Skip to main content
x

महाजनी, रवींद्र हणमंत

     देखण्या, रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे कलाकार, अशीच रवींद्र ह. महाजनी यांची खरी ओळख आहे.

      रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे वडील ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. रवींद्र दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला. ह.रा. महाजनी हे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना मात्र अभिनयाची अतिशय आवड. मोठे झाल्यानंतर नाटकात-चित्रपटातच जायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. शाळेतही ते स्नेहसंमेलनात, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत. इंटर सायन्सच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्या वेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे, असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते. त्या वेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे. अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे. चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे, हेही त्याच वेळी त्यांचे ठरून गेले होते. शेखर कपूरना दिग्दर्शनाची आवड होती, रमेश तलवार-अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती. रॉबिन भट्ट यांना लेखनाची आवड होती, तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचे होते. आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी झाले.

       शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती, त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते; म्हणून काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली, काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली. ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाइकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली, पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहीत होते.

      मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे विनोदी ढंगाचे हलकेफुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळाले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या चित्रपटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा ‘तारा’ मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटांतील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला. चांगली कथा-पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे देखणे रूप, हे समीकरण १९७५ ते १९९० या काळात छान जुळून आले होते. अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनींनी त्यांच्या ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे अनेक प्रयोग केले.

       सन १९९० नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांतूनही भूमिका केल्या.

      कलाकाराने कायम नवनवीन शिकत आणि करत राहायला हवे, असे त्यांना वाटते. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात.

- अभिजित पेंढारकर

महाजनी, रवींद्र हणमंत