Skip to main content
x

नायक, प्रभाकर मालोजी

     साधारण 1942 मध्ये नवयुग  सिनेटोनमध्ये प्रोजेक्शनिस्ट म्हणून प्रभाकर नायक यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी काही छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. नजम नकवी यांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या ‘पन्ना’, ‘पारो’, ‘कमरा नं.101’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. प्रभातच्या गाजलेल्या ‘कीचकवध’ या चित्रपटात प्रभाकर नायकांनी तरुण वयात ‘कंचुकी’ या जख्ख म्हाताऱ्याची छोटीशी पण लक्षवेधी भूमिका केली. 1947 साली नजम नकवी पाकिस्तानात गेल्यानंतर, शौरी, भालजी पेंढारकर यांच्याकडे ‘थापाड्या’, ‘पटलं तर व्हय म्हणा’ या चित्रपटांसाठी साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले. नंतरच्या काळात ‘तेवढं सोडून बोला’, ‘दाम करी काम’, ‘उनाड मैना’ या चित्रपटात चरित्र भूमिकाही केल्या. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, त्यांतले ‘पाठराखीण’, ‘खंडोबाची आण’, ‘थापाड्या’ (रौप्यमहोत्सवी), ‘चांडाळ चौकडी’ इ. महत्त्वाचे चित्रपट. त्यांनी ‘लाथ मारीन तिथे पाणी’ (1981) या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आणि पुढच्या काळात ते निवृत्त झाले.

- सुधीर नांदगावकर

नायक, प्रभाकर मालोजी