Skip to main content
x

पळशीकर, नारायण बळवंत

नाना पळशीकर

     केवळ आपल्या मुद्राभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते म्हणजे नाना पळशीकर. नाना पळशीकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भंडारा येथे झाला. मध्य प्रदेशातच जन्म झाल्याने त्यांच्यावर मराठी भाषेपेक्षा हिंदी भाषेचे खोलवर संस्कार झाले होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली व त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. हेडगेवार. त्या वेळी नारायण पळशीकर यांनी छोटासा कार्यक्रम केला. तो पाहून डॉ. हेडगेवार यांनी पळशीकरांची प्रशंसा केली आणि म्हणाले, “तू खूप चांगला अभिनय करतोस. तू सिनेमात गेलास तर चांगले नाव कमावशील.” त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याच वेळी त्यांचे नाव ‘नाना पळशीकर’ असे बदलले आणि पुढे तेच नाव रूढ झाले.

     चित्रपट क्षेत्रातच नाव कमवावे, या हेतूने नाना पळशीकर पुढे पुण्यातल्या प्रभात फिल्म कंपनीत गेले. पण तिथे त्यांना काम मिळाले नाही. मग ते मुंबईला गेले आणि तिथे रणजित स्टुडिओत दररोज एक रुपया एवढ्या रोजंदारीवर काम करू लागले. त्या वेळी रणजित स्टुडिओत ‘देशदासी’ (१९३५) या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ‘बॅरिस्टरकी बीबी’ या चित्रपटातही त्यांना नगण्य भूमिका दिली.

     रणजितमध्ये आपल्या अभिनयाला फारसा वाव मिळत नाही, हे पाहून काही महिन्यांतच नानांनी रणजित स्टुडिओला रामराम ठोकला. पुढे काय करायचे या विचारात असतानाच, द्वारका प्रसाद मिश्र यांच्याशी त्यांची भेट झाली. द्वारका प्रसाद त्या काळात मध्य प्रदेशाचे गृहमंत्री होते आणि ते ‘धुवाँधार’ चित्रपट निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी नाना पळशीकर यांना आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी ताबडतोब करारबद्ध केले. ‘धुवाँधार’मधली त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘दुर्गा’, ‘नया संसार’, ‘कंगन’, ‘आझाद’ या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या आणि प्रसिद्धी मिळवली. हे पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिरमध्ये बोलावून घेतले आणि ‘माली’ या हिंदी आणि ‘भक्तीचा मळा’ या मराठी चित्रपटात भूमिका दिली. ‘माली’ चित्रपटासाठी नानांनी एक हिंदी गीतही लिहिले. ‘भक्तीचा मळा’ हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच कामे करत आपले बस्तान बसवले. हिंदी चित्रपटातील व्यग्रतेमुळे त्यांना मराठी चित्रपटात काम करण्यासाठी वेळही मिळाला नाही. तरीही ‘मूठभर चणे’ (१९५५), ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) आणि ‘फकीरा’ (१९६३) या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. ‘गुरू’ या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी भूमिका केली.

     एकूणच त्यांनी केवळ चार मराठी चित्रपटांत भूमिका केल्या, तर शंभरहून अधिक हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटातील अभिनयासाठीच पारितोषिके मिळाली. ‘कानून’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी, तसेच एकूण तीन चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून ‘फिल्मफेअर पारितोषिक’ मिळाले. १९८२ साली बोलपट चित्रसृष्टीच्या अमृतमहोत्सवानिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले होते.

     वयाच्या ७६ व्या वर्षी मुंबई येथे वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.

- शशिकांत किणीकर

पळशीकर, नारायण बळवंत