Skip to main content
x

फडणीस, शिवराम दत्तात्रेय

     शिवराम दत्तात्रेय फडणिसांनी ‘मोहिनी’ या मासिकावरील आपल्या मुखपृष्ठचित्रांनी एकूणच मराठी मासिकांच्या मुखपृष्ठांची नवी परंपरा तर प्रस्थापित केलीच; पण शब्दांचा आधार न घेता हास्यचित्रेही  चित्रकलेइतकीच मोहक, दृष्टीला आनंद देणारी असू शकतात हे सिद्ध केले. मराठी हास्यचित्र क्षेत्राला त्यांची ही युगप्रवर्तक म्हणावी अशी देणगी आहे.

 फडणीस यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज या छोट्या खेडेगावी झाला. तेथे मिळाले तेवढे शिक्षण घेऊन फडणिसांनी कोल्हापुरात स्थलांतर केले. तेथून १९४४ साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबईला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी तेथून १९४९ मध्ये उपयोजित कला पदविका  (जी.डी. आर्ट, कमर्शियल) प्राप्त करून घेतली. मुंबईचे हवामान आणि जीवनशैली आपल्या शरीरप्रकृतीला मानवत नसल्याचे अनुभवाला आल्यावर काही काळ कोल्हापुरात फडणिसांनी आपला स्टुडिओ थाटला आणि नंतर अनंत अंतरकरांच्या प्रेरणेने पुण्याला स्थलांतर केले व ते पुण्यात कायमचे स्थायिक झाले. त्यामुळे पुण्यासारखे अधिक विस्तृत क्षेत्र त्यांच्या कलेला उपलब्ध झाले.

 जे.जे.मध्ये शिकत असतानाच १९४५ मध्ये गंमत म्हणून त्यांनी ‘मनोहर’ मासिकाला एक हास्यचित्र पाठवून दिले. ते प्रसिद्ध झालेले पाहून त्यांनी उत्साहित होऊन अधूनमधून मासिकांना हास्यचित्रे पाठवली व ती सुद्धा प्रसिद्ध झाली. अशा मासिकांमध्ये अनंत अंतरकरांचे ‘हंस’ हे मासिक होते. त्यांना दिलेल्या एका पूर्ण पानी चित्रावरून अंतरकरांच्या सूचनेनुसार त्यांनी एक रंगीत चित्र बनवले व ते ‘हंस’च्या जून १९५१ च्या अंकावर मुखपृष्ठ म्हणून प्रकाशित झाले. फडणिसांच्या विनोदी बहुरंगी मुखपृष्ठांच्या कारकिर्दीची ती सुरुवात होती. त्यानंतर लगेचच, म्हणजे ‘मोहिनी’च्या १९५२ च्या दिवाळी अंकावर झळकलेले त्यांचे ‘उंदीरछाप शर्टातला तो आणि मांजरछाप साडीतली ती शेजारीशेजारी एकत्र बस स्टॉपवर उभे असलेले’ चित्र प्रचंड गाजले. आणि दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांच्या बाबतीत ते युगप्रवर्तक ठरले.

दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ म्हणजे सुंदर, मोहक चेहर्‍याच्या तरुणीचे चित्र किंवा सिने-निर्मार्त्यांकडून आलेली तत्कालीन चित्रपटातील मोहक चेहऱ्यांच्या नायिकांची छायाचित्रे (अर्थातच चित्रपटाच्या जाहिरातीचा एक भाग म्हणून संपादकाला विनामूल्य उपलब्ध झालेली!) अशी तोवरची परंपरा होती. ती ‘मोहिनी’वरील या चित्राने खंडित तर केलीच; पण अशा चित्रांचे वाचकांकडूनही उत्तम स्वागत होते हे प्रस्थापित केले.

फडणिसांच्या जीवनात या चित्राने मूलभूत बदल केला. अनंत अंतरकरांनी त्या सुमारास आपले मुंबईतले बिऱ्हाड हलवून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय अमलात आणला होता. त्यांच्याच प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने फडणिसांनी पुण्याला स्थलांतर केले. ‘मोहिनी’च्या प्रत्येक महिन्याच्या अंकावर फडणिसांचे चित्र छापले जाईल व फडणिसांनी ते द्यायचे असा परस्परांमध्ये निर्णय झाल्यावर ‘मोहिनी’ आणि फडणिसांनी केलेले रंगीत विनोदी मुखपृष्ठ हे समीकरण जे तेव्हापासून सुरू झाले, ते आजतागायत म्हणजे जवळजवळ ५० वर्षे अव्याहत टिकून आहे; आणि सुरुवातीच्या चित्रांना वाचकांकडून जशी उत्स्फूर्त, हार्दिक दाद मिळायची, तेवढीच, तशीच आजही मिळते आहे. भारतीयच नव्हे, तर पाश्चिमात्य भाषांमधील नियतकालिकांत दुर्मिळ असणारे हे उदाहरण!

