूरच्या उद्यममासिकाने १९३० साली व्यंगचित्रांची स्पर्धा घेतली, त्यात त्यांना पहिले बक्षीस मिळाले. तेव्हापासून पुढची अठरा वर्षे ते उद्यम मासिकासाठी व्यंगचित्रे काढत होते. हैद्राबादचा संग्रम, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, हिटलर वगैरे तत्कालीन विषय त्यांच्या व्यंगचित्रांतून उमटत असत. एकदा अंमळनेर स्टेशनवर गांधीजी येणार म्हटल्यावर केळकरांनी त्यांच्यासमोर त्यांचे चित्र काढून दाखवले होते.

दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील महागाई, टंचाई, दुष्काळ, विविध प्रकारच्या करांनी गांजलेली गरीब जनता वगैरे विषय त्यांच्या चित्रांतून प्रकर्षाने उमटलेले दिसतात. विशेषत: भारतीय शेतकर्याच्या तेव्हाच्या (व आजच्याही) अवस्थेवरचे त्यांचे चित्र अत्यंत प्रभावी आहे. शेतकर्यावर लादलेल्या सर्व करांनी त्याला साखळदंडांनी जखडून टाकलेले आहे व ते तोडले तर मी सर्वांना पुरेल एवढी धान्यनिर्मिती करेनहे त्याचे उद्गार, असे हे चित्र. व्यंगचित्र-कलेचा स्वयंअभ्यास करण्या-साठी, माणसांचे नमुने पाहण्यासाठी ते न्यायालयात व रुग्णालयात जाऊन विविध चेहर्यांचा अभ्यास करायचे.

काकासाहेब खाडिलकरांच्या नवाकाळमध्येही त्यांनी अनेक राजकीय व्यंगचित्रे राम, के. रघुनाथ, रबाके इत्यादी नावांनी काढली. आशयाच्या दृष्टीने यांतील अनेक व्यंगचित्रे प्रभावी भाष्य करणारी व भेदक होती. एका व्यंगचित्रात त्यांनी महायुद्धाच्या हिंसाचाराच्या ज्वाळांत हिटलर होरपळून मरेल असे भाकीत केले होते. त्या वेळी ते भयंकर वाटले तरी तेच पुढे खरे ठरले. या चित्राचे पेंटिंग करून त्यांनी ते ब्रिटनमधील विख्यात व्यंगचित्रकार डेव्हिड लोयांना पाठवले. लो यांच्याशी त्यांचा पुढे खूप पत्रव्यवहारही झाला. साने गुरुजींच्या मृत्यूनंतर त्यांनी व्यंगचित्र काढणे थांबवले असले तरी लहान मुलांसाठी त्यांनी भरपूर गोष्टी लिहिल्या.

त्यांनी सेनापती बापट व महर्षी कर्वे यांची समोर बसून केलेली व्यक्तिचित्र लेनिनग्राडच्या संग्रहालयात आहेत. नगरमध्ये त्यांनी प्रगत कला महाविद्यालयाची स्थापना केली. व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रण या सोबतच त्याचा पाया असणारे रेखांकन (स्केचिंग) हे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे ते आवर्जून सांगत. नगर परिसरातील अनेक चित्रकारांना त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले, तसेच त्या भागात दृश्यकलेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले. सुप्रसिद्घ समकालीन भारतीय चित्रकार एस.एच. रझा त्यांना परदेशातून भारतात आल्यावर आवर्जून जाऊन भेटत.

दीर्घायुषी, उत्तम स्मरणशक्ती असलेले, बाहत्तराव्या वर्षी बंगाली भाषा शिकलेले, ज्ञानेश्वरांचा विश्वकुटुंब-वादाचा विचार साम्यवादाच्या अंगाने करणारे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे र. बा. केळकर ‘‘मी माझा ब्रश देशासाठी वापरला,’’ असे नेहमी म्हणत आणि ते खरेच आहे.

- प्रशांत कुळकर्णी