Skip to main content
x

रविवर्मा, कोईल तंपुरन

राजा रविवर्मा

       हिंदू देवदेवतांची व धार्मिक प्रसंगांची यथार्थदर्शी चित्रे महाराष्ट्राच्या घराघरांत ओलिओग्रफ प्रिंटद्वारा पोहोचवणारे, चित्ररसिकांची अभिरुची घडवणारे, पाश्‍चिमात्य शैली जनमानसात रुजवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार रविवर्मा कोईल तंपुरन यांचा जन्म केरळ राज्यातील किलीमानूर (त्रिवेंद्रमपासून सुमारे ४५ कि.मी.) येथे राजघराण्यात झाला. त्यांना दोन लहान भाऊ व एक बहीण होती. त्यांची आई उमाम्बा ही नृत्यनिपुण कलावती, तर वडील श्रीकांतन भट्टथिरीपाद हे संस्कृत पंडित होते. त्यांना आईकडून कलेचा, तर वडिलांकडून संस्कृत विद्येचा वारसा लाभला.

रविवर्मांनी संस्कृतमधून मूळ महाकाव्ये व पुराणे स्वत: अभ्यासली व त्यांतून त्यांना चित्रविषयांचा अफाट खजिनाच खुला झाला. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांचे चुलते राजा राजवर्मा हे स्वत: चित्रकार होते व त्यांनी रविवर्मांना प्रोत्साहन दिले व चित्रकलेचे प्राथमिक धडेही दिले. सुरुवातीला ते जलरंगात चित्रे रंगवत असत. त्यांचा १८६६ मध्ये पूरूरत्तती नाल महाब्रभा थंपुरत्ती हिच्याशी विवाह झाला. ती त्रावणकोर राजघराण्यातील महाराणी लक्ष्मीबाई यांची बहीण होती. परिणामी, रविवर्मांना राजवाड्यात राहून चित्रकाम करण्याची संधी मिळाली.

त्रावणकोरच्या दरबारात १८६८ मध्ये थिओडोर जेन्सन यांना व्यक्तिचित्रे करण्यासाठी आमंत्रित करण्यात  आले होते. आपण चित्रे कशी काढतो ते थिओडोर जेन्सन इतरांना दाखवीत नसत. महाराजांच्या रदबदलीमुळे जेन्सन चित्रे काढीत असताना ती बघण्यास जेन्सनने रविवर्मांना परवानगी दिली, त्यातून रविवर्मा तैलरंग या नवीन माध्यमाकडे आकर्षित झाले. तैलरंग हे सर्वस्वी नवे माध्यम हाताळताना त्यांना सुरुवातीस अडचणी आल्या. त्या वेळेस हे माध्यम हाताळणारे रामस्वामी नायडू या नावाचे राजचित्रकार होते. परंतु त्यांनी आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होईल म्हणून मार्गदर्शनास नकार दिला. त्यातून रविवर्मा जिद्दीस पेटले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक तैलरंगात प्रावीण्य मिळवले. या कामी नायडू यांच्या शिष्याने त्यांना गुप्तपणे मदत केल्याचे रविवर्मांनी सांगितले आहे.

रविवर्मांनी तैलरंग हे माध्यम आत्मसात करून त्यावर विलक्षण प्रभुत्व मिळवले व वास्तववादी कलेच्या आभासात्मक चित्रणशैलीत ते नावारूपाला आले. तैलरंग हे माध्यम त्या काळापर्यंत भारतीय चित्रपरंपरेला अज्ञात होते. रविवर्मांनी प्रथमत:च तैलरंगाचे माध्यम वापरून विपुल चित्रनिर्मिती केली, त्यामुळे ते भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जातात. त्यांनी १८७० पासून व्यावसायिक व्यक्तिचित्रणाला सुरुवात केली. याच वर्षी त्यांनी काढलेल्या त्रावणकोरच्या महाराज व महाराणींच्या व्यक्तिचित्राबद्दल त्यांना ‘वीरशृंगला’ हा संस्थानाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

