Skip to main content
x

नगरकर, गुणवंत हणमंत

             ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या १९२० च्या दरम्यान सुरू झालेल्या भारतीय पुनरुज्जी-वनवादी कलाचळवळीतील सुरुवातीच्या काळातील नगरकर हे एक महत्त्वाचे  चित्रकार होते. पारदर्शक जलरंगाचे थर एकावर एक देत निर्माण होणाऱ्या ‘वॉश टेक्निक’ या पद्धतीत त्यांनी विलक्षण प्रावीण्य मिळविले. त्या सोबतच जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांनी या पद्धतीने दर्जेदार चित्रनिर्मिती करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या पद्धतीच्या कलाशैलीचा विकास आणि प्रचार व प्रसारही केला.

               गुणवंत हणमंत नगरकर हे मूळचे वर्‍हाडातील चांदूरबाजार गावचे रहिवासी होत. त्यांचे वडील पटवारी म्हणून काम करीत. मोठे कुटुंब असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. चांदूरबाजार येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गुणवंतचे मामा गोपाळ देशपांडे यांच्या मदतीने त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील नीलसिटी हायस्कूलमध्ये झाले. याच दरम्यान शाळेतील चित्रकला शिक्षकांमुळे गुणवंत यांना चित्रकलेत विलक्षण आवड निर्माण झाली व त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन मठ्ठ विद्यार्थ्यांत गणना होऊ लागली. ज्याला अभ्यास जमत नाही ते चित्रकार होऊ शकतात, अशी त्या काळची नव्हे, १९६०-६५ पर्यंत समाजाची भावना होेती. त्यामुळे गुणवंत यांची चित्रकला शिक्षक होण्यापलीकडे योग्यता नाही असे नातेवाईक, मित्रमंडळी व शिक्षक म्हणत. यातून ते एका बाजूला निराश झाले, तर दुसऱ्या बाजूला जिद्द वाढून त्यांनी चित्रकार व्हायचा निर्णय घेतला. मामाच्या आधाराने कसेबसे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत यांनी मुंबईला येण्यापुरते भाडे व थोडेसे पैसे घेऊन मुंबई शहर गाठले आणि एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. पण पैशाअभावी मुंबईत शिक्षण घेणे शक्य नव्हते. म्हणून ते निराश अंतःकरणाने नागपूरला परत आले. आपली साधी चित्रकला शिक्षक होण्याची इच्छाही सफल होत नाही यामुळे गुणवंत वेडेपिसे झाले.

               आपल्या भाच्याची ही अवस्था बघून गोपाळराव देशपांड्यांनी आपले मुंबईतील मित्र डॉ. भोजराज यांना गुणवंतची एका वर्षासाठी मुंबईत व्यवस्था करण्याची कळकळीची विनंती केली. मग गुणवंत यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे शिक्षण सुरू झाले. काही काळातच मध्य प्रांत सरकारची शिष्यवृत्तीही त्यांना मिळू लागली व त्यांचा अभ्यास व्यवस्थित सुरू झाला.

               सॉलोमन यांची १९१९ मध्ये जे.जे.चे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. पुरातन भारतीय कलेचा पुनरुद्धार केला पाहिजे असे सॉलोमन यांचे मत होते. तसेच त्यांनी १९२० मध्ये ‘न्यूड क्लास’ सुरू केला. त्या योगे विद्यार्थ्यांना नग्न मानवी शरीराकृतीवरून थेट अभ्यास करता येऊ लागला. याचा नगरकरांना विलक्षण फायदा झाला. पाश्‍चिमात्य पद्धतीच्या मानवाकृतींचे लयदार रेषेतील रेखाटन व छायाप्रकाशाचा वापर टाळून केलेले सपाट पद्धतीचे भारतीय चित्रशैलीवरून प्रेरणा घेतलेले रंगलेपन अशी शैली त्यांनी विकसित केली.

               याच काळात सॉलोमन यांच्या प्रोत्साहनाने नगरकरांनी ‘रजनी’ (नाईट) हे भित्तिचित्र काढले. या चित्राला गव्हर्नरचे पारितोषिक मिळाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या १५ फेब्रुवारी १९२० च्या अंकात या चित्राबद्दल अभिप्राय प्रसिद्ध झाला.

