Skip to main content
x

करकरे, हेमंत कमलाकर

       मुंबई पोलीस सेवेमधील अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व अशी ख्याती लाभलेले हेमंत कमलाकर करकरे ह्यांचा जन्म  मध्यप्रदेशातील आमला ह्या खेड्यात झाला. वडिलांची रेल्वेत नोकरी असल्यामुळे बदलीमुळे सतत शहरे, गावे बदलत राहावी लागायची,  त्यामुळे तीन भाऊ, एक बहीण आणि आईवडिलांसह करकरे यांचे बालपण आणि शालेय, महाविद्यालयीन शिक्षण विविध शहरांत पूर्ण झाले. मध्यप्रदेशातून पुढे वर्धा येथील वास्तव्यात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण नागपुरात न्यू इंग्लिश हायस्कुलामध्ये घेतले. नागपुरातच सर विश्वेश्वरय्यांच्या महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. शाळेत त्यांचा नेहमी पहिलाच क्रमांक असायचा.

     करकरे यांच्या मातोश्रीदेखील बी.ए., एम.ए., एम.एड. अशा उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या हेमंत करकरे यांनी ‘पहिलीचा सगळा अभ्यास पाठ येतो’ म्हणून बदलीच्या ठिकाणच्या वर्धा येथील शाळेच्या पहिलीच्या वर्गात बसण्यास नकार दिला आणि दुसरीत बसण्याचा हट्ट धरला. मुळातच तल्लख बुद्धीच्या हेमंत करकरे ह्यांनी अभियांत्रिकीनंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्या अभ्यासक्रमातून त्यांना पीएच.डी. नंतर परदेशी जाण्याची आणि सुबत्तेची करिअर करण्याची संधी चालून आली. परंतु, करिअर करायचे ते देशसेवेतील आस्थापनेतच, हाच करकरे यांचा विचार व ध्यास त्यांना मिळालेल्या संस्कारातून ठाम झाला होता. त्यामुळे काही वर्षे इंटरनॅशनल ट्रॅक्टर येथे नोकरी केल्यानंतर ते स्पर्धा-परीक्षांकडे वळले. भारतीय परराष्ट्र सेवेच्या प्रवेश चाचण्यांमध्ये महाराष्ट्रातून ते सुवर्णपदक विजेते ठरले. तो ही मार्ग नाकारून, पुन्हा भारतीय पोलीस सेवेसाठी अभ्यास करून ते ‘आय.पी.एस.’ ह्या आपल्या आवडीच्या करिअरकडे झेपावले.

      १९८२ ची ती आयपीएसची बॅच, आयपीएस होण्याआधी शिक्षणाच्या निमित्ताने, तसेच अन्य ठिकाणी नोकरी करताकरताच त्यांना जंगलविषयक, कोळसा खाणी, पर्यावरण, लोकजीवन ह्यांचे जवळून अवलोकन करण्याची संधी मिळाली. ह्या सार्‍या अनुभवांचा उपयोग त्यांना पोलीस सेवेत करता आला. मानसशास्त्र उत्तमप्रकारे जाणणार्‍या करकरे ह्यांनी अमली पदार्थविरोधी खात्यात, तसेच आर्थिक गुन्हे शाखांमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे गुन्हेगार आणि कार्यालयीन यंत्रणेतही आपला दबदबा निर्माण केला होता. शासनाला अशा गुन्ह्यांसंबंधीचे प्रभावी अहवालही सादर केले होते. हेमंत करकरे यांनी आपल्या सव्वीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अतिशय संवेदनशील खात्यांत आणि तितक्याच धाडसी उपक्रमांत आपले योगदान दिले.

      एरवी चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करण्यास कुणीही शासकीय अधिकारी, कर्मचारी नाखूष असतो; परंतु त्यांनी तेही आव्हान आनंदाने स्वीकारले. आपल्या उगवत्या संसाराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक ह्या भूमिकेत काम करताना त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात केले. प्रसंगी नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले. तेथील यशस्वी कालखंडानंतर त्यांना ‘रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग’ म्हणजे ‘रॉ’मध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. तेथे ते पाच वर्षे होते.

     ‘रॉ’मधून त्यांना मुंबई सह पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली. हा मुंबई पोलीस विभागाचा प्रशासन विभाग होता. ह्या विभागात सह पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रलंबित कामे मार्गावर आणून पूर्ण केली. समाजाभिमुख पोलीस अधिकारी अशी प्रतिमा तयार करून त्यांनी पोलीस यंत्रणेचीच एक वेगळी ओळख समाजमनात रुजवली. अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा एरवी वंचित असणार्‍या वर्गासाठी त्यांनी अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपल्याच खात्यातील सर्वसामान्य पोलिसांच्या अडचणी, हितांबाबत ते नेहमी विचार करीत आणि  त्यांच्या आश्वासक भवितव्यासाठी प्रयत्नशील असत.

      करकरे हे एक ‘हटके’ ह्या प्रकारचे पोलीस अधिकारी होते, असे म्हणायला हरकत नाही. कारण पोलीस वर्दीतील ह्या करड्या शिस्तीच्या अधिकार्‍याच्या आत एक रसिक आणि व्यासंगी वाचक, भाष्यकार दडला होता. त्यामुळेच घरच्याप्रमाणे आपल्या कार्यालयाच्या कपाटातही कार्यालयीन कामाच्या संदर्भातील पुस्तके, ग्रंथांप्रमाणेच अन्य वाङ्मयीन विषयांवरील पुस्तकांचे वाचनालयही खुले असायचे. इंग्रजी, मराठी, हिंदी ह्या भाषांतील साहित्यकृतींबरोबरच अन्य भारतीय साहित्यांतही त्यांना विशेष रुची होती. टागोर, खलिल जिब्रान, प्रेमचंद, रसेल, शरच्चंद्र, शेक्सपिअर अशा अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींवर ते समर्थपणे बोलत असत; सामाजिक विषयांवर व्याख्यानेही ते आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून देत असत.

      २००८मध्ये त्यांनी दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुखपद स्वीकारले. ह्याच काळात मालेगाव बाँबस्फोट हे गाजलेेले प्रकरण त्यांनी हाताळले. ह्या प्रकरणानंतर ते ‘एटीएस प्रमुख’ म्हणून अधिकच प्रकाशमान झाले. त्यानंतर सात-आठ महिन्यांनंतरच पाकिस्तानी अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना त्यांना कामा इस्पितळ, मुंबई येथे हौतात्म्य प्राप्त झाले. कुलाबा, सीएसटी, कामा इस्पितळ परिसरात २६ नोव्हेंबर २००८ च्या सायंकाळी, सीएसटी येथील परिसरात अतिरेकी घुसल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आखणी केली आणि ते अतिरेक्यांच्या मागावर निघाले. परंतु, अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत ह्या शूर, अभ्यासू आणि सुसंस्कृत पोलीस अधिकार्‍याला आपल्या प्राणास मुकावे लागले. भारत सरकारने हेमंत करकरे ह्यांना ‘अशोकचक्र’ हा पुरस्कार दिला. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कविता करकरे ह्यांनी तो स्वीकारला.

- संदीप राऊत

करकरे, हेमंत कमलाकर