भारतीय कलापरंपरेच्या संदर्भात रविवर्मांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, पाश्‍चात्त्य कलेतील वास्तववादी चित्रणतंत्र व तैलरंग माध्यम यांचा वापर करून त्यांनी खास भारतीय धार्मिक परंपरेतील देवदेवता, पौराणिक दृश्ये व प्रसंग यांची चित्रे रंगवली. पारंपरिक भारतीय लघुचित्रशैली सपाट द्विमितीय पृष्ठाची होती. रविवर्मांनी पाश्‍चात्त्य प्रभावातून त्रिमितीय आभासात्मक वास्तवदर्शी चित्रशैली आत्मसात करून आपली चित्रे त्या शैलीत रंगवली. भारतीय जनमानसाला ती भावली व त्यातून रविवर्मांना अफाट लोकप्रियता मिळाली. आपल्या चित्रांतून देश-विदेशांत मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात रविवर्मांचा वाटा मोठा आहे.

फाइन आर्ट एक्झिबिशन, मद्रास या प्रदर्शनात १८७३ मध्ये रविवर्मांच्या ‘नायर लेडी’ या चित्राला प्रथम पारितोषिक व गव्हर्नरचे सुवर्णपदक प्राप्त झाले. याच वर्षी ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील त्यांचे चित्र, पदक व प्रशस्तिपत्राचे मानकरी ठरले. त्यांच्या ‘ए तामीळ लेडी प्लेइंग सराबत’ याला १८७४ मध्ये मद्रास येथील प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. त्रावणकोरच्या महाराजांकडून रविवर्मांचे चित्र प्रिन्स ऑफ वेल्स (किंग एडवर्ड थ्री) यांना १८७५ मध्ये ते मद्रास (चेन्नई) येथे आले असता भेट देण्यात आले. त्यांचे ‘शकुंतला पत्रलेखन’ हे चित्र १८७६ च्या मद्रास येथील प्रदर्शनात गव्हर्नर लॉर्ड बकिंगहॅम यांनी विकत घेतले व ते कमालीचे गाजले. पुण्यातील १८८० च्या प्रदर्शनात रविवर्मांचे ‘नायर लेडी प्लेइंग सितार’ या चित्राला गायकवाड सुवर्णपदक मिळाले व मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांनी स्वत:साठी त्या चित्राची प्रतिकृती करून घेतली.

रविवर्मा यांच्या चित्रांना १८८५ मध्ये कलकत्ता व लंडन येथील प्रदर्शनांत प्रशस्तिपत्रे मिळाली. रविवर्मांनी १८७३ मध्ये रंगवलेल्या व मद्रास येथे सुवर्णपदक मिळालेल्या चित्राला १८८७ मध्ये व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पुन्हा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. अमेरिकेतील शिकागो येथे १८९३ मध्ये भरलेल्या वल्डर्स कोलंबियन एक्झिबिशन या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात रविवर्मांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतीय चालीरीती व वेशभूषा दर्शविणारी रविवर्मांची दहा चित्रे त्यात प्रदर्शित झाली. रविवर्मांच्या चित्रसंचाला दोन सुवर्णपदके व प्रशस्तिपत्रे मिळाली. त्यांतील ‘ए गॅलॅक्सी ऑफ म्युझिशियन्स’ या चित्रात विविध प्रांतांतील वेशभूषा केलेल्या स्त्रिया दाखवल्या होत्या, त्या भारतीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून. पण परीक्षकांना मात्र त्यातील भारतीय स्त्रियांचे जातिविशिष्ट वैविध्य आणि वेशभूषा (एथ्नोग्रफिक कंटेंट) भावली हे विशेष! यामुळे त्यांचे केवळ वासाहतिक चित्रकार असे स्थान न राहता ते अकॅडमिक शैलीतील अयुरोपियन चित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यातून युरोपियन चित्रकारांची अकॅडमिक शैलीतील मक्तेदारी संपुष्टात येण्यास मदत झाली.