               त्यात म्हटले होते, ‘मि. नगरकरांच्या ‘नाईट’ चित्रातली, स्वत:ची स्वप्ने आपल्यापुढे उलगडणारी, डोळ्यांमध्ये उत्सुकता असलेली निरागस काव्यात्म वादळ असलेली ती म्हणजे निव्वळ एक वेडवळ मुलगी नाही. हे नुसते चित्रच नाही तर कलेचे नवे विश्‍व आहे.’

               नगरकर १९२० मध्ये पदविका परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांना १९२१ मध्ये कलाशिक्षणातील प्रावीण्य व सातत्याबद्दलचे मानाचे ‘मेयो पदक’ही मिळाले. याच काळात सॉलोमन यांनी म्युरल क्लास सुरू केला व जे.जे.च्या भिंतीवर १६ फूट x ९ इंच उंच व ३३ फूट ८ इंच आकाराचे ‘कलादेव्या: प्रतिष्ठा’ हे भव्य भित्तिचित्र म्यूरल क्लासच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतले. त्यात नगरकरही होते. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड लॉइड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्यांना हे काम एवढे आवडले, की त्यांनी गव्हर्न्मेंट हाउसमधील दरबार हॉलच्या सजावटीचे काम या विद्यार्थ्यांना दिले. त्यात नगरकरांचा महत्त्वाचा वाटा होता. १९२२ मध्ये त्यांचा विवाह मनोरमा सावळापूरकर यांच्याशी झाला.

               नगरकरांची १९२३ मध्ये जे.जे.त शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. भारतीय पद्धतीने शिकवण्यासाठी सॉलोमन यांनी खास वर्ग सुरू केला व भारतीय पद्धतीने वॉश टेक्निकमध्ये स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित केलेल्या नगरकरांची ‘फिगर कॉम्पोझिशन’ हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. वेम्बले येथे १९२४ मध्ये ब्रिटिश साम्राज्यप्रदर्शन करण्याचे ठरले. त्यात मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टलाही आमंत्रित करण्यात आले. या प्रदर्शनासाठी छतावरील सात घोड्यांच्या रथात बसलेले सूर्यदेवतेचे भव्य चित्र नगरकरांनी रंगविले होते.

               त्यांनी १९२१ पासून सातत्याने भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीत अनेक चित्रे रंगविली व त्यांना भारतातील अनेक प्रदर्शनांतून पारितोषिकेही मिळाली. त्यांची चित्रे परदेशांतील प्रदर्शनांतून प्रदर्शित झाली. त्यांनी १९२८ मध्ये दिल्लीतील इंपीरिअल सेक्रेटरिएटमधील प्रिन्स चेंबरसाठी भित्तिचित्रे रंगविली. ती हिंदू धर्म आणि वर्णाश्रम व्यवस्था या विषयावर होती. त्याबद्दल नामवंत अभ्यासक व कलासमीक्षक सी. पर्सीब्राउन यांनी गौरवाने लिहिले होते,

               ‘संस्थानिकांसाठी असलेल्या प्रतीक्षा दालनाच्या छताचे सुशोभीकरण ही एक चांगली संधी होती व तिचा मुंबईच्या जी.एच. नगरकरांनी पूर्ण फायदा उठवला. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास आणि ब्रह्मचर्य असा हिंदू आर्य जीवनपद्धतीचा विकास मानवाकृतींमधून दाखवला आहे. त्याची एकूण तंत्रपद्धती योग्य अशीच आहे. वास्तुकलेचे भान ठेवत रचना योग्य तऱ्हेने केलेली आहे, मानवाकृतींचे आरेखन चांगले आहे, पारंपरिक कल्पना चांगल्या प्रकारे योजली आहे. अंगकांती नैसर्गिक आहे. रंगांचे सपाट अवकाश आणि रेखांकनाची गुणवत्ता विशेष आल्हाददायक आहे. भारतीय जीवनपद्धतीत रस असलेल्यांना, प्रत्येक वर्ण्य विषयातील अर्थाची खोली आणि प्रतीकात्मकता अगदी भरभरून प्रत्ययाला येईल. धर्मगुरूभोवती मंडलाकार बसलेल्या श्रोत्यांच्या पाठी दाखविण्यातल्या नेहमीच्या अडचणीवर चित्रकाराने कलात्मकतेने मात केली आहे.’

