Skip to main content
x

पाचारणे, उत्तम रोहिदास

                धुनिक पद्धतीने विविध माध्यमांत व स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तम रोहिदास पाचारणे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील, कर्जत तालुक्यात चखालेवाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सोंजता. उत्तम यांना चार भावंडे होती. उत्तम यांचे प्राथमिक शिक्षण चखालेवाडी येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण कर्जतमधील शिंदे येथे झाले. चित्रकला आणि शिल्पकलेचे प्राथमिक शिक्षण उत्तम यांनी आपल्या वडिलांकडे घेतले. त्यांच्या वडिलांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते व रूढार्थाने त्यांनी चित्रकलेचे शिक्षणही घेतले नव्हते. पण त्यांना जन्मतःच चित्र व शिल्पकलेची देणगी लाभली होती.

                सणासुदीच्या काळात त्यांच्या गावी लेझीम खेळायची पद्धत होती. लेझीम खेळताना मोठमोठाले ढोल वाजवले जात. त्या ढोलावर राम, मारुती, छत्रपती शिवाजी महाराज आदींची चित्रे असत. ही चित्रे रोहिदास स्वतः काढत. लहान वयापासूनच उत्तम आपल्या वडिलांना या कामी मदत करत. कालांतराने ढोलांवरची देवादिकांची चित्रे कालबाह्य झाली व त्या जागी सिनेमातील नट-नट्यांची चित्रे झळकू लागली. ही चित्रे फटाक्यांच्या पाकिटांवर असत. रोहिदास ही चित्रेही काढत असत. याही कामात उत्तम आपल्या वडिलांना मदत करत. त्यामुळे लहान वयातच रंगरेषा, रचना, प्रमाण यांबाबत उत्तम यांची नजर व हात तयार होत गेला.

                वडिलांचा मुख्य व्यवसाय चामडे कमावण्याचा असल्यामुळे उत्तम यांना त्याही कलेचे शिक्षण मिळाले. रोहिदास हे शिल्पाकृतीही घडवत. पाषाण व लाकूड यांतून देवादिकांच्या मूर्त्या घडवण्यात त्यांचा हातखंडा होता. शिल्पकलेचे धडे उत्तम यांना वडिलांकडूनच मिळाले. महाराष्ट्रात १९७२ मध्ये दुष्काळ पडला, तेव्हा नाला बंडिंगसारखी दुष्काळी कामे सरकारने सुरू केली. त्या काळात रोहिदास ही हत्यारे घडवण्याचे आणि धार लावण्याचे काम करीत. उत्तम पाचारणे यांनी तेही काम शिकून घेतले.

                रोहिदास हे जरी खेड्यात राहत असले, तरी त्यांनी काळाची पावले ओळखली होती. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणून उत्तम यांना त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत दाखल केले. ‘स्वतः कमवा आणि शिका’ हे या शाळेचे बोधवाक्य. त्यामुळे वर्गात नकाशे काढणे, भारतीय संस्कृती, भारतीय लोकांची वेशभूषा अशा विषयांवरील चित्रे करण्याचे काम उत्तम पाचारणे यांनी हौसेने केले.

                रयत शिक्षण संस्थेत असताना ते एस.एस.सी. झाले. शाळेतील लक्ष्मण ताटे या कलाशिक्षकांनी पाचारणे यांच्यातील चित्रकलेचा गुण हेरला व त्यांना उत्तेजन दिले. उत्तम यांची चित्रकलेतील गती पाहून   कलामहाविद्यालयात जाऊन पुढील शिक्षण घ्यावे असे त्यांनी सुचवले. त्यानुसार पाचारणे यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला. तेथील वास्तव्यात त्यांच्यावर एस.टी. आहीर आणि दत्तात्रेय आपटे या शिक्षकांचा मोठा प्रभाव पडला. तिथे त्यांनी ए.टी.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. संत एकनाथ वसतिगृह, वरळी व नंतर गौतम वसतिगृह, जोगेश्‍वरी येथे ते राहत. याच काळात बाबा आमटे यांच्या कार्याने पाचारणे यांचे तरुण मन भारावून गेले. त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा म्हणून आपण शिल्प तयार करावे असे त्यांना मनःपूर्वक वाटले आणि ‘होमेज टू आनंदवन’ हे अ‍ॅल्युमिनिअम माध्यमातील शिल्प साकारलेल्या त्याच दरम्यान त्यांचा ज्योती पवनीकर यांच्याशी १९८५ मध्ये विवाह झाला. संसार मांडायला जागा हवी होती, ती मृणाल गोरे यांच्या प्रयत्नाने मिळाली. या दरम्यान ते चित्रकार गोपाळ अडिवरेकरांच्या संपर्कात आले व बॉम्बे आर्ट सोसायटी या संस्थेच्या कार्यात सहभागी झाले. समाजातील चांगल्या गोष्टीची दखल कलाकाराने घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे या भावनेतून व अर्थार्जनासाठी अमूर्त शिल्पकलेकडून पाचारणे स्मारकशिल्पाकडे वळले. बोरिवली येथील स्वामी विवेकानंदांचा पुतळा, अंदमान येथील सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यज्योत व स्मारकशिल्प, मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रमात सहभागी झालेल्या वीरांचे शिल्प ही पाचारणे यांची काही उल्लेखनीय स्मारकशिल्पे आहेत. मराठवाड्यातील मुक्तिसंग्रमाच्या शिल्पात दहा फूट उंचीचे आठ खांब असून त्यांवर स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी ३२ वीरांची उठावशिल्पे आहेत. धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा अश्‍वारूढ पुतळा, मंत्रालयासमोरील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा, अहिल्याबाई होळकर यांचा औरंगाबाद येथील पुतळा, गोविंदभाई श्रॉफ, वीर अब्दुल हमीद मेमोरिअलमधील शिल्पे व गुरु-शिष्य स्मारक ही पाचारणे यांची काही अन्य स्मारकशिल्पे होत.

                पाचारणे यांनी अनेक एकल व समूह प्रदर्शने केली असून विविध संस्थांच्या अखिल भारतीय प्रदर्शनांत भाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमधील वार्षिक प्रदर्शनात १९७९ मध्ये ‘ऱ्हीदम ’ या त्यांच्या शिल्पाला सुवर्णपदक मिळाले. स्कायलॅब कोसळण्याच्या भीतीने धास्तावलेल्या ‘बर्निंग ह्युमन’ या शिल्पाला १९८५ साली ललित कला अकादमी, नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘होमेज टू आनंदवन’ या शिल्पाला १९८६ या युवा वर्षानिमित्त ललित कला अकादमीकडून पुरस्कार मिळाला, तसेच १९९० मध्ये त्यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                - प्रकाश भिसे

पाचारणे, उत्तम रोहिदास