रविवर्मा यांनी अनेक संस्थानिकांची व इंग्रज शासकांची चित्रे केली. त्यांना १८७० मध्ये पहिले व्यावसायिक काम मिळाले ते कालिकत न्यायालयाने उपन्यायाधीश किझाके पलट कृष्ण मेनन यांच्या व्यक्तिचित्राचे. याच वर्षी त्यांनी रंगविलेल्या त्रावणकोरच्या महाराज व महाराणींच्या व्यक्तिचित्रांसाठी ‘वीरशृंगला’ हा बहुमान देण्यात आला. मद्रासचे गव्हर्नर ड्यूक ऑफ बकिंगहॅम यांनी १८७८ मध्ये गव्हर्न्मेंट हाउससाठी आपले व्यक्तिचित्र करून घेतले. याच वर्षी रविवर्मा यांनी पुडुकोट्टी संस्थानात राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे रंगविली.

रविवर्मा यांच्या काळात चित्रकाराला कारागिरापेक्षा जास्त प्रतिष्ठा नव्हती. रविवर्मा यांनी चित्रकलेत व्यावसायिक दृष्टिकोन आणला. व्यक्तिचित्रणातील त्यांच्या प्रावीण्यामुळे आणि तत्कालीन संस्थानिकांमध्ये या चित्रांना मिळालेल्या मान्यतेमुळे त्यांना बरीच कामे व पैसा मिळू लागला. रविवर्मांना १८८० च्या दशकात सी. राजा वर्मा या त्यांच्या धाकट्या भावाची साथ मिळाली. नंतरच्या काळात बहीण मंगलाबाई यादेखील रविवर्मांना मदत करत.

रविवर्मा यांची काम करण्याची पद्धत परंपरेपेक्षा अकॅडमिक शैलीला जवळची होती. त्यांच्या कामात सुधारणेला नेहमीच वाव असे. रफ स्केच करून, जे चित्र काढायचे त्यातील तपशील पुन्हापुन्हा तपासून त्या तपशिलांचे यथार्थवादी चित्रणात रूपांतर करून अंतिम चित्र तयार होत असे. व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीचे दृश्य व्यक्तिमत्त्व, साधर्म्य हुबेहूब साधणे यात रविवर्मा पारंगत होते. रविवर्मा यांच्या मुंबईतील स्टूडिओत एकाच वेळेस अनेक चित्रांची कामे चालू असत. ते सकाळी स्नान व पूजा आटोपून कामाला सुरुवात करीत. दिवसभराच्या कामात जेवण व दुपारची वामकुक्षी, एवढाच काय तो खंड असे. काम झाले की संध्याकाळी तारापोरवाला पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, नाटकाच्या प्रयोगाला जाणे किंवा मित्रांबरोबर गप्पा मारणे असा कार्यक्रम असे. विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याची व्यक्तिचित्रे आणि प्रदर्शनांसाठी पाठवायची चित्रे अशी विभागणी करून काम होई.

रविवर्मा पौराणिक विषयांवर चित्रे रंगवत. त्यांच्या चित्रांतील निसर्ग व वास्तूंचा तपशील रंगवण्याचे काम राजावर्मा करीत. चित्रे फ्रेम करण्यासाठी मुंबईतील एका फर्मशी त्यांनी करार केला होता. रविवर्मा एका व्यक्तिचित्रासाठी १८९९ मध्ये ७०० ते १५०० रुपये घेत. त्या काळात इतर भारतीय चित्रकारांपेक्षा ही रक्कम बरीच अधिक होती.

रविवर्मा यांची पाश्चिमात्य चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी विलायतेला जाण्याची खूप इच्छा होती. पण आपल्याला त्यामुळे जातीतून बहिष्कृत केले जाईल या भीतीने ते कधी गेले नाहीत. रविवर्मा यांच्या चित्रामध्ये मात्र पौर्वात्य आणि पाश्‍चात्त्य जगे गुण्यागोविंदाने नांदतात हे विशेष! बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १८८१ मध्ये त्यांचे स्वत:चे, महाराणी चिमणाबाई, राजकन्या ताराबाई, तत्कालीन ब्रिटिश रेसिडेंट मेल्व्हिल व दिवाण सर टी. माधवराव यांची व्यक्तिचित्रे करण्यासाठी रविवर्मा यांना आमंत्रित केले. त्यानंतर  रविवर्मांनी भावनगर राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्रे रंगवली. म्हैसूरचे राजे श्री चामराजेंद्र वोडियार यांनी १८८५ मध्ये रविवर्मांना राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर काही काळ रविवर्मांचे म्हैसूर येथे वास्तव्य होते. रविवर्मांना १८८८ मध्ये बडोद्याच्या नव्या राजवाड्यासाठी पौराणिक चित्रे काढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

