Skip to main content
x

कोरटकर, सुहासिनी रामराव

गायिका

 

सुहासिनी रामराव कोरटकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. सुहासिनी कोरटकरांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या वडिलांना शास्त्रीय संगीताची अतिशय आवड होती. आईला गायनाची, तसेच संवादिनी व व्हायोलिन वादनाची आवड होती. सुहासिनीचा आवाज सुरेल होता व लय-तालाची समजही चांगली होती, त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.

त्यांनी १९५७ साली पुण्याला आल्यावर भेंडीबाजार घराण्याचे पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे  शिकण्यास प्रारंभ केला. पहिली तीन-चार वर्षे आलाप, तान, पलटे अशी सर्वसामान्य तयारी व पारंपरिक बंदिशींची तालीम त्यांना दिली गेली व नंतर १९५९ पासून घराण्याच्या गायकीची तालीम सुरू केली. आवाजातील गुंजन, लगाव, दीर्घ मींड, खंडमेरचे तत्त्व व त्याचा आलाप, सरगम व तानेतील प्रयोग, मुलायम स्वरकण, गमकेच्या ताना, फिरकीच्या व सपाट द्रुत ताना, कर्नाटक अंगाची लयदार सरगम, . अमान अली खाँ साहेबांच्या बंदिशी व त्यांचे आकर्षक प्रस्तुतीकरण अशी या घराण्याची वैशिष्ट्ये आहेत. पं. जानोरीकरांनी सुहासिनी कोरटकरांकडून अत्यंत आस्थेने, परिश्रमपूर्वक व काटेकोरपणे पुढील दहा वर्षे तालीम करून घेतली. त्यांनी कौटुंबिक संकटांना व शारीरिक व्याधींना धैर्याने तोंड देत ही गायकी आत्मसात केली.

त्या १९६६ साली गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकारपरीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी १९६९ मध्ये संगीताचे आध्यात्मिक महत्त्वहा प्रबंधाचा विषय घेऊन संगीताचार्यही पदवी मिळविली. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, दादरा या उपशास्त्रीय संगीताचाही सराव केला. बेगम अख्तर या त्यांच्या आवडत्या गायिका होत. त्यांच्या ढंगाचा डोळसपणे अभ्यास करून सुहासिनी कोरटकरांनी स्वत:ची अशी एक शैली बनवली. त्यानंतर दिल्लीच्या श्रीमती नैनादेवी यांच्याकडे त्यांनी विशेष मार्गदर्शन घेतले

सवाई गंधर्व महोत्सवात १९६९ मध्ये त्यांचे गाणे झाले. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतासाठी त्यांना १९७७ मध्ये आकाशवाणीची ग्रेड मिळाली. त्यांनी निगुनीया टोपणनावाने स्वर, लय व शब्द यांचा त्रिवेणी संगम असलेल्या १००हून अधिक बंदिशी बांधल्या आहेत.

त्या १९७५ ते १९९६ पर्यंत आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर केंद्र संचालकपदी कार्यरत होत्या. त्यांनी १९९६ मध्ये घराण्याची कामे पूर्ण करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. गुरूचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून भेंडीबाजार गायकीचा प्रसार व प्रचार करायचा हेच त्यांनी स्वतःचे जीवनकार्य व ध्येय ठरवले व त्यासाठी विविध मार्गांनी निरंतर प्रयत्न केले. आपल्या मैफलीबरोबर घराण्याची गायकी समजावून सांगणारी प्रात्यक्षिकांसह भाषणे चर्चासत्रांमधून; मासिके, पुस्तके व वर्तमानपत्रांमधून लेख लिहून भेंडीबाजार घराना संमेलन दिल्ली, गोवा येथे भरवून त्यांनी हे कार्य केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. भेंडीबाजार घराण्याचे नाव व गायकी आता सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचली आहे व लोकप्रिय झाली आहे.

दिल चाहे सो गाओ’ (बा.. बोरकरांच्या हिंदी कवितांचे गायन), ‘शब्दसुरांचे लेणे’ (स्वनिर्मित बंदिशी), ‘आपकी याद में’ (बेगम अख्तर यांच्या रचनांचे गायन) असे रंगमंचीय आविष्कार त्यांनी केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सुरसिंगार संसदतर्फे सुरमणी’, तसेच त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सीनियर फेलोशिपप्राप्त झाली. त्यांना गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषणपुरस्कारही प्राप्त झाला. पूर्णवाद प्रतिष्ठानचासंगीत मर्मज्ञ पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे.

किशोरी जानोरीकर/आर्या जोशी