Skip to main content
x

सपार, व्यंकटेश विष्णू

             आधुनिक चित्रकला व वास्तववादी चित्रकला यांचे मिश्रण सोलापूरमध्ये कार्यरत असलेल्या व्यंकटेश विष्णू सपारांच्या चित्रांत आढळते. विष्णू अर्जुन सपार यांचे व्यंकटेश हे सुपुत्र. त्यांचे बालपण घरातील कलासक्त वातावरणात गेले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात अवंतिकाबाई केळकरांच्या बालविकास शाळेत (सध्याच्या ज्ञानप्रबोधिनीत) व सिद्धेश्‍वर प्रशालेत झाले. बालपणापासूनच व्यंकटेशने ‘शंकर्स वीकली’सारख्या अनेक चित्रकला स्पर्धांत पारितोषिके मिळविली. त्यांचे कलाशिक्षण सोलापूरच्या कलाव्यवसाय चित्रकला महाविद्यालय व मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे झाले. त्यांनी १९८९ मध्ये बी.एफ.ए. ही पदवी प्रथम श्रेणीत मिळविली. 

               जे.जे.मध्ये शिक्षण घेऊनही त्यांच्या घरातील दिनदर्शिका चित्रांच्या शैलीत काम करण्याचे आकर्षण कायम होते. परिणामी, त्यांना सुरुवातीच्या काळात ‘दिग्जॅम सूटिंग’साठी दिनदर्शिकेचेकाम मिळाले. प्रतिवर्षी १२ चित्रे विविध विषयांवर काढून प्रसिद्ध करण्यात आली. दिनदर्शिकेचे त्यांचे काम आजवर चालू आहे. ते १९९३ पासून कलकत्त्याच्या (कोलकाता) ग्रफाइड इंडियासाठी आजवर प्रतिवर्षी भारतीय संस्कृतीवर बारा चित्रे करून देतात. सेल्फ रिअलायझेशन सेंटर कॅलिफोर्निया, अमेरिका या संस्थेच्या पुस्तकासाठी १९९५ मध्ये गीतेतील तत्त्वज्ञानावर आधारित २५ चित्रांचा संच तयार करण्यात आला. ही चित्रे यज्ञ, योग, समाधी, कुंडलिनी जागृती यांवर आधारित आहेत. ‘रॉयल सायन्स ऑफ गॉड रिअलायझेशन’ नावाचे हे पुस्तक जगातील सर्व भाषांत प्रसिद्ध झाले आहे. हिंदुजा ग्रुप या कंपनीची २००० पासूनची दिनदर्शिकेची कामे व्यंकटेश सपार यांनी केलेली आहेत.

               शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानातर्फे श्रीसाईचरित्रावर तैलचित्रांचे स्वतंत्र व मोठे कलादालन निर्मिण्यात आले आहे. त्यात व्यंकटेश सपार यांची चित्रे असून २००४ पासून प्रतिवर्षी श्री साईचरित्रावर सहा चित्रांच्या दिनदर्शिका काढल्या जातात.

               व्यंकटेश सपार हे व्यावसायिक कलावंत म्हणून परिचित असून त्यांच्या चित्रांत बाह्यसौंदर्य, भारतीय विषयांची आकर्षक मांडणी व कौशल्यपूर्ण हाताळणी आढळत असल्यामुळे ती लोकप्रिय आहेत.

               श्रील भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद संस्थापित आंतरराष्ट्रीय  श्रीकृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या कृष्णभक्ती करणार्‍या भारतातील आणि परदेशांतील मंदिरांसाठी २००० पासून आजपर्यंत कृष्णचरित्र व कृष्णलीला, भागवत पुराणातील कथांवर चित्रे काढण्याचे काम त्यांनी केले .

-मल्लिनाथ बिलगुंदी

सपार, व्यंकटेश विष्णू