Skip to main content
x

नांदगावकर, शांताराम मालोजी

शयघन आणि समर्पक शब्दरचनांमुळे, संगीतानुकूल शब्दयोजनेमुळे सर्व संगीतकारांचे आवडते गीतकार म्हणून शांताराम नांदगावकर यांचा लौकिक होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव हे त्यांचे मूळ गाव होते, पण त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले. शांताराम यांच्या लहान वयातच त्यांचे वडील मालोजी नांदगावकर यांचे निधन झाले, त्यामुळे उदरनिर्वाहाकरता त्यांच्या आईला - चंद्राबाई नांदगावकर यांना गिरणीमध्ये नोकरी पत्करावी लागली. त्यासाठी परळला हाफकिन इन्स्टिट्यूटमधील वास्तव्य हलवून त्यांना कुटुंबीयांसमवेत गावात नातेवाइकांकडे राहायला जावे लागले. तुटपुंज्या कमाईत हलाखीचे आयुष्य जगताना शांताराम यांचे शिक्षणही कसेबसे सुरू होते. त्याच सुमाराला भावसंगीताचे सुखावणारे वारे वाहू लागले. गजानन वाटवे, बबन नावडीकर यांचे नाव होत होते आणि ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत होते. दादरला झालेल्या अशाच भावसंगीताच्या कार्यक्रमात ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई’ या गाण्याने शांताराम नांदगावकर प्रभावित झाले. ‘आपणही काहीतरी लिहावे’ असा ध्यास त्यांनी घेतला. हळूहळू या प्रेरणेने त्यांनी दोन-दोन ओळी लिहिण्यास प्रारंभ केला. पण मनासारखे कागदावर उतरत नव्हते. एकीकडे लेखनाविषयीची ओढ, दुसरीकडे घरची बेताची परिस्थिती, शिक्षणाविषयीची आस्था या कसरती करत असताना त्यांचा सुलोचना यांच्याशी विवाह झाला.

           लग्नानंतर पहिले घर सोडून नांदगावकर आपल्या कुटुंबीयांसमवेत ऑपेरा हाऊस येथे राहू लागले. १९६३ च्या सुमाराला रजनीकांत राजाध्यक्ष यांनी संगीतकार दशरथ पुजारी यांच्याबरोबर शांताराम नांदगावकर यांची ओळख करून दिली. दरम्यानच्या काळात सुचलेल्या लयबद्ध ओळी नांदगावकर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवत, ती गीते त्यांनी दशरथ पुजारी यांना दाखवली. त्यांना ती गीते खूप आवडली. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले, दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेले ‘ही नव्हे चांदणी, ही तर मीरा गाते’ हे  नांदगावकरांचे पहिले गीत ध्वनिमुद्रित झाले. या ध्वनिमुद्रणासाठी त्यांना १५ रुपये मानधन मिळाले होते. त्यानंतर थोड्याच दिवसांनी ‘रात्र आहे पौर्णिमेची, तू असा येऊन जा’ या गीताने नांदगावकरांना गीतकार म्हणून ओळख मिळवून दिली. ग.दि. माडगूळकरांनीही त्यांच्या सहजसुंदर गीतरचनांचे कौतुक केले. त्यांच्या गीतलेखनाचा प्रवाह पुढे सातत्याने सुरू राहिला. शांताराम नांदगावकरांनी ७० आणि ८० अशा दोन दशकांमध्ये एक सिद्धहस्त गीतकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वलय निर्माण केले होते. दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, प्रभाकर जोग, अशोक पत्की, अनिल मोहिले, अरुण पौडवाल यासारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. ‘रजनीगंधा’, ‘बंदिनी’, ‘बकुळीच्या तळी’, ‘सजल नयन’ या ध्वनिमुद्रिकांना अतिशय लोकप्रियता मिळाली.

          ‘सूर सनईत नादावला’, ‘हे सावळ्या घना’, ‘विसर प्रीत विसर गीत’ यांसारखी भावविभोर गीते व ‘येऊ कशी प्रिया’, ‘रुपेरी वाळूत’, ‘अनुरागाचे थेंब झेलती’ अशी अल्लड प्रेमगीते ज्या भावुकतेने नांदगावकरांनी लिहिली, त्याच लेखणीने त्यांनी ‘ससा तो ससा’, ‘बे एके बे’ ही सहजसोपी बाळबोध बालगीतेही लिहिली. भक्तिरसपूर्ण अशा ‘हरीनाम मुखी रंगते’, ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘प्रभू मी तुझ्या करातील वीणा’ या रचनाही त्यांनी केल्या.

         अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार अशी त्यांची ख्याती होती. संगीत व चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांना त्यांच्या शीघ्रकवित्वाची प्रचिती आली आहे. अत्यंत लोभस शब्दरचना, गेयता, सहजी तोंडावर रुळणारे धृवपद यांमुळे त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गीतकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. आकाशवाणीकरता ‘कारवाँ चालला’, ‘शांतिदूत’ या संगीतिका लिहिणाऱ्या शांताराम नांदगावकरांनी दूरदर्शनच्या ‘फुलोरा’सारख्या गीतमालेसाठीही गीते लिहिली.

         भावगीतांप्रमाणे चित्रपटासाठीही प्रसंगानुरूप गीते लिहिण्यासाठी त्यांची लेखणी तत्पर होती. १९८० च्या दशकातील ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘गोडीगुलाबी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘धूमधडाका’ अशा चित्रपटांत गीतकार म्हणून शांताराम नांदगावकर हे नाव अपरिहार्यपणे झळकू लागले. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटाची चर्चा कथा, पटकथा, संगीत याबरोबरच गीतांच्या संदर्भातही झाली. सिनेटोन मुव्हीजच्या ‘पैजेचा विडा’ या चित्रपटाची गीते नांदगावकरांनी लिहिली, ती ध्वनिमुद्रितही झाली. ‘कुंकू’, ‘रणांगण’, ‘आक्का’, ‘आई पाहिजे’ या चित्रपटांची गीतेही त्यांनी लिहिली.

         मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीकडेही त्यांची वाटचाल सुरू झाली होती. ‘दूध का कर्ज’ या चित्रपटातील गीते शांताराम नांदगावकरांनी लिहिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित गीतरचना अतिशय ओघवत्या शैलीने लिहिल्या, ‘दलितांचा राजा भीमराव माझा’ या ध्वनिमुद्रिकेतील सर्व गीते लोकप्रियतेच्या शिखरावर होती. याशिवाय ‘एकवीरा देवी’, ‘साईबाबा’, ‘गौतम बुद्ध’ अशा श्रद्धाकेंद्रित गीतरचनाही ध्वनिमुद्रिकांच्या रूपाने प्रसिद्ध झाल्या. त्यांनी जवळजवळ १५०० गणपती गीते लिहिली आहेत.

          कलाक्षेत्राप्रमाणे शांताराम नांदगावकर यांचा राजकीय क्षेत्राशीही संबंध आला. १९९५ साली ‘महाराष्ट्र स्टेट कौन्सिल’साठी त्यांची शिवसेनेकडून निवड झाली. १९९४ साली त्यांची ‘स्टेज परफॉर्मन्स स्क्रूटिनी बोर्ड’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कलाक्षेत्राशी एकरूप झालेले नांदगावकर सुरुवातीच्या काळात एअर इंडिया या विमानकंपनीत नोकरी करत होते. या काळातही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी त्यांचा स्नेह जुळला. कालांतराने त्यांनी नोकरीमधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि निष्ठेने गीतलेखन केले. नवी दिल्ली येथे १९७४ साली ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून नांदगावकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘सूरसिंगार’चा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. ‘बकुळीच्या तळी’ हा त्यांच्या कवितांचा संग्रह आणि ‘रुपेरी वाळूत’ हा ध्वनिमुद्रित गीतांचा संग्रह प्रकाशित झाला आहे.

         नांदगावकर यांनी १९७९ साली ‘संत सखू’ या विषयावर नृत्यनाट्य लिहिले. वैजयंतीमाला यांनी सादर केलेले हे नृत्यनाट्य वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या गौतम बुद्धांवर आधारित एका मालिकेचे लेखन शांताराम नांदगावकर यांनी केले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही मालिका पाहिली आणि त्या प्रभावित झाल्या. या मालिकेचे सर्व भाषांमध्ये रूपांतर करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

        आयुष्याच्या अखेरीला काही वर्षे ‘अल्झायमर’ या विकाराने ते त्रस्त होते. नांदगावकरांनी मुंबईमध्ये वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी कलाजगताचा निरोप घेतला. प्रशांत व मिलिंद ही शांताराम नांदगावकर यांची दोन मुले आणि एक मुलगी आज कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.

- नेहा वैशंपायन

नांदगावकर, शांताराम मालोजी