पौराणिक काळातील वेशभूषा व दागदागिने यांचा अभ्यास करण्यासाठी रविवर्मांनी उत्तर हिंदुस्थानात बराच प्रवास केला. त्यानंतर त्यांनी भारतीय देवदेवता व पौराणिक प्रसंगांवरील चौदा चित्रे रंगवली. लक्ष्मी, सरस्वती, शिव-पार्वती, रामपंचायतन, विश्‍वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, कृष्णशिष्टाई अशी ही चित्रे होती. ही चित्रे घेऊन ते १८९० च्या अखेरीस बडोद्यास गेले. तेथे त्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले व ते प्रदर्शन कमालीचे गाजले. रविवर्मांना १८९६ मध्ये बडोदा संस्थानातर्फे पुन्हा एकदा १४ चित्रांचे काम देण्यात आले. त्यासाठी त्या काळी पन्नास हजार रुपयांचे मानधन ठरले. यातील विषय होते नल-दमयंती, अर्जुन-सुभद्रा, शंतनु-गंगा इत्यादी.

‘ऐतिहासिक चित्रे’ या संज्ञेला युरोपियन चित्रकलेत एक वेगळे स्थान आहे. कथनात्मक चित्रकला लघुचित्रशैलीच्या रूपात भारतात होतीच; पण विशिष्ट काळातला, ऐतिहासिक तपशिलांसह, आभासपूर्ण, पण यथार्थवादी शैलीत नेमका क्षण टिपण्याची पाश्‍चात्त्य कलेची पद्धत नवी होती. वर्मा यांच्या पौराणिक चित्रांमधील भावपूर्ण नाट्यात्मकतेतून आणि प्राचीन इतिहासाच्या मिथकातून या ‘ऐतिहासिक चित्रांच्या’ पाश्‍चात्त्य परंपरेला एक भारतीय वळण मिळाले.

त्यांचा १८८० पासून मुंबईशी संबंध होता. मुंबईच्या वास्तव्यात मराठी रंगभूमीशी त्यांचा संबंध आला व त्यातून महाराष्ट्रातील स्त्रियांच्या वेशभूषेची आकर्षकता त्यांना जाणवली. त्यांच्या सर्वच पौराणिक चित्रांमध्ये त्याचा परिणाम दिसू लागला. या काळात त्यांनी आपल्या चित्रांसाठी प्रत्यक्ष मॉडेलचा आधार घेतला. लक्ष्मी, सरस्वती या चित्रांसाठी सुप्रसिद्ध गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्या सुस्वरुप चेहऱ्याचा संदर्भ म्हणून उपयोग केला. मॉडेल म्हणून गोव्यातील कलावंतीण राजीबाई यांना प्रत्यक्ष बसवून सरावचित्रे केली.