               एका बाजूला अशी प्रतिष्ठेची कामे करीत असतानाच नगरकरांची स्वत:ची भारतीयत्व व्यक्त करणारी चित्रनिर्मितीही सातत्याने सुरू होती. त्यांचे १९२० मधील ‘वन-गमन आदेश’ (बॅनिशमेंट ऑफ राम अँड सीता) हे चित्र प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमने खरेदी केले. त्यांच्या वॉश टेक्निकमधील चित्रांना १९२१ मध्ये मद्रास फाइन आर्ट सोसायटी व बॉम्बे आर्ट सोसायटीचे बक्षीस मिळाले. त्यांचे १९२६ मधील ‘राधाज रिकन्सिलिएशन’ हे चित्र गाजले व ते १९२७च्या लंडनमधील साम्राज्य प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. त्यांच्या ‘भक्तिप्रताप’, ‘ट्रायफ ऑफ जिव्होशन’ या द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगावरील चित्राला १९२६ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे विशेष पारितोषिक मिळाले. त्यांच्या ‘द्रौपदीस्वयंवर’ या चित्राला १९२७ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे मानाचे सुवर्णपदक मिळाले. त्यांचे ‘दिव्य स्पर्श’ (divine touch ) हे चित्र १९३४ मध्ये ‘मॉडर्न इंडियन आर्ट’ या लंडनमधील प्रदर्शनात प्रदर्शित केले गेले. या चित्राची प्रतिकृती कुचबिहार या संस्थानाच्या राणीने करून घेतली.

               अशा प्रकारे त्यांची भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीतील चित्रे मान्यता व सन्मान मिळवीत असतानाच ते जे.जे. स्कूलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनाही या शैलीत काम करण्याची प्रेरणा देत होते. पुढील काळात देशभरातून आलेल्या जे.जे.तील अनेक विद्यार्थ्यांनी या शैलीत काम करण्यात प्रावीण्य मिळवले. हे विद्यार्थी आपापल्या गावी परतले व त्यांनी सुरुवातीला क्लास व त्यानंतर कलाशाळा सुरू केल्या. त्यातून ही भारतीयत्वाची कलाचळवळ तत्कालीन संपूर्ण मुंबई प्रांतात पसरली व वॉश टेक्निकमधील चित्रे गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैद्राबाद संस्थान अशा अनेक ठिकाणी रंगविली जाऊ लागली. त्यावर नगरकरांच्या शैलीचा प्रभाव असे. ज.द. गोंधळेकर, गोपाळ देऊसकर, जांभळीकर, धोपेश्‍वरकर, व्ही.एस. गुर्जर अशा अनेक चित्रकारांनी पुढील काळात या शैलीत प्रावीण्य मिळविले. पण खर्‍या अर्थाने या शैलीशी एकनिष्ठ राहिले ते रघुवीर चिमुलकर.

               विशेष म्हणजे नगरकरांच्या चित्रशैलीचा चिमुलकर यांच्या चित्रांवर प्रभाव जाणवतो व यातूनच नगरकरांचे मोठेपणही सिद्ध होते. नगरकर प्रामुख्याने कॉम्पोझिशन हा विषय शिकवीत. यासाठी विद्यार्थी पहिले सहा महिने नगरकरांच्या वर्गात शिकत, तर पुढील सहा महिने त्यांना अहिवासींच्या वर्गात शिकावे लागे. नगरकरांच्या वर्गात एका विवक्षित शिस्तीत काम करावे लागे. वॉटमन कागद व्यवस्थित ताणून त्यावर पेन्सिलने रेखन करणे, त्यानंतर ते रेखन शून्य नंबरच्या ब्रशने ब्राउन मॅडर रंगाने आरेखित करणे व पुढे त्यामध्ये रंग भरत जाणे या अवस्थांमधून जावे लागे.

               एकदा ही रंगयोजना पूर्ण झाली की सेबल हेअरचा वॉश ब्रश घेऊन हळुवारपणे चित्राला शुद्ध पाण्याची अंघोळ घालून रंगाचा वरचा थर घालवून कागदात मुरलेला रंग शिल्लक ठेवायची प्रक्रिया पूर्ण होई. त्यानंतर पुन्हा रंग भरणे व पुन्हा अंघोळ घालणे असे दहा/बारा वेळा केले जाई. यानंतर चित्राच्या रंगसंगतीत एकजिनसीपणा आणण्यासाठी चित्राच्या मूळ रंगसंगतीचा एक साधा किंवा ग्रेडेड वॉश द्यावा लागे. त्यानंतर कलाकुसरीचे काम आणि चायनीज व्हाइट हा पांढरा रंग वापरून डोळे, दागिने, वस्त्रांच्या किनारी आदींचे रेखन करत. नगरकरांचा पारदर्शक जलरंग वापरण्यावर कटाक्ष असे. फक्त दागिने व डोळे यांसाठी चायनीज व्हाइट वापरण्याची मुभा होती. नगरकर स्वत:ही याच पद्धतीने चित्रे रंगवत.  त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना अत्यंत मोकळ्या मनाने व काहीही लपवा-छपवी न करता या पद्धतीने चित्रे काढण्याचे ज्ञान दिले हे विशेष.

