Skip to main content
x

पाटील, मनीषा प्रभाकर

                  चित्रकलेसोबतच कलाइतिहास या विषयाच्या अभ्यासक स्त्री - चित्रकार म्हणून मनीषा प्रभाकर पाटील कार्यरत आहेत. कोलकात्याच्या शालेय जीवनातून मिळालेल्या प्रोत्साहनाने त्यांना चित्रकलेत करिअर करण्याची ऊर्जा मिळाली. मनीषा पाटील यांचा जन्म मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे झाला. आईचे नाव कुंदा. नोकरीनिमित्त वडील विनायक जोशी कलकत्त्याला स्थायिक झाले. महाराष्ट्र मंडळाचा सहवास आणि मराठीबरोबरच इंग्रजी व बंगाली वातावरणाचा संस्कार मनीषा पाटील यांच्यावर शालेय जीवनात झाला. अशोका गर्ल्स स्कूल, कलकत्ता येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. संगीत व खेळाची आवड असूनही चित्रकला स्पर्धेतील मिळालेल्या पदकामुळे त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली होती.

                 १९७७ मध्ये मनीषा वडिलांसह कलकत्ता सोडून नागपूरला स्थलांतरित झाल्या. चित्रकार ना.ब.डिखोळे यांच्या कलाशाळेतून इंटरमीजिएट ही परीक्षा सुवर्णपदकासह त्या उत्तीर्ण झाल्या. आई कुंदाताईंमुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली. चित्रकलेतील आवड लक्षात घेऊन मनीषा पाटील यांनी नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयात पेंटिंगसाठी प्रवेश घेतला. १९८४ मध्ये बी.एफ.ए. ही पदवी प्राप्त केल्यावर बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात मनीषा यांनी कलाइतिहास विषयासाठी प्रवेश घेतला. एम.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. बडोद्यातील चित्रकारशिक्षक यांचे मार्गदर्शन व बाहेरून येणारे कलामर्मज्ञ यांच्या सोबत होणारा विद्यार्थ्यांचा संवाद यांतून त्यांच्या अभ्यासाच्या दिशा ठरत गेल्या. या सोबत कलाइतिहास या विषयाचे अध्यापन करणे त्यांना आवडू लागले. नोकरीची संधी चालून आली व मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये मनीषा जोशी यांचे कलाइतिहासाचे अध्यापन सुरू झाले.

                 या काळात त्यांची चित्रनिर्मिती आणि कलाइतिहासाचे अध्यापन असे दोन्ही सुरू असे. यातून विविध कला-प्रवाह, कलाचळवळी यांच्या अभ्यासातून मनीषा यांची स्वत:ची शैली विकसित झाली. या सर्वांचे प्रतिबिंब डॉ. त्यांच्या कलानिर्मितीत दिसून येते. इतिहासजमा होणार्‍या अनेक वस्तूंचे, घटनांचे आणि संस्कारांचे चित्रण हेच त्यांचे विषय ठरले. याच काळात त्यांचा प्रा. प्रभाकर पाटील यांच्याशी १९८५ मध्ये विवाह झाला.

                 ‘विदर्भातील जैन मिनिएचर पेंटिंग’ हा त्यांच्या आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर प्रा.दीपक कन्नल यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ मध्ये ‘डॉक्टरेट’ ही उपाधी त्यांना वडोदरा विद्यापीठातून प्राप्त झाली. चित्रकार पती प्रा. प्रभाकर पाटील यांच्यासोबत  त्यांनी ‘संस्कृती’, ‘सॅण्ड्स ऑफ टाइम’, ‘टू फॉर टू थाउजण्ड्स’ अशी चित्रांची प्रदर्शने केली. २००६ च्या कॅमलिनच्या ‘युरोटूर’साठी त्यांची निवड झाली. या सोबत त्यांनी ‘आर्ट टुडे’, दिल्ली २०००, ‘आर्ट फॉर कन्सर्न’, ‘हार्मनी शो २०००’, ‘बिर्ला अकादमी आर्ट अॅण्ड कल्चर’, ‘समीकल आर्ट गॅलरी २००७’ इत्यादी अनेक समूह प्रदर्शनांमध्ये भाग घेतला.

                 तरुण पिढीतील व जुन्या चित्रकारांवरील संदर्भवजा लेखन करणाऱ्या समीक्षिका व महिला चित्रकार म्हणून मनीषा पाटील कार्यरत असून त्यांनी नागपुरातील ‘मारबत’ परंपरा व चित्रकार याकूब मलक, मसोजी, डिखोळे, बेंद्रे, रझा, हेब्बर अशा कलावंतांवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. सध्या त्या जे.जे. स्कूलच्या इतिहास विभागप्रमुख असून काही काळ जे.जे.च्या अधिष्ठाता पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. याशिवाय एन.सी.ई.आर.टी.च्या राष्ट्रीय कलाइतिहास अभ्यास मंडळाच्या त्या निमंत्रितसदस्या आहेत.

                 दक्षिण मध्य क्षेत्र नागपूरचे १९८९, १९९७ चे पुरस्कार आणि ललित कला अकादमी, नवी दिल्ली, राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी, बिर्ला अकादमी अशा प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग असून अनेक मान्यवर संस्था व व्यक्तींकडे डॉ. मनीषा पाटील यांची चित्रे संग्रहित आहेत.

- विकास जोशी

पाटील, मनीषा प्रभाकर