Skip to main content
x

शिंदे , दीपक गोविंद

      प्राणी जगतातील सहजीवनाच्या, त्यांच्या परस्पर दैनंदिन व्यवहाराच्या चित्रणातून दीपक शिंदे आदिम प्रेरणांचा शोध घेतात. आक्रमक रंगलेपन हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.

दीपक गोविंद शिंदे यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ या गावी, शिंदे-पाटील या जमीनदार घराण्यात झाला. त्यांच्या कलाप्रेमी आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण व वाणिज्य शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळमध्येच झाले.

त्यांनी १९६७ मध्ये नागपूर विद्यापीठातून वाणिज्य या विषयाची पदवी मिळवली. त्यानंतर घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मुंबई येथे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९७२ मध्ये ते  चित्रकला विषयातील जी.डी. आर्ट ही पदविका उत्तीर्ण झाले.

त्या काळात मुंबईच्या कलाविश्‍वात अमूर्त शैलीच्या चित्रांचा प्रभाव होता. गायतोंडे, आरा, मोहन सामंत, तय्यब मेहता, रझा बाकरे, पदमसी या चित्रकारांचा बोलबाला होता. चित्रकार शंकर पळशीकर हे त्या काळात जे.जे. मध्ये शिकवायचे. त्यांच्या चित्रविचारांचा प्रभाव या तरुण चित्रकारावर होऊन शिंदे यांनी चित्रकार म्हणून जगण्याचा निर्णय घेतला.

दीपक शिंदे यांचा आजपर्यंतचा चित्रप्रवास पाहता, त्यांच्या चित्रांमध्ये अमूर्ततेपासून सामाजिक विषयांपर्यंतची मुख्यत: दोन स्थित्यंतरे झाली. साधारणत: १९७१ ते १९७८ या काळात त्यांची चित्रे अमूर्त वळणाची होती. जोरकस व जाड रंगलेपन हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. आकारांच्या मांडणीपेक्षा, एकावर एक चढवलेले निरनिराळे पोत व जोरकसपणे केलेले रंगलेपनाचे फटकारे संपूर्ण चित्र भारून टाकत असत. ब्लॉन्च गोन्साल्वीस हिच्याशी १९७७मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला. पतीच्या प्रोत्साहनातून त्यासुद्धा कलाभ्यासाकडे वळल्या व आज नियती शिंदे या कलासमीक्षक, कलाभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.

शिंदे यांच्या रंगलेपनाचा आवेग १९८० नंतर कमी होऊन आकाराला महत्त्व येऊ लागले. याच काळात ‘ग्रीन ख्राइस्ट’ या चित्रातून त्यांनी मानवाकृतीचे चित्रण केले आणि ते अमूर्ततेकडून मानवाकृती चित्रणाकडे वळले. ‘दोन बालके’ (टू किड्स), ‘आसरा’, (शेल्टर), ‘अ‍ॅन्सरिंग दी डोअर बेल’ यांसारखे सामाजिक जीवनातील विषय त्यांच्या चित्राची प्रेरणा ठरू लागले.  मनुष्याकृतीमुळे चित्राला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो, असे ते म्हणतात.

या काळात बडोदा स्कूलचा प्रभाव कलाजगतात पसरायला सुरुवात झाली होती. मनुष्य आणि त्यांचे समाजजीवन बडोद्यातील कलाविचारांचा केंद्रबिंदू होता. त्याचा प्रभाव दीपक शिंदे यांच्यावर पडला.

दीपक शिंदे यांच्या चित्रांत १९९३ नंतर आकारांच्या माध्यमातून मनुष्याकृती पुन्हा विविध पद्धतीने मांडण्याचे प्रयोग दिसून येतात. यातूनच त्यांची चित्रातली अभिव्यक्ती नव्याने मूर्त-अमूर्त पातळीवर प्रभावी होत गेली.

त्यांचे २००५ सालचे एकल चित्रप्रदर्शन ‘पॅराबल्स अ‍ॅण्ड पॅशन’ यात फक्त प्राणिविश्‍व जंगलाच्या पार्श्‍वभूमीवर चितारले गेले. प्राण्यांच्या सहजीवनातल्या भावभावनांच्या अनुषंगाने दीपक शिंदे अभिव्यक्त होताना दिसतात. माकड, हरीण, वाघ, सरडा, बकरी, मासा असे आकार आपल्या शैलीत ते चितारतात व प्रतीकात्मक भावार्थ दर्शकापर्यंत यशस्वीपणे पोहोचवतात.

प्रायोगिकता हा त्यांच्या चित्रांचा विशेष आहे. अमूर्ततेपासून सुरू झालेला दीपक शिंदे यांचा चित्र प्रवास प्राणिविश्‍वाच्या विविध भावभावनांच्या अभिव्यक्त जाणिवेतून प्रगल्भपणे दृश्यरूप घेताना दिसतो.

पुढील काळात निसर्ग, प्राणिमात्र यांच्या सहजीवनासोबत मानवाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शोध ते ‘वानप्रस्थाश्रम’ या चित्रमालिकेतून घेऊ इच्छितात.

शिंदे यांची पंचवीसच्या वर एकल चित्र प्रदर्शने झाली असून असंख्य गटप्रदर्शने,  ग्रूप शोज झाले आहेत. त्यांत टोकियो द्वैवार्षिक - १९८४, क्यूबा द्वैवार्षिक - १९८६, दुबई - २००४ व भारतभर झालेली प्रदर्शने उल्लेखनीय असून २००१ मधील दहाव्या भारतीय त्रैवार्षिक प्रदर्शनाचे ते कमिशनर होते. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय प्रदर्शनात दोन वेळेस त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

- यशवंत देशमुख

शिंदे , दीपक गोविंद