 नंतरच्या काळात ‘मोहिनी’च्या दर महिन्याच्या अंकासाठी फडणिसांचे मुखपृष्ठ या प्रथेमध्ये खंड पडला असला, तरी दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ मात्र फडणिसांचे आणि फडणिसांचेच असत आले आहे आणि ‘मोहिनी’ मासिक बंद पडून तिचा फक्त दिवाळी अंकच निघत असला तरी हे तसेच आहे.

फडणिसांचे पुण्यात स्थायिक होणे मूलत: अंतरकरांच्या प्रेरणेतून घडले असले तरी अंतरकरांच्या व्यतिरिक्त इतरांची कामे करण्यावर बंदी नव्हती. त्यामुळे पुण्यात आल्यावर त्यांनी इतर नियतकालिकांसाठी कथाचित्रे व मुखपृष्ठे, हास्यचित्रे ही केली.

त्यांनी १९६३ ते १९७५ या काळात ‘माणूस’ आणि ‘सोबत’ या मराठी साप्ताहिकांसाठी तत्कालीन घटनांवर आधारित राजकीय-सामाजिक टीकाचित्रेही काढली. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे काम म्हणजे शास्त्र, बँकिंग, व्याकरण, व्यवस्थापन, शिक्षण, कायदा, तत्त्वज्ञान यांसारख्या गंभीर अभ्यासाच्या आणि हास्यचित्रांपासून दूर असलेल्या विषयांवरील पुस्तकांसाठी त्यांनी व्यंगचित्रे काढली. फडणिसांच्या चित्रांमुळे हे गंभीर आणि किचकट वाटणारे विषय समजायला काहीसे सुलभ व्हायला मदत झाली.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी केलेली प्राथमिक गणिताची सचित्र पुस्तके. पहिलीच्या मुलांना गणितातील संकल्पना सुबोध व रंजक करून, गणित हा अवघड आणि रूक्ष विषय अशी सर्वसामान्य समजूत कशी चुकीची आहे हे दाखवण्याचे काम फडणिसांची या पुस्तकांतील चित्रे करतात. वीस वर्षांत आठ भाषांतील ही सचित्र पुस्तके लाखो प्रतींमधून दूरदूरच्या खेड्यांत पसरली आहेत.

आपल्या बहुरंगी व्यंगचित्रांच्या मूळ कृतींचे पहिले प्रदर्शन फडणिसांनी फेब्रुवारी १९६५ मध्ये मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीत ‘हसरी गॅलरी’ या नावाने सादर केले. यामध्ये व्यंगचित्रांच्या बरोबरीने विजेवर चालणारी, आरशांचा उपयोग केलेली इ. काही हलती चित्रेही होती. दिल्लीपासून बंगलोरपर्यंत देशातील अनेक लहान-मोठ्या शहरांतून ‘हसरी गॅलरी’ फिरली आणि प्रत्येक ठिकाणी तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.

 प्रदर्शनासारख्या कार्यक्रमाला सुटसुटीत पर्याय म्हणून प्रात्यक्षिके आणि बहुरंगी स्लाइड्स यांच्या साहाय्याने हास्यचित्रांची ओळख करून देणारा कार्यक्रम त्यांच्या पत्नी शकुंतला व त्यांनी संयुक्तपणे ‘चित्रहास’ या नावाने तयार केला व त्यांचे दीडशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील शहरांतून केले व तेवढीच दाद मिळवली.

 फडणिसांनी ‘चित्रहास’ अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इतर सहा शहरांतून, तसेच लंडनला महाराष्ट्र मंडळासाठीही सादर केला. फडणिसांची चित्रे अनेक वेळा कॅनडामधील माँट्रियल येथील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनांत, तसेच जर्मनीमध्येही निवडली गेली आहेत. फडणिसांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या बहुरंगी विनोदी चित्राला १९५४ मध्ये ‘कॅग’ या भारतातील प्रतिष्ठित संस्थेचा, तसेच बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट’चा, ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला आहे.

आजवर त्यांची ः ‘लाफिंग गॅलरी’ (इंग्रजीत) ‘हसरी गॅलरी’ (मराठीत), ‘मिस्किल गॅलरी’, ‘चिमुकली गॅलरी’ हे हास्यचित्रसंग्रह व छोट्यांसाठी ‘चित्रकला’ ही पुस्तिके प्रकाशित झाली आहेत.

युजीसी, दिल्लीसाठी आणि दूरदर्शन व इतर वाहिन्यांवर व्यंगचित्रे व व्यंगचित्रकला यांसंबंधातले अनेक प्रबोधक कार्यक्रम फडणिसांनी सादर केले आहेत.

