Skip to main content
x

साबावाला, जहांगीर अर्देशीर

             क्यूबिझमसारख्या आधुनिक शैलीला चिंतनशीलतेची डूब देऊन निसर्गचित्रांचे रूपांतर वास्तवाच्या नवनिर्मितीत करणारे महत्त्वाचे चित्रकार म्हणून जहांगीर साबावाला प्रसिद्ध आहेत.

                 जहांगीर अर्देशीर साबावाला यांची आई मेहरबाई या, सामाजिक कामात सक्रिय असणार्‍या सर कावसजी जहांगीर यांच्या कन्या होत्या. साबावाला यांच्यावर सामाजिकतेचे संस्कार घडले ते आईवडिलांमुळे. पुढील काळात वडील अर्देशीर आणि आई मेहरबाई हे विभक्त झाले आणि त्याचा मानसिक परिणाम वयात येणार्‍या जहांगीरवर झाला. साबावाला यांच्या स्वभावाचा कल एकटेपणाकडे झुकला. नंतरच्या काळात त्यांनी याच एकटेपणातून चिंतनशीलता आणि कलानिर्मितीची ताकद मिळवली.

                 साबावाला आणि त्यांची आई यांचे नाते याच काळात दृढ झाले. आईसोबत साबावाला ‘द रिट्रीट’, ‘आवान-ए-रफायत’ अशा मेहरबाई यांच्या परंपरागत, उच्चभ्रू घरांमध्ये राहिले. या घरांमध्ये खेळायला मुले नसली तरी आईने जोपासलेली झाडे, प्राणी, पक्षी, घरातून दिसणारा समुद्र असे निसर्गरम्य वातावरण होते. आईबरोबर युरोप आणि भारतात प्रवास घडल्यामुळे साबावाला यांना कलासंस्कृतीची ओळख बालवयातच झाली आणि त्यानुसार त्यांची अभिरुची घडत गेली.

                 याशिवाय स्वित्झर्लंडमधल्या वास्तव्यात, बालपणात अनुभवलेल्या निसर्गाचा, विशेषत: प्रकाश, आकाश, पाणी या सार्‍यांचा परिणाम साबावालांवर झाला. पुढे त्यांच्या चित्रांत तो सातत्याने दिसत राहिला.

                 औपचारिक शिक्षणामध्ये साबावाला यांना कधीच फारसा रस नव्हता. ते 1939 च्या सुमारास थोड्याशा नाखुशीनेच लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले; पण युद्धजन्य परिस्थितीमुळे ते भारतात परत आले. स्वातंत्र्यचळवळीचे ते दिवस होते. या काळातल्या सामाजिक परिवर्तनामुळे मूळची गंभीर प्रवृत्ती असणारे साबावाला अधिकच चिंतनशील झाले.

                 जहांगीर साबावाला यांना 1942 मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रिन्सिपल चार्ल्स जेरार्ड यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची औपचारिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण न करताही व्यक्तिचित्रणाच्या वर्गाला येण्याची परवानगी दिली. त्यांनी 1942 ते 1944 या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकल्यानंतर 1945 ते 1947 या काळात स्कूल ऑफ आर्ट, लंडन येथे, 1948 ते 1951 या काळात पॅरिस येथील अकॅडमी आन्द्रे होट व 1953 ते 1954 या काळात अकॅडमी ज्यूलियन, तसेच 1957 मध्ये अकॅडमी द ला ग्रँड शुमिए अशा ठिकाणी त्यांनी आपले कलाशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील कलाशिक्षणाच्या काळात साबावाला यांना समविचारी लेखक, छायाचित्रकार, चित्रकार मित्र रिचर्ड लानॉय भेटले. ही मैत्री जीवन आणि कला यांना व्यापून शेवटपर्यंत टिकली आणि परस्परांच्या कलानिर्मितीला पूरक ठरली. याच काळात लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये समाजशास्त्राचा अभ्यास करणार्‍या शिरीन दस्तूर साबावालांना भेटल्या आणि त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या. साबावाला यांच्या कलाप्रवासात शिरीन यांचा सहभाग मोलाचा होता.

                 कलासमीक्षक आणि क्यूबिझम शैलीचा वापर करणारे आंद्रे होट यांच्या स्टूडिओमधील कलाशिक्षण साबावालांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. होट यांनी इंग्रं (खसिीशी) सेझां या चित्रकारांच्या चित्रांचे विश्‍लेषण केले होते. सेझांच्या चित्रांमधला प्रकाश व रंगांचा अभ्यास आणि क्यूबिझमचा प्रभाव साबावालांच्या तत्कालीन चित्रांवर जाणवतो. या प्रभावातून साबावाला नंतर बाहेर पडले.