               नगरकरांचे वास्तववादी पाश्चात्य शैलीवरही प्रभुत्व होते. नागपूर विद्यापीठातर्फे १९३८ मध्ये त्यांचे आश्रयदाते रावबहादूर लक्ष्मीनारायण यांचे पूर्णाकृती व्यक्तिचित्र रंगविण्यासाठी नगरकरांना आमंत्रित करण्यात आले. तसेच १९४० मध्ये बडोदा नरेश प्रतापसिंह गायकवाड यांच्या राज्यारोहण प्रसंगाचे ८’*६’ आकाराचे भव्य चित्र त्यांनी संस्थानाच्या आमंत्रणानुसार रंगविले. याशिवाय त्यांनी उद्योग-पतींसाठी भारतीय शैली व भारतीय संस्कृतीवरील चित्रे रंगविली. त्यांतील ‘शकुंतला व तिच्या सख्या’ हे १९४० मध्ये रंगविलेले १०’*५’ आकाराचे उद्योजक रामनारायण रुइया यांच्यासाठी केलेले चित्र विशेष गाजले.

               नगरकरांचे ‘द्रौपदीवस्त्रहरण’ व ‘द्रौपदीस्वयंवर’ ही खरोखरीच अत्यंत विलक्षण अशी चित्रे आहेत. द्रौपदीस्वयंवर हे चित्र तर ५’*३’ अशा भव्य आकाराचे असून एवढ्या मोठ्या आकारात केलेले वॉश टेक्निकसारख्या अवघड माध्यमातील हे चित्र म्हणजे खरोखरीच एक चमत्कार वाटतो. या चित्रात अक्षरश: असंख्य मानवी आकृती असून त्यांतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे आविर्भाव व त्यातून होणारे भावदर्शन यांतून द्रौपदीस्वयंवराचे नाट्य फुलत जाते. नगरकरांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तैलरंगासारख्या माध्यमातही ते भारतीय पुनरुज्जीवनवादी पद्धतीची चित्रे समर्थपणे रंगवीत. ‘दिव्य स्पर्श’, ‘राधाविलास’ किंवा दिल्लीच्या इंपीरिअल सेक्रेटरिएटमधील चित्रे याची साक्ष देतात.

               या चित्रांतील शृंगार व भक्ती असे भाव व्यक्त करताना ते आत्ममग्न, उत्कट प्रतिमानिर्मिती करतात. त्यात रेषेचा सफाईदारपणा व त्यातून मानवी शरीराची प्रमाणबद्धता व्यक्त करीत असतानाच आकर्ण भुवया, अर्धोन्मीलित नेत्र, दागदागिने अशा काही बारकाव्याने रंगवतात, की त्यातून निर्माण होणार्‍या आकारविश्‍वाचा प्रेक्षक आपोआप एक भाग बनतो. तैलरंगासारख्या माध्यमात नगरकरांचे हे कर्तृत्व खरोखरीच थक्क करणारे आहे.

               नगरकर वृत्तीने धार्मिक व साधे होते. कोट, पँट व डोक्यावर टोपी घातलेले आणि कपाळावर गंध लावलेले नगरकर कामाला बसले की तासन्तास तल्लीन होत. अशा वेळी त्यांना जेवणखाण सुचत नसे. पण चहा व सिगारेट मात्र वारंवार लागे आणि कामाच्या तंद्रीत चहा थंड होऊन जाई. ते तसाच थंड चहादेखील सिगारेट ओढत पीत. नगरकरांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू होते. त्यामुळे वाचनासोबतच त्यांनी तत्कालीन विविध नियतकालिके, मासिकांमधून लेखनही केल्याचे आढळते. प्रसंगोपात्त  ते कवितालेखनही करीत असत.

