Skip to main content
x

पेणकर, योसेफ दावीद

जोसेफ डेव्हिड

     लम आरा’ चित्रपटाचे संवादलेखक म्हणून अखंड भारताचा पहिला बोलपट करण्याचे श्रेय घेणारा हरहुन्नरी लेखक म्हणजे जोसेफ डेव्हिड.

     योसेफ दावीद पेणकर हे त्यांचे खरे नाव. त्यांनी मराठी, उर्दू, हिंदी आणि गुजराती या भाषांत नाटके रचली होती. उर्दू आणि पारसी रंगभूमीवर त्यांची नाटके मोठ्या प्रमाणात गाजली. ‘मक्काबी वीरांचे शौर्य’ (१९२१), ‘राजपुत्र आबशालोम’ (१९२१), ‘एस्तर राणी’, ‘आबशालोमचे सिंहासन’, ‘रशियातील यहुदी कन्या’, ‘रोमन राजा टैटस’ ही मराठी भाषेतील त्यांची नाटके. यातील संविधानके प्राचीन धर्मग्रंथावर आधारित आहेत. यहुदी नववर्षाच्या आगमनाच्या वेळेला नागपाडा, भायखळा, ठाणे, पुणे येथे पेणकर स्वत: ही नाटके करत. त्यांचे शिक्षण मराठी भाषेतून झाले होते, पण माझगाव, नागपाडा आणि भायखळा विभागात वास्तव्य असल्यामुळे त्यांचा उर्दू भाषक व गुजराती भाषक लोकांशी सततचा संबंध येत असे. त्यामुळे त्या भाषांतल्या रंगमंचावर ते आपली नाटके प्रेक्षकांपुढे सादर करत. त्यामुळेच इंपीरियलचे मालक आर्देसिर इराणी यांचे जोसेफ डेव्हिड यांच्याकडे लक्ष गेले. ‘आलम आरा’चे कथानक, संवाद आणि गाणी जोसेफ डेव्हिड यांनीच रचली. त्यानंतर त्याच कंपनीसाठी ‘नूरजहाँ’ (१९३१) चित्रपटाचे लेखन करून दिले.

     वाडिया मुव्हीटोनचे जमशेदजी वाडिया यांनी त्यांना वाडिया कंपनीत आणले आणि ‘नूरे-यमन’ बोलपटाचे कथालेखन, संवादलेखन व गीतलेखन करून घेतले. त्या चित्रपटाचे संगीतही जोसेफ डेव्हिड यांनीच दिले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायक फिरोज दस्तूर हे बोलपटाचे नायक होते. वाडियाच्या चित्रसंस्थेसाठी त्यांनी ‘बागे मिसर’ (१९३४), ‘वामन अवतार’ (१९३४), ‘नूरे-यमन’ (१९३५)  अशा बोलपटांसाठी कथा-संवाद-गीतलेखन केले आणि संगीत दिले. त्यांनी मराठी भाषेत ‘दावीदा‘यान’, ‘महाराणी एस्तरचे बुद्धिचातुर्य’ या कीर्तनांच्या पद्यावली रचल्या.

द.भा. सामंत

पेणकर, योसेफ दावीद