Skip to main content
x

मोडक, शाहू रामकृष्ण

     शाहू मोडक यांचे कुटुंब मूळचे कोकणस्थ ब्राह्मण होते. पण त्यांचे पणजोबा रामकृष्ण यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. शाहू मोडकांचे वडील रामकृष्ण हे अहमदनगरच्या चर्चमध्ये रेव्हरंड म्हणून काम पाहत. तेथेच शाहू मोडक यांचा जन्म झाला. रामकृष्णपंत नाताळच्या सणानिमित्ताने होणाऱ्या उत्सवात ख्रिस्तपुराणातील कथाविषयांवर आधारित नाटकांतून भूमिका करत. तसेच ख्रिस्तपुराणावर आधारित साग्रसंगीत कीर्तनही करीत. शाहू मोडक यांना अभिनयाचे आणि संगीताचे शिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पुढे पूना गेस्ट हाऊसचे मालक असणार्‍या नानासाहेब सरपोतदारांनी ‘श्यामसुंदर’ चित्रपटातील बाल श्रीकृष्णाच्या कामासाठी निर्माते दादा तोरणे यांच्याकडे मोडक यांच्या नावाची शिफारस केली.

     ‘श्यामसुंदर’ (१९३२) हा शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट खूपच गाजला. मुंबईच्या वेस्ट एंड थिएटरमध्ये सतत २७ आठवडे तो पडद्यावर झळकत होता. रौप्यमहोत्सव साजरा करणारा अखंड भारतातील हा पहिला चित्रपट होता. शाहू मोडक यांनी गायलेले ‘भावे वरिता गोसेवेला’ हे चित्रपटातील गीत गाजले आणि त्या वेळच्या सेंट्रल प्रॉव्हिन्सच्या शासनाने वर्‍हाड प्रांतातील शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकात ते गीत समाविष्ट केले. चित्रपटातील गीत शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्याचा हा पहिला प्रसंग होता. ‘श्यामसुंदर’मधील भूमिकेमुळे शाहू मोडक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मास्टर नवीनचंद्र या अभिनेत्याने त्यांना सोन्याचे पदक देऊन गौरवले. त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट होता ‘औट घटकेचा राजा’, ‘आवारा शहजादा’ चित्रपटात त्यांची दुहेरी भूमिका होती. ‘प्रिन्स अ‍ॅन्ड पॉपर’ या इंग्रजी कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला होता. शाहू मोडक यांना भारतीय बोलपटातील सर्वप्रथम दुहेरी भूमिका साकारण्याचा मान प्राप्त झाला.

     सुंदर चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सुरेल आवाज यामुळे मुंबईच्या महालक्ष्मी सिनेटोन या संस्थेने त्यांना दोन चित्रपटांसाठी करारबद्ध केले. चित्रपट होते ‘बुलबुले पंजाब’ आणि ‘सेवासदन’. सुप्रसिद्ध हिंदी लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या कथानकावर ‘सेवासदन’ हा चित्रपट बेतलेला होता. दोन्ही चित्रपटात त्यांची नायिका होत्या स्वरूपसुंदर झुबेदा. त्या वेळेस हिंदी चित्रपटसृष्टीत तीन मराठी नायक आघाडीवर होते ते मा. विठ्ठल, बाबालाल नांद्रेकर आणि माधव काळे. त्यात आता शाहू मोडक या नावाची भर पडली.

     कोल्हापूर सिनेटोन हा श्रीमंत राजाराम महाराज यांचा स्वत:चा स्टुडिओ होता. त्यांनी शाहू मोडक यांना मोठा मेहनताना देऊन बोलावून घेतले आणि ‘हिंद महिला’ व ‘होनहार’ असे दोन बोलपट काढले. न्यू थिएटर्सचे प्रेमांकुर अटोर्थी ‘हिंद महिला’चे दिग्दर्शक होते आणि ‘होनहार’ हा चित्रपट गजानन जागीरदारांनी दिग्दर्शित केला होता. हंस चित्रपटसंस्था ही तेव्हा कोल्हापुरातच होती. त्यांनी आपल्या ‘बेगुनाह’ या चित्रपटासाठी मोडक यांना नायक म्हणून घेतले. कथानक होते आचार्य अत्रे यांचे. शांतारामबापूंनी शाहू मोडक यांच्याशी तीन चित्रपटांचा करार करून त्यांना पुण्यात प्रभातमध्ये आणले.

