Skip to main content
x

कल्याणपूर, सुमन रमाकांत

सुमन रमाकांत कल्याणपूर या मराठी चित्रपटगीते आणि भावगीतांच्या आघाडीच्या गायिका आहेत. आपल्या मधुर आवाजामुळे त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. त्यांचा जन्म बंगालमध्ये कोलकाता (भवानीपूर) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव हेमाडी, तर आईचे नाव सीताबाई. हेमाडी  हे चित्रापूर-सारस्वत ज्ञातीचे; अतिशय सुसंस्कृत, घरंदाज, साहित्यप्रेमी आणि संगीतप्रेमी असे कुटुंब होते.
सुमन हेमाडी यांचे वडील सेन्ट्रल बँकेमध्ये मोठे अधिकारी होते. त्या लहानपणी बंगाली भाषा उत्तम बोलत. त्यांनी गाणे आणि भरतकाम यांची प्रेरणा
  आपल्या आईकडून घेतली. पुढे त्यांच्या वडिलांची बदली ढाका येथे झाली. सुमन सेंट झेवियर्स कॉन्व्हेंटमध्ये शिकू लागल्या. त्यांना शाळेत आवडणारी एकमेव गोष्ट म्हणजे शाळेमधील मोठा पियानो. संधी मिळाल्यास त्या कधीकधी पियानोवर बोटे फिरवीत.
सुमन यांच्या शालेय शिक्षणाच्या काळात ढाक्यात दंगे होत. वातावरण अतिशय अस्थिर आणि असुरक्षित असे. त्यांचे वडील स्वभावाने अतिशय दयाळू होते. ढाक्यात दंग्याच्या वेळी बाजारातून तांदूळ गायब होई. अशा वेळी घरातील मोठमोठ्या साठवणीच्या भांड्यांतील तांदूळ त्यांचे वडील गोरगरिबांना व गरजूंना वाटत असत. याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाचे आणि स्वातंत्र्याचे वारे वाहत होते; त्यामुळे बहुधा १९४२-४३ साली हेमाडी कुटुंबीय मुंबईला आले.
मुंबईला त्यांचे वास्तव्य मॉडेल हाउस येथे होते.
  त्यांच्या बिल्डिंगमध्ये सुप्रसिद्ध शिल्पकार जोग, तसेच सुप्रसिद्ध संगीतकार केशवराव भोळे राहत. शिल्पकार जोगांकडे सुमन हेमाडी तासनतास  त्यांचे काम पाहत बसत. त्यांनी शिकविलेल्या आकृत्या काढणे, ड्रॉइंग काढणे यांत सुमनचा बराच वेळ जात असे.
मुंबईला आल्यावर सुमन हेमाडी यांचे शिक्षण सेंट कोलंबा या शाळेत दुसरीपासून झाले. त्या काळी जनमानसावर चित्रपटाचा मोठा पगडा होता. घरात नभोवाणी ऐकणे ही एकमेव करमणूक असे. हेमाड्यांंच्या घरी रेडिओ ऐकण्याला परवानगी होती. त्यामुळे सुमन यांना अशोककुमार, देविकाराणी, सुरैया, नूरजहाँ यांची गाणी म्हणायला गंमत वाटे. गजाननराव वाटव्यांची गाणीही त्या ऐकत असत.
याच काळात केशवराव भोळ्यांच्या पत्नी नामवंत अभिनेत्री व गायिका ज्योत्स्नाबाई भोळे यांचे देखणे रूप आणि सुरेल गाणे यांचा सुमन यांच्या मनावर सुरेल संस्कार झाला. केशवराव भोळे यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांनी तानपुरा कसा लावायचा, 
शब्दोच्चार कसे करावेत, ऱ्हस्व-दीर्घोच्चाराचे भान कसे ठेवावे, स्वर आणि शब्द न तोडता गाणे सहज कसे म्हणावे, भावगीतात भावनाप्रधान गाणे कसे म्हणावे हेही सुमन यांना शिकविले.
सुमन हेमाडी या १३-१४ वर्षांच्या असताना केशवराव भोळ्यांनी त्यांच्यासाठी दोन गाणी स्वरबद्ध केली होती. ती त्यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर म्हटली होती. सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्या गाण्याच्या क्लासमध्ये त्या तीन-चार महिने गायन शिकल्या.
मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे म्हणत. एका वर्षी स्नेहसंमेलनाचा प्रयोग खूप चांगला बसला होता. त्यानंतर तोच कार्यक्रम पुन्हा डोंबिवलीला आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक तलत महमूद आले होते. त्यांनी सुमन यांचे गाणे ऐकून खूप कौतुक केले, तसेच एच.एम.व्ही. कंपनीकडे सुमनच्या आवाजाची शिफारस केली; परंतु त्या वेळी एच.एम.व्ही.ने त्यांचे गाणे ध्वनिमुद्रित केले नाही.
