Skip to main content
x

लिमये, वामन पांडुरंग

          वामन पांडुरंग लिमये यांचा जन्म सांगली येथे एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग गणेश लिमये यांचा सांगली येथेच अडत व्यवसाय होता. लिमये यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण सांगली येथेच झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी जून १९४३मध्ये प्रवेश घेऊन मार्च १९४६मध्ये बी.एस्सी. (कृषी) ही पदवी द्वितीय वर्गात मिळवली आणि कृषी विभागात नोकरी स्वीकारली. कृषी खात्यातील सेवेत असतानाच त्यांनी संशोधनाद्वारे पुणे विद्यापीठातून मे १९५८मध्ये एम.एस्सी. (कृषी) उद्यानशास्त्र ही पदवी मिळवली. लिमये यांनी ऑक्टोबर १९४६मध्ये कृषी खात्याच्या नांदगाव (सिंधुदुर्ग) येथील रोपवाटिकेवर कृषि-अधिकारी म्हणून सेवेस प्रारंभ केला. दोन वर्षे कोकण विभागात काम केल्यानंतर त्यांनी ४ जुलै १९४८ रोजी पुण्याला येऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड येथे डॉ. एस. आर. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि-अधिकारी म्हणून सात वर्षे काम केले.

          डॉ. गांधी यांची संशोधन कार्यातील शिस्तबद्धता, चिकित्सक व परखड विचारसरणी यांचा प्रा. लिमये यांच्या पुढील कार्यपद्धतीवर मोठा प्रभाव पडला. परभणी येथे नवीन कृषी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून लिमये १७ ऑगस्ट १९५८ रोजी रुजू झाले. १७ सप्टेंबर १९६५ रोजी त्यांची प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे साहाय्यक उद्यानविद्यावेत्ता म्हणून बदली झाली. तेव्हापासून निवृत्तीपर्यंत त्यांनी कोकण विभागातच सेवाकाल व्यतीत केला. वेंगुर्ल्यानंतर नोव्हेंबर १९६८मध्ये रत्नागिरीतील दापोली येथील कृषी महाविद्यालयात साहाय्यक उद्यानविद्यावेत्ता म्हणून व १९७०पासून तेथेच प्राध्यापक म्हणून काम केले. बा.सा.को.कृ.वि.च्या स्थापनेनंतर उद्यानविद्या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. तेथे त्यांनी विभागप्रमुख म्हणून १० वर्षे काम पाहिले. त्यानंतर दीड वर्षे त्यांनी दापोली येथे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम पाहिले. ३० जून १९८२ रोजी सेवानिवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झाले.

          लिमये यांनी ३६ वर्षांच्या सेवेपैकी जवळजवळ २२ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वेंगुर्ला व दापोली येथे आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाल्याची पिके व कोकणातील भाजीपाल्याच्या संशोधनात व्यतीत केली. वेंगुर्ला व दापोली येथे काम करत असताना त्यांनी आंब्याच्या हापूस या नामवंत जातीत असलेला एक वर्षाआड उत्पादन देण्याचा दुर्गुण काढून टाकण्याच्या उद्देशाने ‘हापूस’ व नियमित फळधारणा देणार्‍या ‘नीलम’ या जातींचा संकर करून ‘रत्ना’ ही अधिक व नियमित उत्पादन देणारी संकरित जात विकसित करून प्रसारित केली.

          लिमये यांनी डॉ. गांधी यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी विकसित केलेल्या ‘फोरकर्ट’ या आंब्याची डोळे भरून कलम करण्याची पद्धत लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केले. वेंगुर्ला येथे काम करत असताना कायम जागी लावलेल्या खुंट रोपावर ‘व्हिनियर’ पद्धतीने कलम करून कोरडवाहू परिस्थितीत आंबा लागवडीची पद्धत विकसित केली आणि केवळ पावसाच्या पाण्यावर वेंगुर्ला येथे टेकडीवर सदर पद्धतीची बाग विकसित करून दाखवली. तसेच त्यांनी ‘कोय कलम’ व ‘मृदुकाष्ठ कलम’ पद्धती प्रमाणित करून दरवर्षी हापूस आंब्याची हजारोंनी कलमे शेतकर्‍यांना पुरवली.

          लिमये यांनी वेंगुर्ल्याजवळील अनसूर गावातून ‘अनसूर-१’ हा काजूचा वाण व मोठ्या आकाराचे गरे असलेला फणसाचा वेंगुर्ला-१ वाण या नावाने प्रसारित केला. त्यांनी वेंगुर्ला-२ हा मध्यम आकाराचे गरे असलेला फणसाचा परंतु मूळ काढणीचा कालावधी ३ आठवडे कमी असलेला व अधिक उत्पादन देणारा वाण विकसित करून प्रसारित केला. याशिवाय नारळाची ‘प्रताप’, आंब्याची ‘सिंधू’, वालाची ‘कोकण भूषण’ व इतर भाजीपाल्याच्या जातींच्या विकसनामध्येही त्यांचा सहयोगी संशोधक मार्गदर्शक म्हणून सहभाग होता. विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनकार्यात व इतर योजनांमधून काम करणार्‍या कनिष्ठ संशोधकांनाही मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सकाळ भाजीपाला समितीमार्फत चालवण्यात येणार्‍या परसबाग वर्गांनाही मार्गदर्शन केले. त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठानामार्फत कृषी पुरस्कार देण्यात आला होता. अशा शिस्तप्रिय शास्त्रज्ञाचे पुण्यात वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.

          - प्रा. भालचंद्र गणेश केसकर

लिमये, वामन पांडुरंग