रविवर्मा यांच्या पत्नीचे १८९१ मध्ये निधन झाले व मग ते मुंबईतच राहून चित्रनिर्मिती करू लागले. बडोद्याचे दिवाण सर टी. माधवराव यांनी रविवर्मा यांना १८८४ मध्ये त्यांची चित्रे युरोपातून ओलिओग्रफ पद्धतीने मुद्रित करून आणावीत असे सुचविले होते. त्या सल्ल्यानुसार १८९२ मध्ये रविवर्मांनी या कल्पनेस मूर्तरूप देण्यास ठरविले. दादाभाई नौराजी व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी विचारविनिमय करून त्यांनी मुंबईचे उद्योजक सेठ गोवर्धनदास खटाव माखनजी यांच्या भागीदारीत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. कला व तिचा व्यवसाय या दृष्टीने ही घटना महत्त्वाची होती. त्यासाठी जर्मनीहून तंत्रज्ञ आमंत्रित केले गेले. यामुळे रविवर्मा यांची देवदेवतांची व पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरील चित्रे हिंदुस्थानात घरोघरी पोहोचली व हा व्यवसाय यशस्वी ठरला. ‘लक्ष्मी’, ‘सरस्वती’, ‘शिव-पार्वती’, ‘रामपंचायतन’, ‘विश्‍वामित्र-मेनका’, ‘कृष्णशिष्टाई’, ‘दत्तात्रेय’ इ. त्यांनी रंगविलेली चित्रे त्या काळी फार गाजली व हिंदुस्थानात घरोघरी दर्शनी भागांत ती लावली गेली. यांखेरीज त्यांनी ‘हरिश्‍चंद्र-तारामती’, ‘नल-दमयंती’, ‘रावण-जटायू’, ‘मोहिनी-रुक्मांगद’, ‘श्रीकृष्ण-बलराम’, ‘ग़ंगावतरण’ यांसारख्या पौराणिक व्यक्ती व प्रसंग रंगविले. त्या काळात त्यांचे अतिशय गाजलेले चित्र म्हणजे ‘हंस-दमयंती’. सी.आर. रामानुजाचार्य यांनी या चित्रावर एक रसास्वादपर पुस्तक लिहून या चित्रातील मानवी व दैवी सौंदर्याचे रहस्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. १८९४ मध्ये रविवर्मा यांनी त्रावणकोरचे महाराज मार्तंडवर्मा यांचे पालक या नात्याने त्यांच्यासह पाच महिने हिंदुस्थानचा प्रवास केला. परतल्यानंतर त्यांची भारतीय पौराणिक विषयांवरील चित्रे व व्यावसायिक व्यक्तिचित्रांचे काम पुन्हा जोमाने सुरू झाले. या काळात त्यांचे मुंबई व त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणी वास्तव्य असे.

रविवर्मांनी १८९६ मधील ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध लढ्याच्या काळात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक; न्यायमूर्ती रानडे व लोकमान्य टिळक ही चित्रे रंगविली व ती शिळामुद्रित चित्रांद्वारे घरोघरी पोहोचली. लवकरच दोघा बंधूंनी हितचिंतक आणि एजंटांचे देशभर जाळे निर्माण केले व त्याचा व्यावसायिकदृष्ट्या परिणाम दिसून आला. देशात घरोघरी देवदेवता व पौराणिक विषयांवरील चित्रे विराजमान झाली.

प्लेगची साथ व राजकीय अस्थिरता यांमुळे १८९० च्या दशकात मुंबईत प्रेस चालविणे कठीण झाले व कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे १८९९ मध्ये मुद्रितचित्रांचा मोठा साठा २२,००० रुपयांस जोशी यांना विकण्यात आला. १९०१ मध्ये रविवर्मा प्रेस लोणावळ्याजवळील मळवली येथे स्थलांतरित करण्यात आला. १९०३ मध्ये प्रेसमधील प्रमुख जर्मन तंत्रज्ञ स्लेशर यांना प्रेस २५,००० रुपयांना विकण्यात आला.

१९०० मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी त्रिवेंद्रम येथील रविवर्मांच्या स्टूडिओला भेट देऊन त्यांची चित्रे पाहिली व प्रशंसा करून त्यांना कलकत्त्याला आमंत्रित केले. रविवर्मा यांनी १९०१ मध्ये उदयपूरचे महाराणा फतेहसिंग यांच्या आमंत्रणावरून उदयपूरला भेट दिली व महाराणा प्रताप यांची चित्रे रंगवली. त्याच वर्षी राजा दीनदयाळ यांच्या आमंत्रणावरून ते हैदराबाद येथे दोन महिने राहिले. त्यांनी तेथे निजाम यांचे व्यक्तिचित्र आणि ‘रिटायर्ड सोल्जर’ व ‘द बाथ’ अशी चित्रे रंगवली.

