Skip to main content
x

पडवळ, सुनील

            चित्रकार सुनील पडवळ यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी १९८६ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून फाइन आर्ट, तसेच १९८८ मध्ये अप्लाइड आर्ट बी.एफ.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा विवाह तनुजा खानोलकर यांच्या बरोबर १९९३ मध्ये झाला.

            सुनील पडवळ हे त्यांच्या ठसठशीत, थेट आणि परिपूर्ण अशा कलानिर्मितीबद्दल प्रख्यात आहेत. त्यांची कलानिर्मिती लक्षवेधक होते ती त्यांच्या कलेमागच्या वैचारिक प्रवाहामुळे. प्रत्येक वेळी त्यांचे काम एक नवा पैलू उलगडून दाखवते. त्यामुळे विचारांच्या वेगळ्याच साम्राज्यात प्रेक्षक रममाण होऊ लागतात. शिल्पकार जसा शिल्प घडवताना जोडून किंवा तोडून शिल्प बनवतो, तशी त्यांची चित्रे असतात. मानवी प्रतिमा एका अबोल आणि निरपेक्ष प्रेक्षकाप्रमाणे त्यांच्या चित्ररचनेत असतात. परंतु कालानुरूप या प्रतिमा एक गूढ, रम्य आणि जिवंत अस्तित्व दर्शवितात.

            त्यांच्या रंगांकृतींमध्ये माध्यमांचा वापर हा नाट्यमय रितीने आणि भरीव वाटावा असा केलेला असतो; परंतु तरीही त्या कुठेही कृत्रिम किंवा अतिरंजित बारकावे दाखवत नाहीत. ते स्वत:ची शैली कालानुरूप बदलत असतात. अभिव्यक्त होण्यासाठी ते नवीन रूपांचा शोध घेत असतात व त्यासाठी अनेक प्रयोग करताना दिसतात. त्यांच्या चित्रांच्या बाह्य चौकटी या चित्रांचाच एक घटक बनतात.

            त्यांनी एका चित्रमालिकेत पुस्तके रंगविली होती. या पुस्तकांची मुखपृष्ठे इतकी विलोभनीय होती, की प्रेक्षक ती पुस्तके उघडून बघायला उत्सुक होत असे व तसा प्रयत्न केल्यास ती उघडत नाहीत हे त्यांच्या लक्षात येत असे. या पुस्तकांत काय असेल? ही उत्सुकता घेऊन ते कल्पनेच्या राज्यात हरवून जात. कारण ही पुस्तके लाकडाची होती. अशा प्रकारे दर्शकाला मंत्रमुग्ध करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते आजच्या काळातील एक आगळेवेगळे कलाकार ठरतात. सुनील पडवळ संकल्पनात्मक दृक्प्रतिमांची एक साखळी तयार करतात. त्यातून स्वरूपदर्शक (ग्रफिक) पद्धतीने रचना आणि रंगांमधून चित्राचा आशय उलगडत जातो. चित्रसंकल्पनेच्या अवकाशात द्विमिती व त्रिमितीचा तरल, भावपूर्ण अशा रेषांच्या माध्यमातून आभास निर्माण करणे हे त्यांच्या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

त्यांना ‘सोसायटी यूथ अचीव्हर’ अवॉर्ड (२००४), तसेच ‘इमर्जिंग आर्टिस्ट ऑफ द इयर’ (१९९८) आणि ‘कम्युनिकेशन आर्टिस्ट गिल्ड’ (कॅग) अवॉर्ड (१९९०) हे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतात व भारताबाहेर हाँगकाँग, न्यूयॉर्क, लंडन, अॅमस्टरडॅम, टोकियो इत्यादी देशांत झाली आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर, तसेच नवी दिल्ली येथे मेट्रो स्टेशनवर त्यांची चित्रे व शिल्पे विराजमान आहेत.

- राजेत्री कुलकर्णी

पडवळ, सुनील