               दरम्यान सॉलोमन साहेबाच्या कारकिर्दीत १९२० मध्ये सुरू झालेल्या भारतीय चित्रपद्धतीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना पाश्चिमात्य वास्तवदर्शी चित्रनिर्मिती करणाऱ्या कलावंतांचा विरोध होता. पण १९२० ते १९३५ या काळात ही चळवळ फोफावली व त्यांतील नगरकरांसारख्या आद्य कलावंताची काही प्रमाणात दखलही घेतली गेली. १९३६ मध्ये सॉलोमन निवृत्त होऊन जेरार्ड यांची जे.जे.च्या प्राचार्यपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबईची कलाचळवळ आधुनिकतेच्या वाटेने गेली. कलाविषयक भूमिकेतील मतभेदांमुळे जेरार्ड यांच्या काळात नगरकरांचा व अहिवासींचा वर्ग सुरू राहिला तरी नगरकरांची काहीशी अवहेलनाच झाली. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. ऐन इंग्रज राजवटीत सुरू झालेली भारतीयत्वाची चळवळ आता या स्वतंत्र देशात जोमाने सुरू होईल अशी आशा नगरकरांना वाटू लागली. नगरकरांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिलेल्या भाषणात याचे प्रत्यंतर येते. त्यात ते म्हणतात,

               ‘‘आपल्या भारतीय कलेला जर स्थिरत्व आणून तिची उन्नती करावयाची असेल, तर आपल्या प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन केल्याशिवाय आपली कला जिवंत राहणे शक्य नाही. आपली प्रिय मातृभूमी परसत्तेच्या मगरमिठीतून मुक्त होऊन नुकतीच स्वतंत्र झाली आहे. आज आपल्या हिंदी संस्कृती व कलेचे मर्म जाणून ते पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. आपली विशिष्ट परंपरा व पद्धती जपताना केवळ हिंदी कलेचा अभिमान बाळगून चालणार नाही. नक्कल करून भागणार नाही.’’

               पण प्रयोगशील कला व आधुनिकतेचा रेटा असा विलक्षण होता, की १९४९ मध्ये नगरकर निवृत्त झाल्यावर तो वर्ग बंद करण्यात आला. त्यानंतर  प्रतिभावंत व विलक्षण कौशल्य असलेल्या नगरकरांची, कलाजगताने दखल घेतली नाही आणि आज तर ‘गुणवंत हणमंत नगरकर’ हे नाव विस्मरणातच गेले आहे. पण बॉम्बे स्कूलच्या कलापरंपरेत भारतीयत्व जपणाऱ्या पुनरुज्जीवनवादी कलाचळवळीत त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान होते, हे अत्यंत कमी संख्येत असणाऱ्या त्यांच्या चित्रांमधून सिद्ध होते. त्यांची कलानिर्मिती, त्यामागचा विचार व त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अत्यंत महत्त्वाचे असून भारतीय कलेच्या इतिहासात त्याची नोंद करावीच लागेल.

               नगरकरांच्या १९५६ मधील मृत्यूनंतर तब्बल ५४ वर्षांनी, २०१० मध्ये त्यांची चित्रे जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘मास्टर स्ट्रोक्स’ या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली.

- सुहास बहुळकर

 

संदर्भ
संदर्भ: १. सॉलोमन, डब्ल्यू.ई. ग्लॅडस्टन; ‘बॉम्बे रिव्हायव्हल ऑफ इंडियन आर्ट’; १९२४. २. ब्राउन, पर्सी; ‘द रेल्वे मॅगझिन’; १९२९. ३. सॉलोमन, डब्ल्यू.ई. ग्लॅडस्टन; ‘म्यूरल पेंटिंग ऑफ द बॉम्बे स्कूल’; टाइम्स ऑफ इंडिया प्रेस; १९३०. ४. नगरकर, गुणवंत हणमंत; ‘कलेक्शन ऑफ माय वर्क इन ब्रश अॅण्ड पेन’; अल्बम. ५. धोंड, प्र.अ.; ‘रापण’; मौज प्रकाशन गृह; १९७९. ६. बहुळकर, सुहास; ‘मास्टर स्ट्रोक्स तखखख’ जहांगीर आर्ट गॅलरी; २०१०. ७. बहुळकर, सुहास; ‘कलेतील भारतीयत्व आणि स्वातंत्र्यलढा’; दीपावली २०११.
नगरकर, गुणवंत हणमंत