त्यांनी व्हाइसरॉय कर्झन यांच्या आमंत्रणावरून १९०२ मध्ये कलकत्त्याला दिलेली भेट संस्मरणीय ठरली. त्यांच्या स्वागतासाठी कलकत्ता रेल्वे स्टेशनवर थोर देशभक्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी स्वत: हजर राहिले. टागोर कुटुंबाच्या जोरा सेंको येथील निवासस्थानी स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आला. तेथे तरुण  अवनींद्रनाथ टागोरांची चित्रे रविवर्मा यांनी बघितली व अवनींद्रनाथांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्‍वास व्यक्त केला.

म्हैसूर येथील जगमोहन पॅलेससाठी पौराणिक विषयांवरील नऊ चित्रे करण्याचे काम रविवर्मा यांनी १९०४ मध्ये स्वीकारले व त्या चित्रांसोबतच त्यांनी राजवाड्यातील कलादालनाचे डिझाइनही केले. याच वर्षी इंपीरिअल ब्रिटिश सरकारतर्फे रविवर्मा यांना ‘कैसर-इ-हिंद’ या किताबाने गौरवण्यात आले. इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे देश घडविण्यातील महत्त्वाच्या सहभागाबद्दल गौरवण्यात आले.

अखेरच्या काळात रविवर्मा यांची प्रकृती वारंवार बिघडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध ‘कादंबरी’ या पुस्तकाची नायिका ‘कादंबरी’ हिचे वीणावादन करणारे चित्र रंगवण्यास घेतले; परंतु ते अपुरेच राहिले. किलीमनूर येथे असताना रविवर्मा यांचे वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी जगभरच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली.

त्यांच्या मृत्यूनंतर तामीळ महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांनी रविवर्मांचा गौरव करणारे काव्य लिहिले. सुप्रसिद्ध बंगाली चित्रकार अवनींद्रनाथ टागोर यांनी आपल्या भावना पुढील शब्दांत व्यक्त केल्या, ‘‘आजच्या काळात भारतावर प्रेम करणारा असा महान कलावंत व अशी व्यक्ती मिळणे कठीण आहे.’’

रविवर्मांनी पौराणिक देवदेवतांची चित्रे रंगविताना त्यांना मानवी रूपे दिली. त्यांच्या स्त्री-चित्रणाचे एक अनन्यसाधारण लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, चित्रांतील देवता व अन्य स्त्रिया महाराष्ट्रीय नऊवारी साडी परिधान केलेल्या अशा खास वेशभूषेत रंगवल्या आहेत. ‘स्त्रीच्या सुडौल देहाचे सौंदर्य नऊवारी लुगड्यात विशेष खुलून दिसते,’ असे मत त्यांनी या संदर्भात व्यक्त केले होते.

त्यांच्या स्त्रियांच्या चित्रणात चेहऱ्यावरचा मोहक गोडवा आणि पुष्ट, सुडौल, कमनीय बांधा ही वैशिष्ट्ये विशेष नजरेत भरतात. चेहर्‍यांवरचे विविधस्वरूपी भावप्रकटन, चित्रणात सूक्ष्म व बारीकसारीक तपशील वास्तव पद्धतीने रंगविण्याची हातोटी ही त्यांच्या प्रसंगचित्रांची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या चित्रांनी भारतीय सौंदर्यदृष्टीचा एक नवा मानदंड प्रस्थापित केला.

पौराणिक विषयांखेरीज रविवर्मांनी काही ऐहिक, लौकिक व सद्य:कालीन विषयांवरही चित्रे रंगवली. त्यांत काही व्यक्तिचित्रे, लोकजीवनावर आधारित प्रसंगचित्रेही आहेत. त्यांनी केलेली डॉ. दादाभाई नौरोजी यांच्यासारखी अनेक व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत.