                 साबावाला 1950 च्या सुमारास फ्रान्समधून परत आले, तेव्हा स्वातंत्र्योत्तर भारतात फाळणीचे पडसाद, अस्थिरता आणि स्वातंत्र्याचा आनंद असे संमिश्र वातावरण होते. भारतातच स्थिरस्थावर व्हावे की फ्रान्सच्या कलात्मक वातावरणात परत जावे अशा द्विधा मन:स्थितीत साबावाला यांचा दहा ते बारा वर्षांचा काळ गेला. घरे बदलत राहिली; पण या सार्‍याचा परिणाम साबावालांनी आपल्या कलानिर्मितीवर होऊ दिला नाही. या काळात मुंबईमध्ये कलादालने उभी राहिली नव्हती. साबावाला यांचे मामा, लघुचित्रशैलीचे व भारतीय शिल्पांचे संग्रहक सर कावसजी जहांगीर (दुसरे, 1879-1962) यांनी दिलेल्या देणगीतून 1952 मध्ये मुंबईत ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ निर्माण झाली. मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) 1980 ते 1990 पर्यंतच्या काळात सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

                 ‘टू विमेन ऑफ जयपूर’ आणि ‘थ्रस्ट अ‍ॅण्ड पॅटर्न’ ही 1958 च्या सुमारास साबावालांनी काढलेली चित्रे क्यूबिझमचा प्रभाव असलेली होती. युरोपात ब्राक, युआन ग्री आणि पिकासो यांनी क्यूबिझम शैली विकसित केली. त्याची बीजे पॉल सेझांच्या भौमितिक आकारांच्या वापरात होती. आकृतीचे अनेक अंगांनी केलेले निरीक्षण एका दृष्टिक्षेपात पाहता येणे हे या शैलीचे वैशिष्ट्य होते. हा प्रवास होण्याकरिता 1963 साल उजाडावे लागले. 1963 पूर्वीच्या दिल्लीतील एका चित्रप्रदर्शनात प्रसिद्ध कलासमीक्षक फाबरी यांनी साबावाला यांना त्यांच्या (क्यूबिझम) शैलीविषयी व या शैलीच्या प्रभावाविषयी काही प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना 1963 सालचे ‘जर्नी ऑफ द मागी’ हे चित्र साबावालांच्या चित्रप्रवासातील आणखी एक महत्त्वाचे चित्र ठरले. इथूनच पुढे त्यांचा पंचतत्त्वांचा विचार व आत्मशोध सुरू झाला.

                 त्यांनी 1963 नंतरच्या चित्रांमध्ये रचनात्मक प्रयोग केले व हळूहळू त्यांची स्वतंत्र चित्रभाषा निर्माण झाली. साबावालांच्या चित्रांमध्ये उभट टोकदार आकारांच्या, चित्रामधील वरच्या अवकाशात निमुळत्या होत गेलेल्या रचना दिसतात. भारतीय व पाश्‍चात्त्य वास्तुकलेच्या प्रभावांमधून हे आकृतिबंध निर्माण झाले. उंच किंवा आडवे टोकदार आकार; हिरवी, निळी उजळ छटांची विशिष्ट रंगसंगती आणि क्षितिजरेषा; आकार व अवकाशाचे रचनात्मक भान, गूढ वातावरण आणि या वातावरणात स्वत:चे अस्तित्व जपणारी छोटी मानवी आकृती ही साबावाला यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत.

                 साबावाला 1970 च्या दरम्यान ‘द फ्लाइट इन टू इजिप्त’, ‘द एम्बार्केशन’ अशा चित्रांमधल्या करड्या रंगाच्या रंगछटांमधून ‘तटस्थता’, ‘अध्यात्म’, ‘मृत्यू’ असे विषय हाताळू लागले. ‘द रोझ परदा’सारख्या  चित्रकृती आणि त्या दरम्यानची बौद्ध भिक्खूंंवरील चित्रमालिका यांतून साबावाला यांनी मानवी मनातील आंदोलनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण साबावाला त्यात फारसे रमले नाहीत. त्यांच्या 1986 नंतरच्या चित्रांमधून निसर्ग हाच मुख्य आशय येऊ लागला.

                 जहांगीर साबावाला यांच्या चित्रनिर्मितीची सुरुवात व प्रोग्रेसिव्ह ग्रूपचा काळ हा साधारण एकच काळ होता. प्रोग्रेसिव्ह चळवळ व त्यानंतरच्या भारतातील कलाचळवळी यांचे ते साक्षीदार आहेत. पण अशा चळवळींपासून अलिप्त राहून, गंभीरपणे स्वत:ची लय शोधण्याकडे त्यांचा कल होता. भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील निसर्गचित्रणाच्या परंपरेपेक्षा वेगळ्या वैचारिक दृष्टीने व दृक्प्रतिमांद्वारे त्यांनी केलेल्या चित्रकृती हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान आहे.

