Skip to main content
x

कोमकली, शिवपुत्र सिद्धरामैया

कुमार गंधर्व

    शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली यांचा जन्म कर्नाटकातील सुळेभावी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव गुरुशुद्धौवा होते. वडील सिद्धरामैया हे अब्दुल करीम खाँसाहेब यांचे खास प्रेमी व प्रसिद्ध गायक पंचाक्षरीबुवा यांचे मित्र होते व ते स्वतःही गात असत. घरात गाण्याची ध्वनिमुद्रिका लावली असताना अचानक शिवपुत्र यांनी ते गाणे गायला सुरुवात केली. ते गाणे त्यातील गायकीसकट शिवपुत्र बिनचूक गात असल्यामुळे घरातील सर्व जण आश्चर्यचकित झाले.
गुलबर्ग्याचे पूज्य गुरू मठकल शांतिवीर महास्वामी नेगिनहाळ येथे आले असता, त्यांच्या पाद्यपूजेच्या कार्यक्रमाच्या वेळी शिवपुत्र गायले. तेथे माघ पौर्णिमेच्या वेळी बागेवाडी येथे पब्लिक थिएटरमध्ये त्यांचे गाणे ऐकूण पूज्य स्वामीजींनी १९३२ साली शिवपुत्रांना ‘कुमार गंधर्व’ ही पदवी बहाल करून त्यांचा  सन्मान केला. कुमारांची सांगीतिक प्रगती व्हावी म्हणून सिद्धरामैया त्यांना घेऊन बेळगावमध्ये राहू लागले. त्यांच्या तबलासाथीस प्रसिद्ध तबलावादक महबूब खाँ मिळाले. बेळगावच्या शिवानंद थिएटरमध्ये अनेक कार्यक्रम झाले. ‘कुमार गंधर्व अ‍ॅण्ड पार्टी’चे १९३१ ते १९३५ या काळात उत्तर भारतात अनेक कार्यक्रम झाले. कुमारांनी १९३५ मध्ये अलाहाबाद, कलकत्ता व मुंबई येथे अखिल भारतीय संगीत सभा, परिषदा गाजवल्या व संपूर्ण भारतात ‘कुमार गंधर्व’ या नावाचा दबदबा निर्माण झाला.
शंकरराव बोडसांच्या सांगण्यानुसार १९३५ पासून कुमार गंधर्वांनी मुंबई येथे प्रा. बा. र. देवधर यांच्याकडे राहून, गुरूकुल पद्धतीने शिक्षण घेण्यास आरंभ केला. तेव्हा कुमारांना कानडीशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. शालेय शिक्षणाला रामराम ठोकलेला, तेव्हा ते
  गुरुपत्नीकडून मराठी लिहायला व वाचायला शिकले. गुरुवर्य देवधरांकडे शिक्षण चालू होते, तसेच इतर विद्यार्थ्यांना शिकविण्याचेही काम ते करत होते. सर्व मोठे कलाकार मुंबईभेटीत या ‘स्कूल’मध्ये आल्याशिवाय राहत नसत व ते आपल्याजवळील विद्या कुमार गंधर्वांना देण्यास आतुर असत. देवधरांनी पं. भातखंड्यांची सर्व ग्रंथसंपदा कुमारांकडून वाचून घेतली, त्यावर चर्चा केली आणि समजावून सांगितले तसेच स्वरलेखनाचा सरावही करून घेतला. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकवून त्यांतील ग्रह्य-अग्रह्य कुमारांना समजावून सांगितले. अंजनीबाई मालपेकर, विलायत हुसेन खाँ, वाजिद हुसेन खाँ इ. अनेक कलाकारांकडूनही देवधरांच्याच सांगण्यानुसार कुमारांनी मार्गदर्शन घेतले.
कुमारांनी १९४७ साली भानुमती कंस यांच्याशी विवाह झाल्यावर स्वतंत्र बिऱ्हाड केले. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना क्षयाचा आजार झाला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुमारांनी देवासला कायमचे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला.

