Skip to main content
x

नार्वेकर, संजय शशिकांत

       राठी चित्रपटांतील आणि नाटकांतील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे संजय नार्वेकर. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबईतील ए.एस.ए.सी. इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील शशिकांत अनंत नार्वेकर हे विक्रीकर विभागात नोकरीला होते. संजय नार्वेकर यांनी रुईया महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी प्राप्त केली. याचदरम्यान त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘आम्ही जगतो बेफाम’ हे त्यांनी काम केलेले पहिले नाटक.

विविध चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारलेल्या संजय यांची ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील श्रीरंग देशमुख (रंगा) ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि लक्षात राहिली. ‘खबरदार’, ‘चेकमेट’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या चित्रपटांतही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

मराठी चित्रपटांसह संजय यांनी नाटकांत साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांनी चांगल्याच उचलून धरल्या. ‘रंग्या रंगीला रे’, ‘ऑल द बेस्ट’, ‘लोच्या झाला रे, ‘बाजीराव मस्त मी’, ‘झोल बच्चन’ आणि ‘आमच्यासारखे आम्हीच’ या काहीशा विनोदी ढंगाने जाणाऱ्या नाटकांच्या बरोबरीनेच संजय यांनी जयंत पवार लिखित ‘अधांतर’, विजय तेंडुलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ आणि चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘खेळीमेळी’ या नाटकांत गंभीर स्वरूपाच्या उत्तम भूमिका साकारल्या. सुबकतर्फे हर्बेरियमच्या उपक्रमातील जी पाच नाटके रंगमंचावर आली, त्यातील ‘हमीदाबाईची कोठी’ या पाचव्या नाटकात संजय नार्वेकर यांनी लुक्का भाई ही भूमिका साकारली. नाना पाटेकर यांनी पूर्वी साकारलेल्या याच भूमिकेशी संजय यांच्या अभिनयाची तुलना होण्याची शक्यता असूनही त्यांनी त्यांच्या परीने या भूमिकेला योग्य न्याय दिला.

फक्त मराठी नाटक आणि चित्रपटच नाही, तर संजय यांनी अनेक हिंदी चित्रपटांतूनही छोट्या, तरीही लक्षणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘वास्तव ः द रिअ‍ॅलिटी’ या चित्रपटात संजय दत्त यांच्यासह केलेली ‘देड फुट्या’ ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली. याच भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या व्यतिरिक्त ‘हंगाम’ चित्रपटातील अनिल, ‘ये तेरा घर ये मेरा घर’मधील नामदेव, ‘बाघी’तील चक्कू या भूमिकाही उल्लेखनीय ठरल्या.

'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचे दोन्ही भाग, 'खारी बिस्किट', 'अशाच एका बेटावर', 'गुलाम बेगम बादशाह', 'फक्त सातवी पास' अशा काही चित्रपटातही त्यांनी आगळ्या भूमिका केल्या. 

संजय नार्वेकर यांना क्रिकेट आणि फुटबॉल या खेळात विशेष रस आहे. रुईया महाविद्यालयामध्ये असताना फुटबॉलच्या विविध सामन्यात ते सहभागी झाले आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात असूनही ते आवर्जून या खेळांची आवड टिकवून आहेत.

 - आसावरी  चिपळूणकर

नार्वेकर, संजय शशिकांत