                 साबावाला यांची वृत्ती मुळात अभ्यासकाची होती. मानवी रूपांचा आणि निसर्गाचा निरीक्षणाद्वारे त्यांनी सखोल अभ्यास केला. क्यूबिझम शैली हाताळलेल्या सेझां, ब्राक, पिकासो, फेनिंजर या चित्रकारांच्या कामाची साबावाला यांनी समीक्षकाच्या दृष्टीने चिकित्सा केली आणि त्यातून स्वत:ची शैली घडवली. लायोनेल फेनिंजर यांच्या चित्रशैलीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. निसर्गाचे भौमितिक आकारांमध्ये रूपांतर करण्यातला बौद्धिक आनंद अनुभवत असतानाच साबावाला यांनी फेनिंजर यांच्या चित्रांचे परिशीलन केले आणि त्यांच्या चित्रांमध्ये प्रकाशाचा तजेलदारपणा येऊ लागला. त्यांचे चित्र सूक्ष्म रंगछटांनी बनलेल्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि त्यांच्या तैलचित्रांना पेस्टलमध्ये असतो तसा एक हळुवार पोत प्राप्त झाला.

                 विभागलेल्या, खंडित, करडेपणाकडे झुकणार्‍या रंगछटा वापरण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या या रंगछटांवरील प्रभुत्वामुळे त्यांची अनेक निसर्गचित्रे अविस्मरणीय असा दृश्य अनुभव देतात. साबावाला प्रथम चारकोलने रेखांकन करून घेत. त्यामुळे चित्राचा रचनात्मक आराखडा किंवा ग्रिड तयार होई. त्यावर मग ते रंगकाम करीत. या रंगछटा त्यांच्या निसर्गाच्या अभ्यासातून आलेल्या असत. त्यातून कधी निसर्गाची प्रतिरूपे निर्माण होत, तर कधी निसर्गघटक आणि त्यांच्या निसर्गदत्त रंगछटांची उलटापालट करून एक अतिवास्तव, गूढरम्य वातावरणही निर्माण होई.

                 साबावाला यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या चित्रनिर्मितीला आणि त्यातल्या आशयाला पूरक असेच होते. साबावाला यांचा पाश्‍चात्त्य पोशाख, त्यांच्या भरघोस मिशा यांमुळे ते सैन्यातल्या कर्नलसारखे वाटले, तरी त्यांचा मृदू स्वभाव, वागण्याबोलण्यातला खानदानी आदबशीरपणा आणि तरुण, नवोदित चित्रकारांबद्दल, त्यांच्या कामांबद्दल त्यांना असलेली आत्मीयता यांमुळे चित्रकलेच्या क्षेत्रात सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदर होता. सौंदर्यपूजक वृत्तीचे साबावाला पोशाख करण्यापासून, घराची सजावट, वस्तूंचा संग्रह करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत चोखंदळ होते. या सौंदर्यवृत्तीत एक प्रकारची अभिजातता होती. त्यामुळे आधुनिक कलेतील विरूपीकरण त्यांच्या क्यूूबिस्ट शैलीत कधी डोकावले नाही. आधुनिक कलेतील बंडखोरी, प्रस्थापित अभिरुचीला या कलेने दिलेले आव्हान, आपल्या विक्षिप्त वागण्याने कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाला आलेले अवास्तव महत्त्व अशा समकालीन भारतीय चित्रकलेच्या पार्श्‍वभूमीवर साबावाला ज्या वृत्तिगांभीर्याने आणि व्रतस्थपणे आपला स्वत:चा मार्ग चोखाळत राहिले, त्याने साबावाला यांच्या कलानिर्मितीला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.

                 ‘चित्र हीच माझी साधना आहे आणि मोक्षाकडे जाणारा मार्गसुद्धा!,’ असे म्हणणार्‍या व कलावंत हा निसर्ग आणि माणुसकी यांमधले माध्यम असतो हा विचार केंद्रस्थानी ठेवून कलानिर्मिती करणार्‍या साबावाला यांच्या चित्रशैलीविषयी देशी-परदेशी कलासमीक्षकांनी लेखन केले आहे. १९७७ साली जहांगीर साबावाला यांना भारत सरकारने कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. अरुण खोपकर निर्मित-दिग्दर्शित साबावाला यांच्या कलाकृतींवर केलेला ‘कलर्स ऑफ अ‍ॅब्सेन्स’ हा अनुबोधपट (डॉक्युमेंटरी फिल्म) १९९३ साली प्रदर्शित झाला. जहांगीर साबावाला यांचे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

- माणिक वालावलकर

साबावाला, जहांगीर अर्देशीर