Skip to main content
x

रावल, योगेश शांतिलाल

     ‘कोलाज’ या तंत्रात सातत्याने काम करणारे प्रयोगशील चित्रकार योगेश शांतिलाल रावल यांचा जन्म सौराष्ट्रात वांकनेर येथे झाला. वडील शांतिलाल मनूभाई रावल हे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते व ते मुंबईतच लहानमोठी कामे करत. आई सावित्रीबेन यांचे शिक्षण पंढरपुरात, मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत, सरकारी शाळेत झाले. योगेश रावल यांच्या कलाकार म्हणून जडणघडणीत त्यांच्या आईचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.

योगेश रावल यांचे शालेय शिक्षण दादर येथील प्रीमियर हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी बान्द्रा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला; पण कलाविषयक तेथे काहीच नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांतच ते शिक्षण सोडून दिले. त्यानंतर इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट या खाजगी कलासंस्थेत प्रवेश घेऊन १९७४ मध्ये त्यांनी फाउण्डेशन कोर्स पूर्ण केला. फाउण्डेशनला असतानाच राज्य कला प्रदर्शनाकरिता पाठवण्याकरिता पतंगाचे कागद वापरून त्यांनी एक रचना-चित्र तयार केले. विशेष म्हणजे १९७३ च्या चौदाव्या राज्य कला प्रदर्शनात त्यांना या चित्राकरिता पारितोषिकही लाभले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम ‘कोलाज’ हेच ठरविले. इंडियन आर्ट इन्स्टिट्यूटचे रौप्य पदकही १९७४ मध्ये त्यांना लाभले.

रावल यांनी १९७४ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९७८ मध्ये पेन्टिंगची पदविका पूर्ण केली. शैक्षणिक कालखंडात त्यांनी या तंत्रात विविध प्रयोग केले. मुद्राचित्रतंत्र आणि कोलाज यातून त्यांनी ‘कोलोप्रिंट’ हे स्वनिर्मित तंत्र विकसित केले. तसेच मुद्राचित्रण माध्यमाच्या विविध तंत्रांचाही अभ्यास केला. या कालखंडात त्यांना आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (१९७५, १९७६), सोळावे राज्य कला प्रदर्शन (१९७६), तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या ‘डॉली करसेटजी’ रेखाचित्रण (१९७८) स्पर्धेतही पारितोषिक लाभले. याच वर्षी म्हणजे १९७८ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे पारितोषिक व जे.जे.चे सुवर्णपदक मिळवण्याचा मान त्यांना मिळाला, तसेच जे.जे.ची फेलोशिपही मिळाली.

ते १९७९ मध्ये फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळवून पॅरिसला गेले. तेथे त्यांनी प्रो.विल्यम हायटर यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅटेलिर-१७ येथे ‘एचिंग’ या तंत्राचा अभ्यास केला. इकोल द ब्यू आटर्स येथे लिथोग्राफीचा अभ्यास केला. पॅॅरिसमध्ये त्यांच्या कलाकृतींचे एकल प्रदर्शनही झाले. ते १९८० मध्ये भारतात परतले आणि स्वतंत्रपणे काम करू लागले.

त्यांनी १९८३ ते १९९० या दरम्यान नेहरू सेन्टरच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या विभागात सीनियर आर्टिस्ट/एक्झिबिशन ऑफिसर म्हणून काम पाहिले. याच काळात डिझायनर, क्युरेटर राजीव सेठी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. पुढे त्यांच्या अनेक प्रकल्पांत योगेश रावल यांचा सहभाग होता. ते १९९० मध्ये नोकरी सोडल्यानंतर स्वतंत्रपणे काम करू लागले.

योगेश रावल यांनी काही वर्षे भोपाळच्या भारत-भवनात काम केले. याच दरम्यान चार्ल्स कोरिया या प्रसिद्ध वास्तुशिल्पकाराने त्यांची कामे पाहिली व त्यांनी विधानसभा भवनाचे मोठे काम ‘कोलाज’ या तंत्रात करायला दिले. काही वर्षे भोपाळ आणि मुंबई असे १९९७ पासून त्यांचे वास्तव्य असे. भोपाळमध्ये त्यांचा स्टुडीओ होता. भोपाळच्या वास्तव्यातच त्यांना सहधर्मचारिणी लाभली.

