Skip to main content
x

शेणोलीकर, अरुण काशिनाथ

          रुण काशिनाथ शेणोलीकर यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे झाला. त्यांचे लहानपण आणि  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ब्रह्मपुरी या गावात झाले. त्यांनी नागपूर येथून बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतले व त्यानंतर जबलपूर येथून स्थापत्यशास्त्रात बी.ई. ही पदवी घेतली. १९५३ ते १९६० मध्ये ते महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आणि नंतर जलसिंचन विभागात कार्यरत होते. १९६० ते १९७० या काळात शेणोलीकर यांनी कोयना प्रकल्पावर अभियंता म्हणून काम पाहिले. १९७० पासून पुढील दहा वर्षे शेणोलीकर मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांतील आंतरराज्य नियामक मंडळावर होते. त्यानंतर ते नाशिक व नागपूर येथील पाणीपुरवठा खात्यात होते. १९८० पासून १९८६ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निवृत्तीपर्यंत ते नागपूर जलसिंचन विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
       विदर्भ क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्याचे महत्त्वाचे मूलगामी कार्य अरुण शेणोलीकर यांनी आपल्या कार्यकाळात केले. १९८०-१९८२ च्या आधी इटिया डोह व शिरपूर धरण सोडले, तर संपूर्ण विदर्भात कुठेही धरण नव्हते. सी.पी.अ‍ॅण्ड बेरार प्रांतात हा भाग असताना १९३१ साली ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सिंचन कमिशनने येथे सिंचनाची गरज नाही या भावनेतून या भागात सिंचनाचे कुठलेच प्रकल्प आरेखित केले नव्हते. त्यामुळे संभाव्य धरणांसाठी सर्वेक्षणदेखील झाले नाही.
      १९६० साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर विदर्भाला सिंचनासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा तर एकही अन्वेषित प्रकल्प नव्हता. हे अत्यंत महत्त्वाचे काम शेणोलीकर मुख्य अभियंता झाले तेव्हा त्यांनी केले. सुमारे दीड वर्षांच्या काळात गोसीखुर्दसह ७०० ते ८०० कोटी रुपयांचे प्रकल्प त्यांनी अन्वेषित केले. यात ११ मोठे व ४८ मध्यम प्रकल्प होते. यानंतर विदर्भातही सिंचनाची आवश्यकता आहे, याचे महत्त्व लोकांना व राजकीय नेत्यांना पटू  लागले. त्या आधारावर मग सिंचनासाठी निधी मागण्यात येऊ लागला.
      विदर्भात त्या काळी सिंचनामुळे जमीन खारट होते, अशी भावना होती. त्यामुळे सिंचनाला विरोध होता. लोकांची ही भावना बदलविण्याचे कामही शेणोलीकर यांनी केले. त्यांना ‘डायनॅमिक इरिगेटेड अ‍ॅग्रिकल्चर’ ही कल्पना त्यांनी समजावून सांगितली. शेणोलीकर यांचे खरे कसब लागले ते 'तोतलाडोह' योजना करताना. पेंच नदीवरील या धरणाचा उजवा कालवा नागपूर जिल्ह्यातील संत्री बाग व कापूस क्षेत्रातून जाणार होता. परंतु शेणोलीकर यांनी स्वत:च्या प्रयत्नांनी डावा कालवा मंजूर करून बांधून घेतला. या कालव्यामुळे रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाचे पीक घेणे सुरू केले. उजव्या कालव्यामुळे २८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती. डावा कालवा तयार केल्यामुळे ७८ हजार हेक्टर अतिज सिंचनाखाली आली आहे. शेतकऱ्यांशी सतत संपर्क ठेवून त्यांना कुठल्या प्रकारचे सिंचन हवे, याची ते माहिती घेत असत. त्या आधारे त्यांनी सिंचन प्रकल्पांचे आरेखन केले.
       विदर्भातील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प गोसीखुर्द, वैनगंगेवरील भंडारा शहरानजीकच्या या प्रकल्पाची संकल्पना देशात कदाचित एकमेव असावी. वैनगंगा नदीकाठची जमीन अत्यंत सुपीक आहे. ही जमीन धरणात जाऊ नये म्हणून शेणोलीकरांनी एक नवा प्रयोग केला. धरणापासून १०० कि.मी. दूर असलेल्या आसोलामेंढा धरणात हे पाणी न्यायचे आणि त्या धरणाची सिंचनक्षमता वाढवायची असे त्यांनी ठरविले. आसोलामेंढा धरणामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येत होती. शेणोलीकरांच्या या प्रयोगामुळे आता हेच धरण एक लाख हेक्टर जमिनीचे सिंचन करीत आहे. तिथले लोक आता धान्याचे दुबार पीक घेऊन संपन्न झाले आहेत.
       निवृत्तीनंतर शेणोलीकर जलसिंचन संबंधातील शासकीय, तसेच खाजगी प्रकल्पावर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. याच दरम्यान त्यांनी कोयना प्रकल्प, घाटघर हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प, तसेच अनेक दुष्काळी प्रकल्पांवर काम केले आहे. शेणोलीकर यांनी जलसिंचन विषयाशी संबंधित सुमारे ५० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

- श्रीनिवास वैद्य

शेणोलीकर, अरुण काशिनाथ