सुमन हेमाडी यांचे पहिले पार्श्वगायन ‘शुक्राची चांदणी’ या चित्रपटासाठी झाले. शिल्पकार जोग यांच्या नातेवाइकांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. परंतु या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी हिंदीमधील प्रसिद्ध संगीतकार मुहम्मद शफी यांनी सुमनना ऐकले आणि १९५४ साली ‘मंगू’ नावाच्या हिंदी चित्रपटात त्यांना पार्श्वगायनाची संधी दिली. त्यानंतर त्यांचा हिंदीमधील पार्श्वगायनाचा प्रवास सुरू झाला आणि गाण्याची ओढ वाढली.
सुमन हेमाडी यांचा गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश झाला, तेव्हा त्यांची मुळाक्षरे केशवराव भोळे यांंनी पक्की करून घेतली होती. त्यानंतर तावडेबुवा हे त्यांचे गायन शिक्षक होते. त्यानंतर मास्टर नवरंग नागपूरकरांकडे त्या शिकत होत्या. पुढे त्या उस्ताद अब्दुल रहमान यांच्याकडे शिकू लागल्या.
सुमन यांचा मराठी चित्रपटात पार्श्वगायनाचा प्रवास साधारण १९५५-५६ पासून सुरू झाला. ‘देवघर’ या चित्रपटात त्या प्रथमच संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे गायल्या. सुधीर फडके यांनी १९५७ सालचा ‘घरचं झालं थोडं’
  तसेच १९६१ सालचा ‘निरुपमा’ आणि ‘परीराणी’ या दोन्ही चित्रपटांतील सगळी गाणी सुमन हेमाडी यांच्याकडून गाऊन घेतली.
सुमन यांनी मराठी चित्रपटांत शेकडो गाणी म्हटली आहेत. मराठीतील नामवंत संगीतकार वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई, यशवंत देव, दत्ता डावजेकर, राम कदम, बाळ पळसुले, राम वढावकर, हेमंत केदार, के. दत्ता, मुहम्मद शफी, शंकरराव कुलकर्णी, विश्वनाथ मोरे, अविनाश व्यास, आदिल अहमद, एन. दत्ता, प्रभाकर जोग, श्रीनिवास खळे या संगीतकारांसाठी त्या विविध प्रकार गायल्या आहेत. त्यांची काही गाजलेली चित्रपटगीते : ‘देवा दया तुझी की शुद्ध दैव लीला’ (चित्रपट : बोलकी बाहुली, संगीतकार : श्रीनिवास खळे), ‘जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते’ (चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा), ‘उमलली एक नवी भावना’, ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ (सोबत सुधीर फडके, चित्रपट : सुभद्राहरण, संगीत : वसंत पवार), ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर’ हे बहिणाबाईंचे अजरामर काव्य (चित्रपट : मानिनी, संगीतकार : वसंत पवार). अशा प्रकारे सुमन हेमाडी यांचा हिंदी, मराठी व इतर भाषांतील गीतांचा आलेख वर चढत होता. साठच्या दशकात त्या विवाहबद्ध झाल्या. पूर्वीच्या सुमन हेमाडी आता सुमन कल्याणपूर झाल्या. नंदाशेठ (रमाकांत) कल्याणपूर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कन्या चारूलचे उत्तम संगोपन करून सुमन कल्याणपूर पुन्हा नवीन गाणी गात होत्या. त्यांतील काही उल्लेखनीय गाणी अशी : ‘गेला सोडूनी मजसी कान्हा’, ‘कशी करू स्वागता’, ‘असे हे जगाचे चक्र फिरे बाळा’, ‘कशी गवळण राधा बावरली’. त्यांचे
  १९७७ सालच्या ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही’ हे हळुवार अंगाईगीत आहे. या गीताचे संगीतकार होते एन. दत्ता.