ते प्रदीर्घ काळ अंथरुणावर विश्रांती घेत होते व  त्यांना गाण्यास बंदी होती. या आपत्तीचे रूपांतर संगीतावरील चिंतन करून सुसंधीमध्ये करणे ही कुमारांची महत्ता आहे. अंथरुणावर पडल्यापडल्याच कानांवर पडणाऱ्या लोकसंगीताकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. रागसंगीताची बीजे त्यांना लोकसंगीतात सापडू लागली. लोकसंगीतातील सुंदर बीजांचे परिष्करण करून काही नवीन रागरूपे कुमारांच्या मनामध्ये आकार धरू लागली. लोकसंगीतातील स्वरांच्या दर्जाच्या परिणामाचा अभिव्यक्तीसाठी उपयोग होतो हे त्यांनी शोधले.
याच काळात निर्गुण (नाथपंथीय) संगीतही त्यांच्या कानांवर पडले. देवासला शीलनाथ महाराजांचे वास्तव्य १९२१ पर्यंत होते. त्यामुळे नंतरही तेथील धुनीसंस्थानात नाथपंथीयांचे मोठ्या प्रमाणावर येणे-जाणे होते. एकांतातून व्यक्त होणारे त्यांचे संगीत वेगळी सृष्टी निर्माण करते हे कुमारांना जाणवले. निर्गुणी भजने हाती पडल्यावर संगीतकाराच्या नजरेतून त्यातील सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे, तसेच मैफलीत भजनांना स्थान देण्याचे योगदान कुमारांकडून घडले. कुमार गंधर्व पं.विष्णू दिगंबरांच्या परंपरेतील असल्याने त्यांच्यावर भजनाचे संस्कार होतेच. त्यामध्ये पुढे खोल अवगाहन करून कबीर, सुरदास, मीरा, तुलसीदास, चंद्रसखी व इतरही अनेक संतकवींच्या भजनांना कुमारांनी आपल्या गायकीद्वारे स्वतंत्र कार्यक्रमांच्या रूपाने श्रोत्यांपर्यंत पोहोचविले. तसेच, ‘तुकाराम-एक दर्शन’ या कार्यक्रमातून मराठी अभंगांना संगीतकाराच्या नजरेतून वारकरी संप्रदायापेक्षा वेगळे कसे पाहता येईल हे श्रोत्यांपुढे मांडले.
आजारपणापूर्वीच कुमारांनी हिंदुस्थानी संगीतातील अग्रगण्य कलाकारांमध्ये आपले वेगळे, स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. पाच वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर जेव्हा ते पुन्हा गाऊ लागले, तेव्हा चिंतन व मननामुळे त्यांच्या प्रस्तुतीमध्ये अधिक गहिरे व अनोखे रंग जाणवू लागले. त्यांना पूर्वीच्या स्वतःच्या प्रतिमेशी स्पर्धा करण्याचा प्रसंग आला. त्यांचे पूर्वीचे गाणे ऐकलेल्या श्रोत्यांना हा बदल पचविणे एकीकडे आवडत तर होते, पण दुसरीकडे सनातनी वृत्तीमुळे व पूर्वीचे हरविले या कल्पनेने कुमार विवाद्य ठरले. त्यांनी पुन्हा नव्याने आपला श्रोतृवर्ग घडविला व तत्कालीन अग्रगण्य कलाकारांत आपले स्वतंत्र, वेगळे स्थान निर्माण केले.
‘अनुपरागविलास’ भाग-१ हा कुमारजींचा स्वनिर्मित बंदिशींचा संग्रह १९६५ साली मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. त्यात १३६ बंदिशी व १९ स्वनिर्मित धुनउगम राग व बंदिशी आहेत. या धुनउगम रागांचे संपूर्ण विवरण, त्यात बांधलेल्या १०/१२ तानांसह दिलेले आहे. दुसऱ्या भागात १११ बंदिशी आहेत. या दोन्ही पुस्तकांतील अनेक बंदिशी मैफलीत मांडलेल्या व ध्वनिमुद्रिकांमध्येही दिल्या आहेत. विषयांचे वैविध्य, स्वाभाविकता, परंपरेचा अभ्यास, रसपरिपोष इत्यादी गुणांमुळे या बंदिशी म्हणजे कुमारांनी पुढील काळासाठी दिलेला अनमोल ठेवा ठरला आहे.
