Skip to main content
x

शिरोमणी, सुषमा

     सुषमा शिरोमणी यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांनी बालकलाकार म्हणून १९५८ साली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘लाजवंती’, ‘सोने की चिडियाँ’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केल्या. तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास पाहता त्यांची तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त वाटचाल आहे. तेवढाच त्यांचा चौफेर अनुभव आहे. ‘सतीचं वाण’ (१९६९) या चित्रपटात  सहनायिका साकारत प्रौढ वयातील त्यांची वाटचाल सुरू झाली. (आशा काळे या चित्रपटाच्या नायिका होत्या.) त्यानंतर त्यांनी ‘दाम करी काम’ (१९७१) या चित्रपटात काम केले. राम डवरी यांच्या ‘रंगू बाजारला जाते’ या चित्रपटात त्यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजा परांजपे यांच्या ‘गुरुकिल्ली’ (१९६६) या चित्रपटात सुषमा शिरोमणी यांनी बहारदार नृत्य केले होते. त्यानंतर सुषमा शिरोमणी यांनी स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली. १९७७ मध्ये त्यांनी निर्माण केलेल्या व अभिनय केलेल्या ‘भिंगरी’ या चित्रपटाला विलक्षण लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या वेषभूषा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वेषभूषाकार भानू अथय्या यांनी केल्या होत्या. याच चित्रपटावरून देवेन शर्मा यांनी हिंदीमध्ये ‘चटपटी’ या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये स्मिता पाटील यांनी नायिकेची भूमिका पार पाडली होती. ‘भन्नाट भानू’ (१९८२) या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन करायलाही सुरुवात केली. नृत्य, संगीत. विनोद, साहस, अन्यायाचा प्रतिकार, दीनदुबळ्यांचे संरक्षण या विषयांचे चित्रण त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केले. द्य्वर्थी विनोदाचा आधार न घेता त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाचे एक अंग म्हणजे त्यांनी केलेली साहसदृश्य हे होय. त्यांच्याकडे चित्रपट वितरणाची कलाही असल्यामुळे मराठी चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांचे ‘फटाकडी’ (१९७९), ‘मोसंबी नारंगी’ (१९८०), ‘गुलछडी’ (१९८४) हे चित्रपट खूप लोकप्रिय ठरले.

     हिंदीतील ख्यातनाम कलादिग्दर्शक टी.के. देसाई यांनी सुषमा शिरोमणी यांच्या चित्रपटातील सेट्ची जबाबदारी घेतली होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक हिंदी कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली होती. अरुणा इराणी (भिंगरी), रेखा (फटाकडी), जितेंद्र (मोसंबी नारंगी), रती अग्निहोत्री, मौसमी चॅटर्जी (गुलछडी) अशा हिंदी चित्रपटातील अनेक कलाकारांना मराठी पडद्यावर आणण्याचे काम सुषमा शिरोमणी यांनी केले. त्यांना हिंदी चित्रपट निर्मिती संस्था ‘इम्पा’ या संघटेनेच्या अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

- दिलीप ठाकूर

शिरोमणी, सुषमा