योगेश रावल यांनी कोलाज या तंत्रात राइस पेपर्स, टिश्यू पेपर्स, काइट पेपर्स यांबरोबरच विविध पोत व पारदर्शक, अर्धपारदर्शक कागद वापरून काम केले आहे. लाकडाच्या सपाट पृष्ठभागावर विविधरंगी कागदाच्या एकावर एक स्तरातून तरल अमूर्त आकृतिबंध ते उत्स्फूर्तपणे घडवतात. लाकडाच्या पृष्ठभागाव्यतिरिक्त कॅनव्हास, जुन्या खिडक्या, दारे आदी वस्तू वापरून त्यांवरही कोलाज तंत्रात त्यांनी काम केले आहे. इतकेच नव्हे, तर मुंबईतील शहा हाउसधील एक पूर्ण खोली (स्टडी रूम)‘बारमासी’ ही संकल्पना घेऊन या तंत्रात केली आहे. यात त्यांनी विविध प्रकारचे राइस पेपर्स, टिश्यू पेपर्स वापरून या खोलीच्या सर्व भिंती, सीलिंग, फ्लोअर, खिडक्या, दारे व सर्व फर्निचर त्यांनी या तंत्रात केले आहे. अशा प्रकारच्या कामाला रावल ‘फंक्शनल कोलाज’ म्हणतात. तिथे चौकटी नाहीत, कलावस्तू आणि प्रेक्षक यांत अंतर नाही. एका फुटापासून ते दहा-बारा फुटांपर्यंतची कोलाज रावल यांनी केली आहेत.

राजीव सेठींच्या एका प्रकल्पापैकी ‘हयात’ या पंचतारांकित हॉटेलमधील मोठे कोलाज त्यांनी लाल रंगाचेच कागद वापरून घडविले आहे. रावल यांना फंक्शनल कोलाजची प्रेरणा ही कामगारवस्तीतील घराचे व दुकानाचे सुशोभीकरण यांतून मिळाली असे ते सांगतात.

कोलाजव्यतिरिक्त रेखाटन, शिल्प, मुद्राचित्र, पेंटिंग इत्यादी माध्यमांतूनही त्यांनी कामे केली आहेत. विशेष म्हणजे त्यांची रेखाटने वेगळी आहेत. चित्रकलेतील ‘रेषा’ हा मूलभूत घटक घेऊन दृश्यकलेतील दुसरा महत्त्वाचा घटक ‘प्रकाश’ त्यातून दृग्गोचर व्हायला हवा या संकल्पनेतून अतिशय साध्या, फक्त एकाखाली एक अशा काढलेल्या समांतर रेषांमधून ती साकार होतात. कुठल्याही प्रकारचे आकारत्व न ठेवता ‘आकारहीन व रंगहीन’ असा शुद्ध अनुभव देण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो. रावल यांनी पेन्सिल-पेपर, सिल्व्हर पॉइंट, ब्लाइण्ड एचिंग (एम्बॉसिंग), व्हाइट मार्बल, पारदर्शक काच, आरसा अशा विविध पृष्ठभागांचा आणि माध्यमांचा उपयोग करून प्रकाशमान भासणाऱ्या रेषांचा आविष्कार या ड्रॉइंग्जमधून केला आहे.

आजपर्यंत योगेश रावल यांची एकंदर आठ एकल प्रदर्शने भारतातील गॅलऱ्यांत व न्यूयॉर्क व पॅॅरिस येथील गॅलऱ्यांत झाली असून भारतात दिल्ली, मुंबई, बंगलोर (बंगरुळू) येथील अनेक मान्यवर गॅलऱ्यांतून , तसेच भारताबाहेरच्या गॅलऱ्यांतून अनेक समूह प्रदर्शनांतून त्यांचा सहभाग राहिला आहे. १९९० मध्ये त्यांना भारतभवन बिनाले ऑफ काँटेम्पररी इंडियन आर्टचे पारितोषिक लाभले. अशा ह्या गुणी कलाकाराचे २०२१ साली कोरोनामुळे निधन झाले.

- माधव इमारते

रावल, योगेश शांतिलाल