     प्रभातमध्ये त्यांनी सर्वप्रथम ‘माझा मुलगा’/‘मेरा लडका’ हा के. नारायण काळे दिग्दर्शित चित्रपट केला. त्यानंतर ‘माणूस’ आणि ‘आदमी’ हा मराठी-हिंदी चित्रपटातून ‘बिल्ला क्रमांक ३३३’ असणार्‍या गणपत या पोलीस शिपायाची भूमिका केली. भारतात प्रभातचा हा चित्रपट खूपच चालला. त्यानंतर ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपट हिंदी-मराठीत केला. ‘संत ज्ञानेश्वर’ तर न्यूयॉर्कमध्ये कार्नोजी हॉल थिएटरमधून दाखविण्यात आला. फ्रँक काप्रासारख्या विश्‍वविख्यात दिग्दर्शकाने चित्रपटाची खूपच प्रशंसा केली. अमेरिकेत दाखविला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट होय.

     प्रभातचा करार संपल्यावर शाहू मोडक मुंबईत स्थायिक झाले. प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट यांनी त्यांना ‘भरत भेट’/‘भरत मिलाप’ चित्रपटासाठी आमंत्रण दिले. शाहू मोडकांनी त्या चित्रपटात भरताची भूमिका केली. हा चित्रपट सार्‍या भारतात गाजला. पाठोपाठ वाडिया मुव्हीटोनचा ‘शोभा’ चित्रपट त्यांना मिळाला. कुमारसेन समर्थ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. शोभना समर्थ या चित्रपटाच्या नायिका होत्या आणि वसंत देसाई यांनी त्याला संगीत दिले होते.

     आचार्य अत्रे यांनी ‘मृच्छकटिक’ या नाटकावर आधारित ‘वसंतसेना’ हा चित्रपट काढला. यात शाहू मोडक होते. नंतर शाहू मोडक यांना दिग्दर्शक कारदार यांचे ‘कानून’, ‘गीत’ हे दोन चित्रपट मिळाले. त्याच प्रमाणे ‘महासती अनसूया’ आणि नवयुग चित्रपट कंपनीचे ‘पहिली मंगळागौर’ आणि ‘लढाई के बाद’ हे चित्रपट मिळाले. शाहू मोडकांनी काम केलेले हे सर्व चित्रपट उत्तम चालले. त्याच्या पाठोपाठ देवकी बोस यांचा ‘मेघदूत’, मा. विनायकांचा ‘मंदिर’ आणि भालजी पेंढारकरांचा ‘महारथी कर्ण’ हे मोठ्या बॅनरचे चित्रपट त्यांच्या हाती आले. बदामी यांनी निर्माण केलेल्या ‘उत्तरा-अभिमन्यू’ चित्रपटात शाहू मोडक यांच्यासोबत शांता आपटे व अशोककुमार हे कलाकार होते. चित्रपटात शाहू मोडकांनी कृष्णाची भूमिका केली होती. त्या भूमिकेमुळे त्यांच्या वाटेस कृष्ण आणि राम यांची कामे असणारे पौराणिक चित्रपट येऊ लागले. त्यांनी जवळजवळ शंभरहून अधिक चित्रपटांतून राम-कृष्णांच्या भूमिका केल्या. पुढे चित्रपटांतून निवृत्त होऊन ते पुण्यात स्थायिक झाले. तेथेच शाहू मोडक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी प्रतिभा मोडक यांनी त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू केला आहे.

- द. भा. सामंत

मोडक, शाहू रामकृष्ण