Skip to main content
x

साळवे, काशिनाथ सत्यवान

        काशिनाथ सत्यवान साळवे यांचा जन्म अहमदनगर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधील मिशनरी शाळेत, तर सहावीनंतर मुंबईच्या प्रसिद्ध विल्सन हायस्कूलमध्ये झाले. एसएससीनंतर साळवे यांनी शाळेतील शिक्षक बुंदेलू सरांच्या आज्ञेने १९६३ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. घरात कमवणारी व्यक्ती एक व कुटुंब सदस्य अनेक व मिळकतही बेताचीच अशा कठीण परिस्थितीशी सामना देत साळव्यांनी आपली कलासाधना केली.

           प्रा.गजानन भागवत यांच्याबरोबर १९६९ मध्ये फाउण्डेशनचा नवीन अभ्यासक्रम शिकवताना साळवे यांना शिक्षक म्हणून दिशा मिळाली.

           साळव्यांची १९७६ ते १९८७ या काळात नागपूर विद्यापीठात बदली झाली. त्या कालखंडात अनेक चढउतारांना साळवे खंबीरपणे सामोरे गेले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नवे उपक्रम सुरू झाले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांना महाराष्ट्राबाहेरील कलासंस्थांची दालने दाखवली, तसेच दिल्ली, भोपाळ, गढी, बडोदा इथल्या कलासंस्थांमध्ये पाठवून त्यांची कलाजाणीव विकसित केली.

           नागपूरच्या वास्तव्यात साळव्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन अनेक भित्तिचित्रे (म्यूरल्स) केली. त्यातून विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र अनुभव मिळाला. त्यांनी केलेल्या अनेक म्युरल्सपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई; नाबार्ड मुंबईचे मुख्य कार्यालय; इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च; मुंबईचा मुख्य दरवाजा; वाशी नवी मुंबई रेल्वे स्टेशन; रिलायन्स रिफायनरी, जामनगर; हरकिसनदास हॉस्पिटल, मुंबई अशा ठिकाणी ती म्यूरल्स आहेत. उत्थित शिल्पाचे (हाय रिलीफ) तंत्र वापरून व मिश्र माध्यमात केल्यामुळे त्यांत वेगळेपणा जाणवतो.

           साळव्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक माध्यमे यशस्वीपणे हाताळून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. ज्या शिताफीने ते अमूर्त चित्रे, उत्थित शिल्पे, स्टिल लाइफ करतात, तेवढ्याच सराईतपणे ते पोर्ट्रेट पेंटिंगही करतात. प्रिन्टमेकिंग हा त्यांचा आवडता विषय. त्यात त्यांना प्रा. वसंत परब यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

           साळवे यांनी अनेक प्रयोग केले. लिथोग्रफी, इंटॅग्लिओ, व्हिस्कॉसिटी अशी मुद्राचित्रांची विविध माध्यमे त्यांनी समर्थपणे वापरली. १९७०-७१ दरम्यान दिल्लीत पॉल लिंगरेन यांच्या वर्कशॉपमध्ये, तसेच १९८१ मध्ये ललित कला अकादमी, नवी दिल्ली आयोजित बॉब व केन या सेरिग्रफीतील ब्रिटिश तज्ज्ञांच्या पोस्टर प्रिंटिंग वर्कशॉपमध्ये त्यांनी भाग घेतला. कृष्णा रेड्डी यांच्या यूसीसतर्फे आयोजित व्हिस्कॉसिटी वर्कशॉपसाठी १९८५ मध्ये साळवे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

           प्रा. काशिनाथ साळवेंना ‘डॉली करसेटजी’ पुरस्कार (१९६८), सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक प्रदर्शनाचे सुवर्णपदक (१९६९), १९७१, १९७५ व १९९२ या वर्षांत महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनांत तीन वर्षे ‘ग्रफिक्स’ आणि ‘पेंटिंग’मध्ये राज्य पुरस्कार, व्यावसायिक कलाकार विभागात उत्तर प्रदेश ललित कला अकादमी, लखनऊचे रोख पारितोषिक (१९८०) बॉम्बे आर्ट सोसायटीचा  पुरस्कार (१९९०) तर ललित कला अकादमी, नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार (१९९५) असे अनेक पुरस्कार लाभले.

           त्यांनी १९६९ पासून भारतात व परदेशातही आपल्या कलाकृतींची जवळपासतीसहून अधिक समूह व एकल प्रदर्शने भरवली आहेत.

           सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून २००१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रॉबर्ट मनी टेक्निकल स्कूल, ग्रँट रोड येथे स्टूडिओ वर्कशॉप स्थापन केले. हा स्टूडिओ ‘के अकॅडमी ऑफ फाइन आर्ट’ या नावाने ओळखला जाऊ लागला. नवोदित व प्रस्थापित चित्रकारांना वेगवेगळ्या माध्यमांत काम करण्यासाठी अध्ययावत वर्कशॉप व स्टूडिओ मिळावा, त्यात प्रिंटमेकिंग, ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग, सिरॅमिक, स्टेन्ड ग्लास, ग्लास ब्लोइंग अशी माध्यमे हाताळता यावीत हा त्यामागचा उद्देश होता. जवळजवळ नऊ वर्षांच्या कालावधीत अनेक चित्रकारांनी तेथे काम केले.

           नंतर साळवे यांनी ठाण्यात शर्मिला अय्यर यांच्या मदतीने कोठारे कम्पाउण्ड येथे हा स्टूडिओ वर्कशॉप त्याच व्यवस्थेसह स्थलांतरित केला. त्याचे ‘व्हिज्युअल आर्ट अकॅडमी’ असे नामकरण करण्यात आले. आज अनेक प्रथितयश चित्रकार या व्यवस्थेचा लाभ घेत आहेत.

           साळवे महाराष्ट्रात आणि हरियाणासारख्या इतर राज्यांतील कलाक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून मार्गदर्शन करीत असतात.

- अरविंद हाटे

साळवे, काशिनाथ सत्यवान