Skip to main content
x

सकपाळ गजानन लक्षमण

           अभिजात चित्रकलेचा वास्तुसजावटीसाठी, अनेक तरुण व गरजू चित्रकारांच्या सहकार्याने सुयोग्य वापर करत, एका लघुउद्योगाची निर्मिती करणारा उद्योजक कलावंत म्हणून सकपाळ यांची ओळख करून देता येईल. गजानन लक्ष्मण सकपाळ यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण दौलत सकपाळ व आईचे नाव सुमतीबाई. वडील गिरणीत कारकून म्हणून नोकरीला होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे व अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांची नोकरी गेली. आजी व मावशीच्या आधाराने हे कुटुंब जगत होते. गजानन तीन भावंडांतील मधले. त्यांचे लहानपण लालबागच्या कामगारवस्तीतील पत्र्याच्या खोलीत गेले व शालेय शिक्षण काळाचौकीच्या महापालिकेच्या शाळेत झाले.

              खडूने भिंतीवर चित्र काढणार्‍या गजाने शालेय शिक्षणानंतर मुंबईच्या आय.टी.आय.मध्ये चित्रकला शिकायला सुरुवात केली. त्यांची कलेतील प्रगती पाहून त्यांच्या आचरेकर सरांनी त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला विभागात शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांना जे.जे.तील प्राध्यापक सुहास बहुळकर यांचा सहवास लाभला. तेथून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी ‘बी.एफ.ए.’ (पेंटिंग) व ‘एम.एफ.ए.’ ही पदवी प्रथम श्रेणीत प्रथम येऊन संपादन केली. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा या आपल्या अंगभूत गुणांमुळे अर्थार्जनासाठी धडपड करीत असतानाच त्यांनी कलानिर्मितीही सुरू ठेवली. सकपाळ यांना महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार व साधू वास्वानी व्यक्तिचित्रण स्पर्धेत पुरस्कार, (१९७७); नाशिक कला निकेतन व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया पुरस्कार, (१९८३); ‘चित्ररथ’ पुरस्कार, आय.टी.आय. (१९८५); बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार (१९९०) असे अनेक पुरस्कार मिळाले.

              याच दरम्यान सकपाळ यांना मुंबईच्या आय.टी.आय.मध्ये चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली. कलेतील तंत्रज्ञानाचा, कलेचा, विविध रंगांचा, माध्यमांचा योग्य उपयोग कशा पद्धतीने करायचा व त्याचा जगताना कसा वापर करायचा याचे शिस्तबद्ध ज्ञान सकपाळांनी आपल्या गरीब विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली. कलेची जास्त ओढ असलेल्या त्यातील गुणी विद्यार्थ्यांना ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त करीत व आर्थिक मदतही करीत.

              अभिजात चित्रकला शिक्षणाचा विविध अंगांनी व अर्थार्जनासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे सकपाळ या काळात स्वत: अनुभवत होतेच. केलेल्या कामांतून त्यांचे अनुभवविश्‍व संपन्न होत होते. यातूनच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून येणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना सकपाळ यांनी स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास शिकवले. त्यांचा विवाह वंदना यांच्याशी १९८८ मध्ये झाला.

              नोकरी करत असतानाच वास्तुसजावटीसाठी चित्रकलेचा वापर करीत स्वतंत्र व्यवसाय करण्याचे स्वप्न सकपाळ यांच्या मनात होते. आय.टी.आय.मधील तंत्रशिक्षणातून व जे.जे.मधील चित्रशिक्षणातून अनेक रंगमाध्यमांची, विविध तंत्र-कौशल्यांची प्रत्यक्ष उजळणी होऊन त्यांचा आत्मविश्‍वास वाढला होता. त्यामुळेच १९९८ मध्ये त्यांनी शासनाची कलाशिक्षकाची नोकरी सोडून आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. या कामासाठी त्यांनी आपल्या हाताखाली तयार झालेल्या निवडक निष्णात विद्यार्थ्यांना योग्य मानधन देऊन मदतीस घेतले.

              वास्तुसजावटीसारख्या कोणत्याही कामाची पूर्वतयारी, काटेकोर नियोजन, कठोर शिस्त, संघटनात्मक धोरण आणि वक्तशीरपणा यांतून दर्जेेदार कलात्मक काम ठरावीक वेळेत पूर्ण करण्याची किमया सकपाळ यांच्या टीमने करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे हा चित्रकलेतील उत्तम दर्जेदार कारखानाच त्यांनी उभा केला आहे. आज सातत्याने कित्येक वर्षे त्यात नवीननवीन कामांची, आव्हानांची भरच पडत असते. पृष्ठभाग तयार करणारे, रेखांकन करणारे, रंगकाम करणारे, पोत निर्माण करणारे, स्पे्र-पेन्टिंग करणारे, लॅमिनेशन व वॉर्निश करणारे, जो तो आपल्या वाट्यास आलेले काम कोणतीही गडबड-गोंधळ न करता निमूटपणे करताना दिसतो.

              मुंबईतील श्रीमंत वस्तीतील आलिशान घरे, त्यांची शयनगृहे, उद्योजकांची कार्यालये, पंचतारांकित हॉटेले, जवाहिर्‍यांची मौल्यवान दागिन्यांची दुकाने व मंदिरांपासून ते अत्याधुनिक चित्रपटगृहांपर्यंत वास्तुसजावटीची विविध कलाकौशल्याची कलात्मक कामे भारतातील अनेक राज्यांतील मोठ्या शहरांतून सकपाळ यांनी साकारलेली आहेत. आपल्या संकल्पनेनुसार वास्तूंच्या अंतर्भागात विविध विषयांचा भिंतींवरच नव्हे, तर छतावर किंवा फर्निचरवरही त्यांनी  कलात्मक आविष्कार केलेला दिसून येतो. अशा प्रकारे त्यांनी केलेली कामे देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरांपासून ते चित्रपटतारकांपर्यंत आणि आघाडीच्या उद्योजकांपासून ते बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांपर्यंत पसरलेली दिसतात.

              सकपाळ यांना विविध विषयांवरील वाचनाची, चिंतन-मननाची आवड तसेच त्यांना जुनी हिंदी गाणी ऐकायला आवडतात . याबरोबर त्यांना सामाजिक कार्यात भाग घेऊन प्रत्यक्ष काम करणे व अर्थसाहाय्य करून विविध व्यक्ती तसेच संस्थांना मदत करण्यास आवडते.

- श्रीकांत जाधव

सकपाळ गजानन लक्षमण