Skip to main content
x

कर्वे, आनंद दिनकर

      ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अ‍ॅश्डेन पुरस्कार’ दोनदा मिळविणाऱ्या पुण्यातील ‘अ‍ॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक डॉ.आनंद दिनकर कर्वे यांचा जन्म पुण्यातील सुप्रसिद्ध समाजसुधारक महर्षी कर्व्यांच्या घराण्यात झाला. वडील दिनकर पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य, तर आई डॉ.इरावती प्रसिद्ध मानववंश शास्रज्ञ.

     पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवून उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीच्या ट्यूबिंगेन विद्यापीठात गेले व तिथे १९६० साली त्यांनी वनस्पतिशास्रात डॉक्टरेट मिळविली. त्यानंतरची चार वर्षे ते पंजाब विद्यापीठात व मराठवाडा विद्यापीठात व्याख्याते होते. १९६४ ते १९६६ या दोन वर्षांसाठी त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुढे १९८२ सालापर्यंत ते फलटण येथील निंबकर सीड्सचे संशोधन - संचालक म्हणून कार्यरत राहिले. याच काळातील अखेरच्या दोन वर्षांत त्यांनी म्यानमार येथे ‘युनायटेड नेशन्सच्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’च्या वतीने भुईमूगतज्ज्ञ काम पाहिले होते व ‘इंटरनॅशनल रॉस्टर ऑफ सॅफ्लॉवर एक्सपर्ट’चे ते सदस्यदेखील होते.

     १९८३ साली त्यांनी जर्मनीतील ‘अलेक्झांडर फॉन हुंबोल्ट फाउण्डेशन सीनियर रिसर्च फेलो’ या नात्याने फ्रायषुर्ग विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात संशोधन केले. १९८४-१९८८ दरम्यान त्यांनी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीत कृषिसंशोधन विभागाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी सांभाळली. नंतर त्यांनी १९८८ साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे चालविण्यात येणार्‍या ‘सेंटर फॉर अ‍ॅप्लिकेशन ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेन्ट’ या प्रकल्पात सहभाग घेतला. १९९२ साली ते त्या प्रकल्पाचे उपसंचालक व नंतर संचालक झाले. १९९३ साली त्यांनी इंद्रायणी बायोटेक लि., पुणे या कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली

     अ‍ॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) या अग्रगण्य संशोधन केंद्राची स्थापना १९९२ साली झाली. १९९६ साली आनंद कर्वे यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. कर्वे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले अन्न वापरून बायोगॅस तयार करण्याचे क्रांतिकारी संयंत्र शोधले आहे. पारंपरिक बायोगॅस संयंत्राना लागणाऱ्या ४० किलो शेणाऐवजी, या प्रणालीला फक्त एक किलो जैव खाद्य लागते आणि त्यातूनच ५०० ग्रॅम गॅस तयार होतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची प्रस्थापना करण्यासाठी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना आमंत्रित केले होते. महाराष्ट्र राज्यात अशी ७०० च्यावर संयंत्रे उभारण्यात आली असून, ग्रमीण भागाबरोबरच शहरी भागातही ती उपयुक्त ठरत आहेत.

     महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर हा पट्टा उसाच्या उत्पादनासाठी ख्यातकीर्त आहे. उसाचे पीक घेतल्यानंतर दरवर्षी साधारणत: ४५ लाख टन कचरा पाचटाच्या (वाळलेल्या पात्याच्या) रूपाने मागे उरतो व तो शेतातच जाळला जातो. देशभरात गव्हाचे काड, मक्याच्या बुरकुंड्या, बाजरीचे सरमाड, भाताचा  पेंढा, तसेच गळीत धान्ये, कडधान्ये, भाज्या, केळी, हळद, कपाशी इ. पिकांचा शेतात उरणारा भाग, बोरे व द्राक्षांची छाटणी केल्यावर मिळणार्‍या काड्या व फांद्या, फळबागांचा पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या व करवंट्या, कडधान्याच्या शेंगांची टरफले वगैरे टाकाऊ शेतमाल दरवर्षी साठ कोटी टनांवर जातो. वर्षानुवर्षे हा कचरा जाळून नष्ट करण्याची पद्धत चालू आहे. ‘आरती’ने या पालापाचोळ्याच्या कचर्‍यापासून कांडीकोळसा निर्माण करण्याची वैज्ञानिक शक्कल शोधून काढली.

     स्टेनलेस स्टीलच्या पिंपात हा जैव कचरा घालून त्यांना भट्टीत घालून बाहेरून उष्णता दिली, की ऑक्सिजनच्या गैरहजेरीत त्याचे विघटन होते व त्यातून ७० टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने बाहेर पडतात व जैवभाराचा जो अवशेष उरतो, तो कोळसा असतो. जैवभार पेटविण्यासाठी लागणारी उष्णता जैवभार पेटवूनच मिळविली जाते. आरतीने तयार केलेल्या भट्ट्या आकाराने छोट्या असल्यामुळे सहज हलविता येतात. या भट्टीतून एकूण आत जाळलेल्या जैवभाराच्या २० टक्के कोळसा मिळतो, म्हणजेच देशातील ६० कोटी कृषिकचऱ्यातून १२ कोटी टन कोळसा मिळविता येऊ शकतो. या कोळशाचा बारीक भुगा करून त्यात थोडे शेण किंवा खळ मिसळल्यास साच्याच्या साहाय्याने कांडीकोळसा किंवा इंधन विटा तयार करता येतात. तंदूर, बार्बेक्यू किंवा साध्या कोळशाच्या शेगडीत, तसेच लोहार कामासाठीसुद्धा हा कोळसा वापरता येतो. हा कोळसा जळताना धूर येत नाही. शेतकऱ्यांसाठी हा एक प्रकारे जोडउद्योग होऊ शकतो व सध्याच्या अन्य इंधनाच्या कडाडत्या भावाच्या काळात हा कोळसा एक प्रकारे वरदान ठरू शकतो. आता हा कांडीकोळसा गावोगावी ‘सराई’ नावाच्या निर्धूर शेगडीत जाळण्यासाठी वापरतात व त्यातून लाकडाची जळणापासून बचत होते. तसेच, घरात चुलीमुळे होणारे वायुप्रदूषणही टळते हे खूप महत्त्वाचे आहे. 

     कर्वे यांनी आजपावेतो सुमारे पन्नासहून अधिक संशोधन प्रकल्प राबविले आहेत. सुमारे १२५ संशोधनपर निबंध व २५० शास्त्रीय लेख लिहिले आहेत. त्यांची चार मराठी पुस्तके, एक व्हिडिओ फीत व १५ सीडीज प्रकाशित झालेल्या आहेत. १९८० साली त्यांना ‘ऑइल टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’द्वारे प्रा. जे.जी. काणे पारितोषिक बहाल करण्यात आले होते. त्याच वर्षी त्यांना वॉशिंग्टनच्या ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’द्वारा सर्टिफिकेट ऑफ मेरिट बहाल करण्यात आले होते. १९९५ साली ते नवी दिल्ली येथील ‘इंडियन नॅशनल अकॅडमी’द्वारा प्रदान करण्यात येणार्‍या ‘डॉ.बी. डी. टिळक’ पुरस्काराचे मानकरी ठरले. जर्मनीतील हाले या ठिकाणी २००० साली भरलेल्या ‘विज्ञान तंत्रज्ञान व मानव’ या भाषणमालिकेत पहिले भाषण करण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

     - जोसेफ तुस्कानो 

कर्वे, आनंद दिनकर