Skip to main content
x

सिंघल, जे.पी.

            दिनदर्शिका चित्रकार जे.पी. सिंघल यांनी आपल्या मोहक चित्रशैलीने दिनदर्शिका कलेला (कॅलेंडर आर्ट) वेगळे वळण दिले आणि जन-सामान्यांमध्ये देवादिकांच्या चित्रांऐवजी निसर्गरम्य भारतीय ग्रमीण जनजीवनाचे चित्रण असलेल्या चित्रांची गोडी निर्माण केली.

              जे.पी. सिंघल यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मीरत येथे झाला. ते स्वतःच आपल्या अनुभवातून चित्रकला शिकले. वीस वर्षांचे वय असताना ‘धर्मयुग’ या हिंदी साप्ताहिकात त्यांचे पहिले चित्र प्रकाशित झाले. चार वर्षांनी त्यांची चित्रे असलेली पहिली दिनदर्शिका प्रकाशित झाली. त्यानंतर ते मुंबईत आले आणि पुढील पस्तीसएक वर्षे दिनदर्शिका कलेत ते लोकप्रिय चित्रकार म्हणून आघाडीवर राहिले.

              काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतातील अनेक उद्योजकांच्या दिनदर्शिकांसाठी त्यांनी विविध विषयांवर चित्रे काढलेली आहेत. पौराणिक विषय, आदिवासी आणि ग्रमीण जीवनातील विविधता, लहान मुले, गायक-वादक, जैवविविधतेने नटलेला निसर्ग अशी विविधता त्यांच्या चित्रांमध्ये आहे. आपल्या चित्रांसाठी ते छायाचित्रांचा संदर्भ म्हणून वापर करतात. छायाचित्रांमधले वास्तवदर्शी चित्रण आणि अभिजात चित्रकलेतील भावानुरूप रंगसंगती, पोताचा आणि विविध तंत्रांचा वापर यांचा संगम सिंघल यांच्या चित्रांमध्ये दिसतो. यातून वास्तवाचे नेत्रसुखद असे एक आभासविश्‍व ते तयार करतात. या अर्थाने रोमँटिक चित्रशैलीशी या चित्रांचे नाते आहे. आदिवासी जीवनात असलेली निसर्गाची एकरूपता आणि निरागसता सिंघल यांना महत्त्वाची वाटते.

              अशा प्रकारची नेत्रसुखद व विपुल चित्रनिर्मिती करताना सिंघल यांनी आपल्या चित्रनिर्मितीचे मोठ्या व्यवसायात रूपांतर केले. चित्राची मूळ संकल्पना सिंघल यांची असे. चित्रातली पार्श्‍वभूमी रंगवण्यासाठी निसर्ग-चित्रणात निष्णात असलेले चित्रकार, तर मानवाकृतींचे चित्रण करण्यासाठी कुशल चित्रकार त्यांनी आपल्या स्टूडिओत साहाय्यक म्हणून ठेवले होते. एखाद्या सहकार्‍याच्या मदतीने चालणारा चित्रकाराचा व्यवसाय सिंघल यांनी अशा प्रकारे अधिक व्यापक केला.

              सिंघल यांनी आजवर केलेल्या चित्रांची संख्या अंदाजे २,५००, तर चित्रांच्या मुद्रित प्रतींची संख्या ७५ कोटींपेक्षा जास्तच होईल. चित्रकलेबरोबर छायाचित्रांच्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीमुळे त्यांनी इतर सर्वांसाठी जणू एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला. चित्रपट निर्माता राजकपूर यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाच्या कलात्मक वेशभूषांचे संकल्पन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या चित्रपटाच्या पब्लिसिटीचे कामदेखील नवा मापदंड निर्माण करणारे ठरले.

              राजा रविवर्मा यांनी भारतात दिनदर्शिका कला रुजवली ती शिळामुद्रण पद्धतीने  छापलेल्या देवादिकांच्या चित्रांच्या माध्यमातून. दलाल आणि मुळगावकरांनी मोहक रंगशैलीच्या चित्रांमधून ही परंपरा पुढे चालवली. स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण झाले, नेहरूयुगात राज्यांमधील विविधतेबद्दल एक नवे आकर्षण निर्माण झाले. या सार्‍याचा परिणाम लोकांची अभिरुची बदलण्यात झाला. सिंघल यांनी या बदलत्या अभिरुचीला पोषक अशी शैली विकसित केली.

              रविवर्मा यांच्या चित्रांमधला यथार्थवाद अकॅडमिक शैलीशी संबंधित होता, तर सिंघल यांच्या चित्रांमधील यथार्थता छायाचित्रणात्मक वास्तवदर्शनातून आलेली होती. सिंघल यांच्या काळात चित्रांचे मुद्रण ऑफसेट पद्धतीने होऊ लागले. या मुद्रणाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांची चित्रे अथवा चित्रशैली बनलेली होती, आणि म्हणूनच ती यशस्वी झाली. दिनदर्शिकांमध्ये नंतरच्या काळात कलात्मक छायाचित्रांचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. आणि जनसामान्यांना एके काळी प्रिय असलेली दिनदर्शिकांची चित्रशैली अस्तंगत झाली. एका विशिष्ट कालखंडात जनसामान्यांच्या कलाभिरुचीला वळण देणारे चित्रकार म्हणून सिंघल यांचे नाव कायम राहील.

- रंजन जोशी, दीपक घारे

सिंघल, जे.पी.