सुमन कल्याणपूर यांनी भारतातील तेरा विविध भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. महाराष्ट्र, गुजरात व ओरिसा राज्य सरकारांचे उत्कृष्ट पार्श्वगायनाचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. पार्श्वगायिकांमध्ये परदेशांत कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यांनी १९६९ आणि १९७१ मध्ये ब्रिटीश गयाना, सूरीनाम, त्रिनिदाद व अमेरिका या देशांचा दौरा केला.
सुमन कल्याणपूर यांनी १९८१ साली चित्रपटांसाठी गाणे थांबविले. चित्रपटसंगीत आणि चित्रपटांचे
  प्रवाह बदलत होते. त्यानंतर त्यांनी देशोदेशीचा प्रवास केला. त्यांच्या चित्रपटगीतांइतकीच भावगीतांची कारकीर्दसुद्धा समृद्ध आहे. वसंत प्रभू, दशरथ पुजारी, सुधीर फडके, विश्वनाथ मोरे, अशोक पत्की, श्रीनिवास खळे इत्यादी संगीतकारांकडे त्यांनी गायलेली अनेक भावगीते गाजलेली आहेत. सुरुवातीच्या काळात दशरथ पुजारी यांनी काव्यांना चाली लावाव्यात, सुमन कल्याणपूर यांनी ती गीते गावीत आणि त्या भावगीतांना उदंड लोकप्रियता लाभावी हे साधारण एका तपापेक्षा जास्त काळ सुरू होते.
दशरथ पुजारी यांच्याकडे सुमन कल्याणपूर साधारणत: ४० गाणी गायल्या आहेत, त्यांपैकी जवळजवळ २५ भावगीते असावीत. ‘असावे घर ते अपुले छान’, ‘आस आहे अंतरी या उर्मिला मी निरोप तुज देता’, ‘जुळल्या सुरेल तारा’, ‘ते नयन बोलले काहीतरी’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’, ‘मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे’ (सोबत दशरथ पुजारी), ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावली’; वसंत प्रभूंकडे ‘दिन रात तुला मी किती स्मरू’, ‘हले हा नंदाघरी पाळणा’, ‘पिवळी पिवळी हळद लागली’; ‘शब्द शब्द जपुनी ठेव, बकुळीच्या फुलापरी’ या सुंदर भावगीताला विश्वनाथ मोेरे यांचे संगीत आहे. ‘मी चंचल होऊन आले’, ‘जादू अशी घडे ही या दोन लोचनांची’ (सोबत अरुण दाते) ही संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे गायलेली गाणी; ‘कुणी निंदावे वा वंदावे’, ‘नाविका रे वारा वाहे’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’ ही अशोक पत्की यांच्याकडे गायलेली काही भावगीते. सुरुवातीच्या काळात जसे दशरथ पुजारी चाल बांधत आणि सुमन कल्याणपूर त्यांच्या गोड गळ्याने गाऊन ती लोकप्रिय करीत, त्याचप्रमाणे सत्तरच्या दशकात अशोक पत्की उत्तमोत्तम काव्यांना चाली लावून त्या सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेत व त्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठत.
दशरथ पुजारी यांनी ‘अजून त्या झुडुपांच्या मागे’ या आपल्या आत्मचरित्रात सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांविषयी अतिशय मार्मिकपणे लिहिलेले आहे : ‘सुमन कल्याणपूर यांचा आवाज गोड तर आहेच; पण त्यामध्ये भाव प्रकट करण्याची एक महान शक्ती आहे व त्या गाताना इतक्या तल्लीन होऊन गात असत, की त्यांचं लक्ष तेव्हा आजूबाजूला कुठेही नसायचं - फक्त त्या गाण्यामध्ये, त्या स्वरांमध्ये. त्यांनी गायिलेली सर्व गाणी अप्रतिम आहेत. शब्दावर कुठे जोर द्यायचा, कुठे हलकेच म्हणायचा याबद्दल त्यांच्या मनातल्या कल्पना पक्क्या आहेत.’ या साऱ्या गुणांमुळे सुमन कल्याणपूर यांची सगळी भावगीते आजही लोकप्रिय आहेत.
सूर सिंगार संसद पुरस्कार, २००९ साली महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार', ग. दि. मा. प्रतिष्ठानचा पुरस्कार असे सन्मान सुमन कल्याणपूर यांना मिळाले .

अद्वैत धर्माधिकारी / आर्या जोशी

 

कल्याणपूर, सुमन रमाकांत