Skip to main content
x

रायबा, अब्दुल अझीझ

रायबा

        जुन्या मुंबईच्या चित्रांमुळे प्रसिद्धीस आलेल्या चित्रकार रायबा अब्दुल अझीझ यांचा जन्म मुंबईत झाला. सुरुवातीच्या काळात रायबा यांनी दंडवतीमठ यांच्याकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकतानाच स्वतंत्र विचारांनी आणि वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली होती. मात्र हे करताना चित्रात भारतीयता राहील याचा विचार त्यांच्या मनावर नकळत बिंबला तो त्यांचे शिक्षक जगन्नाथ अहिवासी यांच्यामुळे व पुढील काळातही तो विचार कायम राहिला.

रायबा काही काळ प्रोग्रेसिव्ह ग्रूपबरोबर होते. प्रोग्रेसिव्ह ग्रूपच्या १९५३ मध्ये झालेल्या प्रदर्शनात त्यांचीही चित्रे होती. पण वैचारिक मतभेद होताच अल्पावधीतच ते प्रोग्रेसिव्ह ग्रूपमधून वेगळे झाले. मात्र याच्या आधीपासूनच म्हणजे १९४० पासून त्यांच्या कामाचे सातत्य आणि दर्जा पाहून ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे आर्ट डायरेक्टर व चित्रकार लँगहॅमर आणि कला समीक्षक रूडी व्हॉन लायडन त्यांच्यावर खूश असायचे. ‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये त्यांची चित्रेही छापायचे.

रायबा यांना १९४७ व १९५१ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक व १९५६ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे मानाचे सुवर्णपदक मिळाले. त्यांचा १९६२ मध्ये देशातील दहा निवडक चित्रकारांतील एक चित्रकार म्हणून दिल्ली येथील ‘ललित कला अकादमी’ तर्फे सन्मान करण्यात आला. देशाच्या विविध भागांत फिरून आपल्या कलानिर्मितीला उपकारक ठरेल असे निरीक्षण करीत त्या भटकंतीच्या दरम्यान चित्रे रंगवायची, ही या कलाकाराची खरी सवय होती. अनेक वर्षे याच पद्धतीने काम करून आणि पारितोषिकेही मिळवून त्यांनी स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले.

यानंतरच्या काळातील त्यांची जुन्या मुंबईचे चित्रण असलेली चित्रमालिका कमालीची लोकप्रिय ठरली. त्यांनी कॅनव्हासऐवजी खडबडीत पृष्ठभाग असलेल्या पोत्याचा (ज्यूट) वापर करून काळ्या रेषा व चमकदार व काहीसे भडक वाटणारे रंग वापरून ही चित्रे रंगविली होती. यांत जुन्या मुंबईतील वास्तू, समुद्रावरील जीवन, निसर्ग व त्यातील मानवाचा वावर अतिशय मनोज्ञ पद्धतीने साकारला होता. शिवाय त्यातून मुंबईचे पूर्वीपासून असलेले बहुरंगी, बहुढंगी व सर्वसमावेशक स्वरूपही व्यक्त होत होते.

ज्यूट व कॅनव्हासवर चित्रे काढताकाढता त्यांनी १९८० च्या दरम्यान काचेवर चित्रकारी करायला सुरुवात केली. अलंकरणात्मकतेपासून ते विरूपीकरणापर्यंत विविध प्रकारे रायबा यांनी चित्रे रंगविली आहेत. त्यानंतर गेली सुमारे वीसेक वर्षे ते ज्यूटवर चित्रकारी करत होते.. माध्यमाच्या पृष्ठभागातल्या बदलाचा चित्रावर वेगळा परिणाम कसा होतो एवढेच नाही, तर चित्राच्या पृष्ठभागात बदल झाला म्हणजे कुंचल्याच्या हाताळणीतही किती फरक पडतो आणि रंगलेपनाचे तंत्रही यामुळे ओघानेच कितपत बदलावे लागते हे रायबांच्या कलाकृती पाहून सहज कळते. ठसठशीत आकार, आश्‍वासक रेषा आणि त्यांच्याच जोडीला अत्यंत सुंदर, पण इतरांहून वेगळ्या रंगछटा हे रायबांच्या चित्रांचे वैशिष्ट्य सांगता येईल.

रायबा यांची देशात मुंबई व अन्यत्र अनेक प्रदर्शने झाली असून त्यांची चित्रे १९५४ मधील रोम येथील बिनाले, १९६१ मध्ये यूएई, रशिया, पॅरिस, रिओ दि जानेरो व १९६५ मध्ये आफ्रिका व नैरोबी येथे प्रदर्शित झाली आहेत. 

वृद्धापकाळी  रायबा नालासोपाऱ्यातल्या स्वत:च्या स्टुडीओत बसून कुराणवाचन करत आणि निसर्गाचे चित्रण असलेली स्टुडीओ पेंटिंग्ज करत. त्यांनी एअर इंडिया, सिडनी विमानतळावर आणि अशोक हॉटेलसाठी म्यूरल्स केली आहेत. इजिप्तच्या कैरो म्यूझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात, तशीच ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालयात व महाराष्ट्र नागपूर येथेही आहेत.

- श्रीराम खाडिलकर

रायबा, अब्दुल अझीझ