कुमारांनी १९६३ ते १९८० या काळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पुस्तिकांसह सादर केले. ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’ व ‘गीत बसंत’ हे संपूर्ण वर्षाचे निसर्गचक्र संगीतातून मांडणारे तीन कार्यक्रम; ‘ऋतुराज मैफल’ हा होळीउत्सवावर विशेष कार्यक्रम; ‘त्रिवेणी’ हा कबीर, सूरदास व मीराबाई यांच्या रचनांचा, भजनांचा कार्यक्रम; ‘तुलसीदास - एक दर्शन’, ‘निर्गुण बानी’, ‘तुकाराम - एक दर्शन’, ‘सूरदास- एक दर्शन’ हे संत-संगीताधारित; ‘मला उमजलेले बालगंधर्व’, ‘भा.रा. तांबे रजनी’, ‘टप्पा-ठुमरी-तराणा’, ‘मालवा की लोकधुनें’, ‘गौड-मल्हार दर्शन’ इत्यादी विशेष कार्यक्रमांचे कुमारांनी सादरीकरण केले.
कुमार गंधर्वांची व्यक्तिगत व जन्मजात गुणसंपदा फार मोठी होती. अर्थात तिचा विकासही त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्नांनी केला. त्यांनी अखेरच्या वीस वर्षांत अनेक मुलाखती व संवादांच्या जाहीर कार्यक्रमांतून आपले सांगीतिक विचार मांडले. त्यांपैकी बरेचसे ध्वनिमुद्रित, ध्वनिचित्रित व काही पुस्तकरूपानेही उपलब्ध आहेत. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक लोकगीतांचा स्वरलिखित संग्रह केला. प्रत्येक वर्षीच्या पत्रव्यवहाराची स्वतंत्र फाईल केली. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या कुमारजींच्या घरी विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. पतंजलींची योगसूत्रे, भरताचे नाट्यशास्त्र, स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादींचा त्यांनी व्यासंग केला व त्यांतून संगीतासाठी काय उपयुक्त ठरेल याचा त्यांनी सतत विचार केला. कुमारजींनी वाशी येथे घेतलेल्या संगीत-चर्चायुक्त शिबिरातील विचारांचे मो.वि. भाटवडेकरांनी संपादित केलेेले ‘मुक्काम वाशी’ हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
स्वतःच्या बंदिशींत ‘शोक’ हे नामाभिधान (तखल्लुस) घेणाऱ्या कुमारांना आयुष्यभर अनेक आपत्तींशी सामना करावा लागला तरी त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता.
कुमार गंधर्वांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे डॉक्टर ऑफ म्युझिक (१९६२, विक्रम विद्यापीठ, उज्जैन), डि.लिट. (१९७३), संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती (१९७४), ‘पद्मभूषण’ (१९७७, भारत सरकार), ‘शिखर सन्मान’ (१९७३, मध्यप्रदेश सांस्कृतिक विभाग), ‘पद्मविभूषण’ आणि हाफीज खाँ पुरस्कार (१९९०) आदी पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. त्यांचे देवास येथे निधन झाले.
त्यांचा संगीतवारसा पत्नी वसुंधरा कोमकली, पुत्र मुकुल, कन्या कलापिनी, नातू भुवनेश तसेच पंढरीनाथ कोल्हापुरे, मीरा राव, सत्यशील देशपांडे, विजय सरदेशमुख, मधुप मुद्गल इ. अनेक शिष्य चालवत आहेत. वसंतराव देशपांडे, काशिनाथ बोडस, मालिनी राजुरकर, वीणा सहस्रबुद्धे इ. अनेक कलाकारांनी कुमारजींचा सांगीतिक प्रभाव घेऊन गायन केले.
‘भानुकुल’ या त्यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षी संगीतसभा आयोजित होते. मध्यप्रदेश सरकारतर्फे, तसेच सोलापूरच्या पुजारी प्रतिष्ठानातर्फे ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देण्यात येतो.

पं. विजय सरदेशमुख

 

कोमकली, शिवपुत्र सिद्धरामैया