Skip to main content
x

कर्नाटकी, नंदा विनायक

बेबी नंदा

     लोभस चेहरा, मोहक डोळे, लक्ष वेधून घेणारा ओठावरचा तीळ आणि अभिनयकौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक ‘वलयांकित’ अभिनेत्री म्हणून बेबी नंदा या मराठी युवतीने स्वत:चे स्थान निर्माण केले. कोल्हापूर येथे नंदा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक हे यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक होते, तर त्यांच्या आई सुशीला होत. वडिलांच्या आग्रहास्तव ‘मंदिर’ या चित्रपटात नंदा यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या ७व्या वर्षी एका मुलाची सर्वप्रथम भूमिका केली. आपल्या सात भावंडांपैकी आपल्यालाच वडिलांनी चित्रपटात काम करायला लावले, म्हणून त्या नाराज झाल्या. पण १९ ऑगस्ट १९४७ रोजी मा. विनायक यांचे अकस्मात निधन झाले, त्यामुळे बेबी नंदा यांच्या चिमुकल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आपोआप आली, कारण बालकलाकार म्हणून त्यांना चित्रपटांसाठी बोलावणी येऊ लागली. नंदा यांनी ‘जग्गू’, ‘अंगारे’, ‘शंकराचार्य’, ‘सुदाम्याचे पोहे’ या चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले.

     व्ही. शांताराम यांनी १९५६ साली केलेल्या ‘तुफान और दिया’ या बहीण-भावाच्या कथेवर आधारित चित्रपटात नंदा यांना काम करण्याची संधी दिली. या चित्रपटातील कसदार अभिनयाने ‘बेबी नंदा’ यांना अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली. १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटातील भूमिका त्यांनी जीव ओतून केली. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

     बेबी नंदा यांनी मुंबईचे स्काऊट कमिशनर गोकुळदास माखी यांच्याकडून घरीच शिक्षण घेतले. बेबी नंदा यांनी ‘कुलदैवत’ (१९५५), ‘शेवग्याच्या शेंगा’ (१९५५), ‘देवघर’ (१९५६) या मराठी चित्रपटांतूनही महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांना राजा परांजपे, फत्तेलाल, दिनकर पाटील अशा दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करता आले. १९५९ साली ‘छोटी बहन’ या नायिकाप्रधान चित्रपटात त्यांनी शीर्षकभूमिका केली. चित्रपटसृष्टीत या गुणी अभिनेत्रीचा बोलबाला झाला. व्ही. शांताराम यांची भाची आणि मास्टर विनायक यांची मुलगी म्हणून कामाच्या संदर्भात सवलत न घेता पटकथेचा अभ्यास करून, उजळणी करून झोकून देऊन काम करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले. ‘कानून’ (१९६०), ‘हम दोनो’ (१९६१), ‘आँचल’ (१९६०) अशा चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाचा कस लागला. ‘जब जब फूल खिले’ (१९६५) हा नंदा यांचा शशी कपूर यांच्याबरोबरचा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. ‘वलयांकित अभिनेत्री’ म्हणून चित्रपटसृष्टीने त्यांचे स्वागत केले. शशी कपूर आणि बेबी नंदा यांची जोडी ‘सुपरहिट’ ठरली.

     एक यशस्वी आणि वलयांकित नायिका म्हणून बेबी नंदा यांचे १९६०च्या दशकातील चित्रपट महत्त्वपूर्ण ठरले. ‘इत्तेफाक’ (१९६९) या चित्रपटात त्यांनी रंगवलेली खलनायिका प्रभावी ठरली. राजेश खन्ना यांच्याबरोबर ‘द ट्रेन’ (१९७०), सुनील दत्त यांच्याबरोबर ‘काला बाजार’ (१९६०) व ‘आज और कल’ (१९६३), ‘आशिक’, ‘अचानक’, ‘गुमनाम’, ‘भूमिका’, ‘जोरू का गुलाम’ असे वैविध्यपूर्ण भूमिका असलेले चित्रपट त्यांनी अतिशय आत्मविश्‍वासाने केले.

     कालांतराने बेबी नंदा यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. पण राज कपूर यांच्या आग्रहावरून ‘प्रेमरोग’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘मजदूर’ या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यानंतर मात्र चित्रपटसृष्टीपासून नंदा कायम दूर राहिल्या. त्यांच्या विवाहाकरता त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले, पण विवाहाचा योग नव्हता. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध जुळत असतानाच मनमोहन देसाई यांच्या अकाली मृत्यूमुळे त्या चंदेरी दुनियेपासून दूर गेल्या आणि अविवाहित राहिल्या. पुढे बऱ्याच वर्षानंतर ‘नटरंग’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्क्रिनिंग’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी मनातली अभिनेत्री नंदा प्रेक्षकांसमोर आल्या.

     मराठमोळ्या कुटुंबातली मुलगी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित आणि वलयांकित अभिनेत्री झाली, ती उपजत अभिनय कौशल्याने आणि अभिजात सौंदर्यामुळे.

 - नेहा वैशंपायन

कर्नाटकी, नंदा विनायक