Skip to main content
x

पाटील, प्रभाकर नारायण

प्रभाकर नारायण पाटील यांचा जन्म पनवेल शहरातील इतिहासप्रसिद्ध असलेल्या गुळवेवाड्यात झाला. शेतकर्‍यांची चळवळ उभारून आंदोलन करणारे श्रमजीवी जनतेचे झुंजार नेते नारायण नागू पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई नारायण पाटील हे उभयता त्यांचे मातापिता होत. हे दोघेही शिक्षकी पेशात असल्याने नोकरी निमित्त त्यांना सतत भटकंती करावी लागे. ते पनवेल शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते तेव्हा प्रभाकर यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात शेतकरी व कष्टकरी यांचे राजकारण चालत असे. त्यामुळे गरिबांची दु:खे, त्यांचे हाल पाटील यांनी लहानपणीच पाहिले होते.

प्रभाकर नारायण पाटील यांचे शिक्षण इंग्रजी सातवी म्हणजे मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांनी मॅट्रिकला असतानाच शाळा सोडली. त्यांचे शिक्षण पनवेल, पेझारी, अलिबाग व मुंबई या ठिकाणी झाले. आपले वडीलबंधू दत्ता पाटील यांच्यासोबत ते मुंबई येथे शिक्षणासाठी गेले. दत्ता यांनी ज्यावेळी एलएल.बी.साठी प्रवेश घेतला त्यावेळी प्रभाकर मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते. परंतु संसार सांभाळून व दोन मुलांच्या मुंबईतील शिक्षणाचा खर्च करताना वडिलांची तारांबळ उडत असे या गोष्टीचा त्यांनी विचार केला. मुलाने एलएल.बी. व्हावे हे आपल्या वडिलांचे स्वप्न वडीलबंधू पूर्ण करणार असल्यामुळे आपल्या शिक्षणावरील खर्चाचा बोजा वडिलांना नको म्हणून त्यांनी शिक्षण सोडून प्रेसच्या कामात वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी अलिबागच्या टोपीवाला विद्यालयामध्ये प्रेससंदर्भात शिक्षण घेतले व प्रेसची जबाबदारी अंगावर घेतली.

नारायण नागू पाटील यांनी आपल्या समाजाचा उद्धार व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात (पूर्वीचा कुलाबा) चळवळ सुरू केली. त्यांनी लोकजागृतीचे कार्य हाती घेतले. त्यांना यातूनच जनतेचा पाठिंबा मिळत गेला. त्यांनी लोकाग्रहास्तव कुलाबा जिल्हा बोर्डाची निवडणूक लढविली. ते 1930 मध्ये मुंबई कायदे मंडळावर निवडून आले. ते 1945 मध्ये जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. वेगवेगळ्या आंदोलनात जिल्हाभरात दौर्‍यांमध्ये नारायण नागू पाटील यांच्यासोबत प्रभाकर जात असे. प्रभाकर पाटील यांनी वडिलांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व यांमुळे प्रभावित होऊन राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने व अभ्यासूवृत्तीने अनेक सभा गाजविल्या. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी 1962 मध्ये पोयनाड ग्रामपंचायतीची पहिल्यांदा निवडणूक लढविली व ते पोंयनाडचे सरपंच झाले. पुढे अलिबाग तालुका पंचायत समितीचे सभापती झाले. नंतर त्यांनी 18 जून 1979 ते 30 जून 1990 प्रदीर्घ कालावधीसाठी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी जिल्ह्याचा विकास करण्याचे व्रतच अंगीकारून अनेक लोकोपयोगी कामे केली.

रायगड जिल्हा पूर्वीपासूनच आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता. त्याचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम येथे शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे व जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी पाटील यांनी 1977 मध्ये कोकण शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून वडीलबंधू दत्ता यांच्या सहाय्याने ग्रामीण व दुर्गम भागात शाळा व उच्चशिक्षणासाठी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली.

नारायण नागू पाटील यांनी 5 जुलै 1937 रोजी कोकण कृषीवल नावाचे साप्ताहिक सुरू केले. 1950 मध्ये प्रभाकर पाटील त्याचे संपादक झाले. त्यांनी 1976 मध्ये त्याचे दैनिक कृषीवलमध्ये रूपांतर केले.

