Skip to main content
x

सोनार, दीपक मधुकर

         महाराष्ट्रातल्या तरुण चित्रकारांमध्ये अमूर्तवादी चित्रशैलीत निसर्गाचे अंतरंग उलगडवून दाखविणारे व चित्रकलेकडे स्वान्त:सुखाय दृष्टीने बघणारे चित्रकार दीपक मधुकर सोनार यांचा जन्म नाशिक येथे झाला. आई लीलाबाई व वडील मधुकर दगडूशेठ सोनार हे कुटुंब मूळचे पुण्यातलेच. सोनार यांचे शालेय शिक्षण कॅम्प एज्युकेशन हायस्कूलमध्ये झाले. त्यांना चित्रकला शिक्षक प्रकाश लोणंदकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. पुढे अभिनव कला महाविद्यालयातून जी.डी. आर्ट ही पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबई येथून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतले. याच काळात त्यांनी दिवाकर डेंगळे यांच्या प्रोत्साहनाने खूप मेहनत व सराव केला. यानंतरच्या काळात ज्येष्ठ व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकरांकडे त्यांनी २ ते ३ वर्षे मार्गदर्शन घेतले. सेल्फ [पोट्रेट , लँडस्केपवर भर दिला. दिवसभर महाविद्यालय, पोट्रेटचा सराव, रात्री शिवाजीनगर स्टेशनवर जाऊन स्केचिंग, तर लँडस्केपसाठी ४०—४० किलोमीटर लांब जाऊन हवे तसे ठिकाण शोधणे अशा तर्‍हेने त्यांची वाटचाल चालू होती.

            याच दरम्यान १९८८ मध्ये केंद्र सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये सोनार यांना मुंबईला नोकरी मिळाली. ही नोकरी कायमची व चांगल्या पगाराची असतानाही चार वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये चित्रकलेतच स्वत:ला हवे तसे काम करायला मिळावे या उद्देशाने ती सोडली. त्यानंतर दिल्लीच्या ‘गढी’ आर्टिस्ट व्हिलेज या ललित कला अकादमीच्या स्टूडिओत लिथोग्रफीसाठी प्रवेश मिळावा म्हणून दीपक सोनारांनी दिल्लीला वर्षभर प्रतीक्षा केली; पण प्रवेश मिळाला नाही, तेव्हा भोपाळ येथील भारत भवनमध्ये हेच काम ते शिकू लागले. हे शिकताना १९९५ मध्ये त्यांना ललित कला अकादमीची रिसर्च ग्रँट स्कॉलरशिपही मिळाली. यानंतर त्यांना भारत सरकारचीच, मिनिस्ट्री ऑफ कल्चरची ज्यूनियर फेलोशिपही २००० ते २००२ मध्ये मिळाली.

            चित्रकलेचे विविध प्रकार व रंगांची विविध माध्यमे हाताळल्यानंतर आता अ‍ॅक्रिलिक रंगांतून ते निसर्गातील अमूर्ततेचा शोध घेत आहेत. वाट पाहणे हे त्यांच्या स्वभावात नाही. लगेच परिणाम मिळावा, तोही उत्तमच हवा. त्यासाठी चित्र काढण्यापूर्वीचे सूक्ष्म निरीक्षण, उत्तम ग्रहणशक्ती व  चिंतन हे त्यांच्यात असल्यानेच त्यांच्या निसर्गचित्रांत अमूर्ततेसोबतच खोली, अंतराचा आभास व व्यापकता यांचा आविष्कार दिसतो.

            नर्मदा बचाव आंदोलनात काम करत असताना सह्याद्रीचे त्यांना जवळून दर्शन झाले. या प्रवासादरम्यान जो-जो निसर्ग त्यांना दिसला, त्यांनी अनुभवला, तो चित्ररूपाने ‘सह्याद्रीसंध्या’ या प्रदर्शनात त्यांनी मालिका स्वरूपात मांडला. चार भिंतींच्या खोलीत बसून लँडस्केप काढणे हे त्यांना मान्य नाही. त्यासाठी प्रत्यक्ष निसर्ग पाहिलाच पाहिजे. चित्रकलेत एकाच माध्यमाचा अनेक प्रकारे उपयोग करणे वा एकच चित्र अनेक माध्यमांतून साकारणे यात त्या माध्यमाचा कसा योग्य उपयोग करता येतो व नवनिर्मिती कशी होते हे उमगण्यात चित्रकाराचे कौशल्य असते. अशी निर्मिती करताना, जे चित्र आपल्याला आवडते तेच चांगले चित्र असते, असे दीपक सोनार यांना वाटते.

            चित्रकलेची साधना करता करता प्रत्येक वेळी त्यांना नव्यानव्या गुरूंचे मार्गदर्शन मिळत गेले. चित्रकार वानखेडे, शांती देव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन नेहमी मिळत होतेच.

            दीपक सोनार यांना नाशिक कला निकेतन (१९८५, १९८७) राज्य कला प्रदर्शन (१९८७, १९९१, २००३), आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (१९८८) आणि जी.आर. वडणगेकर गौरव पुरस्कार (२००६) असे पुरस्कार मिळाले. याच वर्षी बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार मिळाला. कॅम्लिन आर्ट फाउण्डेशनच्या ‘यूरो टूर’ योजने अंतर्गत त्यांनी पॅरिस व लंडन येथील कलाकेंद्रांना भेटी दिल्या.

            पुणे, रत्नागिरी, नागपूर, भोपाळ, आसाम, गोहत्ती, गाझियाबाद  इथल्या कार्यशाळांत त्यांना आमंत्रित केले गेले. त्यांची मुंबर्ई, पुणे, हैद्राबाद येथे सात वैयक्तिक प्रदर्शने झाली, तर मुंबई, पुणे, भोपाळ, गोहत्ती, दिल्ली, चेन्नई व हॉलंड येथे अनेक सामूहिक प्रदर्शनेही झाली. त्यांनी अनेक प्रदर्शने आयोजित केली असून अमेरिका व लंडनमध्येही त्यांची चित्रे  प्रदर्शनासाठी जातात. गेली वीस वर्षे त्यांची चित्रकलेची साधना चालू आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी इलस्ट्रेशन्स, पोटर्र्ेट्स स्केचिंग हे सर्व प्रकार हाताळले. भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे, तर पाश्‍चात्त्य चित्रकार मॉदिग्लियानी यांची शैली दीपक सोनार यांना जास्त भावते.

            त्यांच्या पत्नी मीरा, (पूर्वाश्रमीच्या मीरा डहाळे) पोस्ट खात्यात नोकरी करतात. सुदीप्ता व समृद्धी या त्यांच्या दोन मुलींनाही चित्रकला आवडते. त्याही चांगली चित्रे काढतात. दीपक सोनार सध्या पुण्यात कार्यरत आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर

सोनार, दीपक मधुकर