केरळ ही रविवर्मा यांची जन्मभूमी असली, तरी महाराष्ट्र ही कर्मभूमी होती. महाराष्ट्राशी असलेले त्यांचे नाते अनेकपदरी व नानाविध संदर्भांनी युक्त होते. मुंबईमध्ये रविवर्मांचा चित्रनिर्मितीचा स्टुडीओ होता. मराठी रंगभूमीशी त्यांचा जवळचा संंबंध होता. रंगीत शिलामुद्रित छपाईद्वारे आपल्या चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार करून त्यांनी त्या सामान्य रसिकजनांना स्वस्त किमतीत उपलब्ध करून दिल्या. अशा प्रकारे त्या काळी राजेरजवाड्यांच्या व संस्थानिकांच्या महालांत अडकून पडलेली चित्रकला त्यांनी जनसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवली. त्या योगे महाराष्ट्रात त्या काळी घरोघरी रविवर्मांची चित्रे दिसू लागली.

रविवर्मांच्या चित्रांच्या रंगीत प्रतिकृती म्हणजे सध्याच्या दिनदर्शिकेची (कॅलेंडर) पूर्वपीठिका होय. ‘कॅलेंडर आर्ट’च्या रूपाने रविवर्मांच्या चित्रांचा महाराष्ट्रीय कलेवर व नंतरच्या चित्रकार पिढ्यांवर या-ना-त्या स्वरूपात प्रभाव पडत राहिला. सोलापूर येथील चित्रकार भरमणप्पा कोट्याळकर यांनी रविवर्मांच्या धार्मिक, पौराणिक चित्रांपासून प्रेरणा घेऊन दर्जेदार चित्रनिर्मिती केली. त्यांना ‘चंद्रवर्मा’ अशी पदवी देऊन औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांचा गौरव केला. ब्रह्मपाद बंडोपाध्याय या कलकत्त्यातील चित्रकाराने रविवर्मांच्या अर्जुन-सुभद्रा या चित्रावरून दुष्यंत-शकुंतला हे चित्र रंगवले. यात यतिवेषधारी अर्जुनाऐवजी दुष्यंत राजा व सुभद्रेला शकुंतला बनविले होते. ‘द स्टुडीओ ’ या प्रेसने जर्मनीमधून शिळामुद्रित चित्रे छापून आणली व त्याची विक्री केली. सुप्रसिद्ध चित्रकार ए.एच. मुल्लर यांचे १९११ मधील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सुवर्णपदक विजेत्या चित्रामागे रविवर्मांच्या ‘द वुमन गिव्हिंग आल्म्स’ याची प्रेरणा होती. मुल्लर यांच्या चित्राचे नाव होते, ‘प्रिन्सेस गिव्हिंग गिफ्ट टू ब्रॅह्मीन बॉय’.

रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल प्रभृती चित्रकारांनी रंगविलेल्या स्त्रियांच्या चित्रांतील चेहऱ्यांवरचा गोंडस गोडवा व पुष्ट कमनीय बांधा यांची आद्य बीजे रविवर्मांच्या चित्रांमध्ये दिसतात.

रविवर्मा यांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम या निर्माता-दिग्दर्शकांनी चित्रपटमाध्यमाच्या आद्य पर्वात पौराणिक-ऐतिहासिक मराठी चित्रपटांसाठी रविवर्मांच्या चित्रांतील प्रतिमा सामाजिक संदर्भ म्हणून वापरल्या. त्यामुळे या चित्रांना एक संदर्भमूल्य प्राप्त झाले.

रविवर्मा यांच्या चित्रप्रतिमांचा सांस्कृतिक प्रभाव विविध क्षेत्रांत पडला. त्यांचा वापर व्यवसाय व जाहिरात क्षेत्रासाठी आजही होत असल्याचे आढळते. जर्मनीत १९१० च्या दरम्यान सरस्वती व शिव-पार्वती, गणपती अशा मूर्ती पोर्सलेनमध्ये बनवण्यात आल्या आणि त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. रविवर्मांचे लक्ष्मीचे चित्र लक्ष्मी छाप हिंग व लक्ष्मी फटाका यांवर ब्रॅण्ड म्हणून वापरले गेले. आजही व्यापाऱ्यांच्या खतावणीवरील चित्र व दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची चांदीची प्रतिमा रविवर्मांच्या चित्रावरच आधारित असते.