रायगड जिल्ह्यात बहुसंख्य लोक शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर वेगवेगळे उद्योगधंदे, जोडधंदे उभारणे गरजेचे होते. परंतु त्यासाठी लागणार्‍या भांडवलाची येथे कमतरता होती. अशावेेळी पीडित, शोषित घटकांनी एकत्र येऊन स्वत:चा आर्थिक विकास करण्यासाठी संघटनांची स्थापना करावी. या हेतूने पाटील यांनी सहकारी चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांनी 1971 मध्ये शेतकर्‍यांना एकत्र करून सहकारी तत्त्वावर दूध डेअरीची स्थापना केली. दहा रुपये समभाग व एक रुपया प्रवेश फी अशा प्रकारे सभासद गोळा केले. यातून पाच दूध संकलन केंद्राची स्थापना केली.

पाटील यांनी सहकारी तत्त्वावर भात गिरण्यांची निर्मिती करण्याचे कामही केले. पोयनाड, फणसापूर, शिरवळी-हाशिवरे, कामार्ले, कुर्डूस या ठिकाणी भातगिरण्या आजही सुस्थितीत आहेत. त्याचप्रमाणे रस्सी कारखाना, अगरबत्ती कारखाना सुरू करून शेकडो स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला.

वारणा बाजारच्या धर्तीवर रायगडमध्येही बाजार असावा ही कल्पना प्रभाकर पाटील यांना सुचली व त्यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत वारणा बाजार, शेतकरी बाजार, वाळवा बाजारांना भेटी देऊन तेेथील कामाची पाहणी केली.

पाटील यांनी ‘श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ मर्या., अलिबाग’ ही संस्था नोंदणीकृत केली व 1750 सभासद नोंदवून 5 लाख 85 हजाराचे भागभांडवल गोळा केले. तात्यासहेब कोरे यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर 1986 रोजी अलिबाग येथे रायगड बाजारचे उद्घाटन झाले. दत्ता पाटील यांनी रायगड बाजारचे अध्यक्ष तर प्रतापराव सरनाईक यांनी महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. योग्य वजन, माफक किंमत, उत्तम प्रत ही रायगड बाजाराने त्रिसूत्री ठरविली. स्वत:च्या हाताने माल घ्यायचा ही कल्पना येथील ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आणि म्हणूनच अल्पावधीतच रायगड बाजारच्या जिल्ह्यात 24 शाखा निघाल्या. रायगड बाजारचे 4929 वैयक्तिक सभासद व 92 सहकारी संस्था सभासद आहेत. दरवर्षीची उलाढाल 50 कोटींच्या वर आहे तर 500 कामगारांना रोजगार मिळाला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था महिला मंडळ यांना रायगड बाजारने अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. पाटील यांनी 1982 मध्ये शेतकरी वर्गाला व गरजू लोकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पंतकृपा ग्रामीण सहकारी पतपेढीची स्थापना केली. या पतसंस्थेचे 2866 सभासद असून हजारो लोकांना या पतसंस्थेमार्फत कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. आयएसो प्रमाणपत्र मिळवणारी ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. बँकेने प्रभाकर पाटील यांच्या सूचनेनुसार शेतकर्‍यांना 4% दराने कर्जपुरवठा केला आहे. त्यांचे चिरंजीव आमदार जयंत पाटील हे या बँकेचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र हौसिंग फायनान्स, महाराष्ट्र राज्य बाजार समिती या बँकाचे संचालक म्हणूनही पाटील यांनी काम पाहिले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे प्रभाकर पाटील यांचे स्वप्न होते. त्यासाठी दापोली येथील कृषी विद्यापीठाची मदत घेऊन या भागात सर्वेक्षण करण्यात आले. रायगडमध्ये ऊस उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा निर्वाळा कृषी विद्यापीठाने दिल्यानंतर ऊस उत्पादनासाठी 500 हेक्टर जमिनीची निवड करण्यात आली. शेतकर्‍यांना ऊस खरेदीची हमी दिली गेली. या कारखान्यासाठी भागभांडवल उभारण्यात आले. प्रभाकर पाटील यांना या कामी रायगडमधील जनतेने सर्व सहकार्य दिले. मात्र सरकारी परवानगी न मिळाल्याने रायगडमध्ये हा कारखाना सुरू होऊ शकला नाही.

- महेश ठाकूर

पाटील, प्रभाकर नारायण