Skip to main content
x

कोंडके, विजय धोंडीराम

      विजय कोंडके म्हणजे विख्यात विनोदी नट दादा कोंडके यांच्या मोठ्या भावाचा मुलगा. शेवंताबाई व धोंडीराम या दांपत्याच्या पोटी विजय यांचा जन्म मुंबई येथे झाला. मात्र त्यांचे शालेय शिक्षण हिंगवली, उरळीकांचन आणि भोर या ठिकाणी पार पडले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयामधून १९७१ मध्ये ते बी.कॉम. झाले. त्याच काळात दादांनी ‘सोंगाड्या’ हा पहिला चित्रपट निर्माण केला. पण सोंगाड्याला वितरक मिळेना. तेव्हा स्वत:च सोंगाड्याचे वितरण करायचे दादांनी ठरवले. पण वितरणाची काहीच कल्पना नसल्याने वितरणातील एका अनुभवी माणसाला नेमून त्यांच्या हाताखाली विजय कोंडके यांना वितरण शिकण्यासाठी नेमले.

      दादांचे वितरण कार्यालय तेव्हा पुण्यात होते. थोड्याच दिवसात विजय कोंडके यांनी वितरणाची बरीचशी माहिती जमवली. चित्रगृहवाल्यांच्या ओळखी करून घेतल्या आणि ‘एकटा जीव सदाशिव’ या दादांच्या दुसऱ्या चित्रपटाचा कोल्हापुरात मुहूर्त केला, तेव्हा त्यांनी विजय कोंडके यांना आपल्या वितरणाचे प्रमुख नेमले. विजय कोंडके यांनी साऱ्या महाराष्ट्रात फिरून चित्रगृहवाल्यांशी ओळख करून घेतली आणि वितरण क्षेत्रात आपला जम बसविला. नंतर ते निर्मितीकडे वळले. विजय कोंडके यांनी ‘मला घेऊन चला’ (१९८८), ‘पळवापळवी’ (१९८९) हे दोन चित्रपट निर्माण केले. दोघांचेही दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका दादा कोंडके यांची होती. यानंतर विजय कोंडके यांनी दिग्दर्शनात उतरायचे ठरवले आणि १९९१ मध्ये ‘माहेरची साडी’ हा कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केला. कामगाराच्या कुटुंबाची ही कथा. त्यामुळे समाजात ज्याला तळागाळाचा वर्ग म्हणतात, त्या वर्गाने ‘माहेरची साडी’ला गर्दी केली. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले.

- सुधीर नांदगांवकर

कोंडके, विजय धोंडीराम