रविवर्मांची ‘बर्थ ऑफ शकुंतला’ व ‘विश्‍वामित्र-मेनका’ ही चित्रे बेबी फूडच्या डब्यांवर मुद्रित करण्यात आली. स्वीडनमधून येणाऱ्या काड्यापेटीवर जटायू वधाचे चित्र छापलेले होते.

स्वातंत्र्यपूर्वकाळात व रविवर्मा हयात असल्यापासून राजकीय व्यंगचित्रे व प्रचारासाठी रविवर्मांच्या चित्रांचा वापर झाल्याचे आढळते. देवदेवतांची अश्‍लील चित्रे काढल्याच्या संदर्भात १८९४ मध्ये गिरगाव न्यायालयात रविवर्मा यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्या न्यायप्रक्रियेत न्या. रानडे व जार्डिन यांचा सहभाग होता. त्यातून रविवर्मा यांची निर्दोष मुक्तता झाली.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील चित्रकलेचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले व यथार्थवादी कलेवर टीका होऊ लागली. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने १९९३ मध्ये रविवर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. दहा आठवड्यांच्या कालावधीत या प्रदर्शनाला रोज सरासरी बाराशे प्रेक्षकांनी भेट दिली. परंतु आधुनिक शैलीत काम करणाऱ्या काही समकालीन कलावंतांनी रविवर्मांच्या कलानिर्मितीवर जाहीर टीका केली. त्यांचे म्हणणे असे होते की, आधुनिक भारतीय कलेत रविवर्मांचे योगदान अजिबात नव्हते. ‘त्यांची चित्रे म्हणजे वस्तू (ऑब्जेक्टस) होत्या. कलाकृती नव्हत्या’ असे त्यांचे मत होते. वास्तविक पाहता रविवर्मांची चित्रे त्या काळाच्या संदर्भात पाहिली पाहिजेत. भारतीय पारंपरिक कलानिर्मितीला रविवर्मांच्या यथार्थदर्शी चित्रशैलीने वेगळे वळण दिले व पुढील काळातील प्रयोगशील कलानिर्मितीसाठी पाया व पार्श्‍वभूमी उपलब्ध करून दिली.

आज रविवर्मा यांचे महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहे. त्यांच्या चित्रांना जगभर होणाऱ्या चित्रलिलावात प्रचंड मागणी असून ती विक्रमी किमतीला विकली जात आहेत. किलीमनूर या त्यांच्या जन्मगावी रविवर्मा यांची चित्रे, स्केचेस, डायर्‍या, लिथोस्टोन्स व मुद्रणसामग्री अशा गोष्टींचे संग्रहालय असून वडोदरा, त्रिवेंद्रम व म्हैसूर येथे त्यांची चित्रे पाहावयास मिळतात. चित्रशाळा प्रेसने १९२५ मध्ये छापलेल्या ‘राजा रविवर्मा यांची नामांकित चित्रे’ या पहिल्या पुस्तकापासून आजवर रविवर्मा यांच्यावर विविध भारतीय भाषांत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

- एस.डी. इनामदार, सुहास बहुळकर

संदर्भ
१. चैतन्य कृष्ण; ‘रविवर्मा’; ललित कला अकादमी; १९६०. २. अस्वथी, थिरुमल, गौरी लक्ष्मीबाई (इंग्रजी लेख); ‘राजा रविवर्मा ः एक युगान्तकारी चित्रकार’. ३. पार्था, मित्तर; ‘आर्ट अ‍ॅण्ड नॅशनॅलिझम इन कलोनिअल इंडिया’, १८५०-१९२२, ऑक्सिडेन्टल ओरिएन्टेशन्स, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९९४. ४. जोशी, शंकर नरहर; ‘राजा रविवर्मा यांची नामांकित चित्रे’; चित्रशाळा प्रेस, पुणे (चित्रांखालील टिपा ः आजगावकर, जगन्नाथ रघुनाथ).
रविवर्मा, कोईल तंपुरन