पुणे आर्टिस्ट गिल्डचे अध्यक्ष व ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून फडणिसांनी केलेले काम  लक्षणीय होते. तसेच कलाप्रदर्शनावरील करमणूक कर माफ करावा म्हणून १९६६ ते १९७२ ही सहा वर्षे व्यक्तिश:, शासनाचा सतत पाठपुरावा करून ही मागणी त्यांनी मान्य करून घेतली. चित्रकाराचा, त्याच्या छापल्या गेलेल्या चित्राचा कॉपिराइट चित्रकाराकडे कायद्याने असतो ही न्याय्य वस्तुस्थिती त्यांनी न्यायालय-कचेरीमार्फत सातत्याने पाठपुरावा करून प्रस्थापित करून घेतली. सर्व चित्रकार-व्यंगचित्रकारांनी कृतज्ञ राहावे अशीच महत्त्वाची कामगिरी फडणिसांनी केली आहे.

फडणिसांच्या ‘मोहिनी’ मासिकावरील मुखपृष्ठाने मासिकांच्या मुखपृष्ठाबाबत एक नवीन परंपरा निर्माण केली. फडणिसांची बहुसंख्य व्यंगचित्रे शब्दविरहित आहेत व इतर थोडी कमीतकमी शब्दांचा वापर केलेली आहेत.  त्याचबरोबर, हास्यचित्रही एखाद्या पेंटिंग इतके देखणे, मोहक, निव्वळ दृष्टीलादेखील आनंद देणारे असू शकते हे त्यांनी सिद्ध केले. यासाठी त्यांनी अलंकारिक रेखाटन शैलीचा वापर केला.

केवळ चित्र पाहून त्यामधला विनोद समजून घ्यायचा व हसून दाद द्यायची ही प्रतिक्रिया फडणिसांच्या हास्यचित्रांनी मराठी रसिकाला शिकवली.

या चित्रशैलीला सुसंगत अशीच पात्रेही त्यांच्या हास्यचित्रांतून येतात. कुरूपपणाला, बेढबपणाला तिथे मज्जाव आहे. ही छानछान पात्रे एकमेकांची माफक चेष्टा करतात, संसारात येणाऱ्या माफक संकटांचा गमतीने सामना करतात, अशी ही साधी, सुसंस्कृत निर्मळ माणसे आहेत. यांमध्ये दुष्ट, क्रूर, सूडाने पेटलेली, खडूस, विध्वंसक माणसे चुकूनही भेटणार नाहीत. 

व्यक्तिचित्रणासाठी तसेच चित्रातील रचनेसाठी कमीतकमी पण आशय व्यक्त करण्यासाठी आवश्यक एवढेच तपशील ते चित्रांत वापरतात.

फडणिसांच्या हास्यचित्रांतील प्रसंग सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहस्थाच्या आयुष्यात सतत येत राहणारे आहेत. अशा प्रसंगांचा, अडचणींचा खिलाडूपणाने सामना करणाऱ्या नायक-नायिकांशी सर्वसामान्य रसिकांची नाडी जुळते व पाहताक्षणी गुदगुल्या झाल्याप्रमाणे त्यांची हसून प्रतिक्रिया व्यक्त होते,  प्रसन्न वातावरण निर्माण होते.

कलावंत म्हणून फडणिसांनी केलेले काम तर अविस्मरणीयच आहे. पण चित्र, त्यांतही हास्यचित्र, याविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत; निकोप चित्रसंस्कृती अद्याप फारशी रुळलेली नाही या वस्तुस्थितीबद्दल त्यांच्या मनात खेद आहे. ह्या स्थितीत बदल होण्यासाठी त्यांच्या बाजूने व्यासपीठावरून, विविध माध्यमांतून होत असलेले त्यांचे प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे आहेत.

‘रेषाटन—आठवणींचा प्रवास’ या ग्रंथात फडणिसांनी आपल्या साठहून अधिक वर्षांच्या हास्यचित्रकार-चित्रकार म्हणून रसिकांची नि:संकोच मन:पूर्वक दाद मिळवून यश कमावलेल्या कारकिर्दीतील आठवणींचा, तसेच हास्यचित्रकारांच्या न्याय्यहक्कांसाठी त्यांनी केलेल्या अमोल कामगिरीचा लेखाजोखा तर नोंदला आहेच; पण त्याबरोबरीने चित्रकला व एकूणच दृश्यकलेसंबंधीचे दीर्घ अनुभवाधारित, परिपक्व असे प्रौढ चिंतनही मांडले आहे, ते मौलिक आहे.

फडणीस आणि त्यांच्या पत्नी शकुंतला यांना २०१८ साली कै. मुकुंद गोखले स्मृती यशवंत -वेणू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 - वसंत सरवटे,आर्या जोशी

फडणीस, शिवराम दत्तात्रेय