Skip to main content
x

सराफ, वसंत केशव

       हाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधी तत्कालीन द्वैभाषिक राज्याच्या पोलीस सेवेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांपैकी वसंत केशवराव सराफ हे एक अधिकारी आहेत.
      वसंत सराफ यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बझार येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुमती होते. वडील केशवराव आत्माराम सराफ पोलीस खात्यातच नोकरीस होते. केशवरावांचे नोकरीचे बहुतांश कार्यक्षेत्र त्यावेळचा मध्य भारत होते तरी ते महाराष्ट्रातच पोलीस उपअधीक्षक या पदावरून निवृत्त झाले. केशवरावांच्या निरनिराळ्या ठिकाणी बदल्या होत असल्यामुळे वसंत सराफ यांचे शालेय शिक्षण परतवाडा, होशंगाबाद, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ येथील वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. पदवीसाठी त्यांनी नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. गणित आणि पदार्थविज्ञान हे त्यांचे आवडते विषय होते. पदवीसाठी त्यांना इंटरनंतर देशातल्या अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या बंगलुरू इथल्या विज्ञान संस्थेतही प्रवेश मिळाला होता. त्यांच्या वडिलांना मात्र वसंतरावांनी पोलीस दलात अधिकारी व्हावे असेच वाटत होते. परिणामी वसंतरावांनी १९५६ ला गणित विषयात एम.एस्सी. पदवी मिळवली. नंतर वसंत सराफ भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस) परीक्षेत पहिला वर्ग मिळवून उत्तीर्ण झाले. पहिला वर्ग मिळाल्याने सराफ कुठल्याही नागरी सेवा विभागाची निवड करू शकत होते. मात्र या नागरी सेवांसाठी त्यांचे वय नियमापेक्षा कमी पडले, परंतु पोलीस सेवेसाठी ते पात्र ठरले.
       पोलीस प्रशिक्षणानंतर १९५८ मध्ये उपसाहाय्यक अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती सुरत येथे झाली. १९६०सालामध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आली आणि त्यानंतर सराफ महाराष्ट्र पोलीस सेवेचे घटक झाले.
      पदोन्नती मिळून १९६१ मध्ये ते नाशिक इथं पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाले. १९६२ मध्ये वसंतरावांचा विवाह कीर्तीबाला पाटील यांच्याशी झाला. पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी चार जिल्ह्यात काम पाहिले. त्याचबरोबर त्यांना पोलीस आयुक्तालय आणि राज्य गुप्तहेर विभागाच्या कामाचाही अनुभव मिळाला. सराफांचं राज्यातील उल्लेखनीय कार्य बघून १९६६ मध्ये त्यांची केंद्रीय गुप्तचर संस्थेत अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख या पदावर १९६९ पर्यंत काम करून ते राज्य सेवेत परत आले.
    केंद्राच्या सेवेसाठी सराफ यांना १९७१ ला पुन्हा केंद्रीय सचिवालयात जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांची नियुक्ती संशोधन आणि विश्‍लेषण शाखेत (रॉ) झाली. या कालावधीत सराफ यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. तसंच चार वर्षे परदेशातल्या भारतीय वकिलातीत संरक्षण प्रतिनिधी (कौन्सेलर) या पदावर काम केले.
     यानंतर १९८५ ला ते महाराष्ट्र राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सी.आय.डी.) गुन्हे शाखेचे महानिरीक्षक झाले. सराफ यांनी यशस्वीरीत्या पेललेल्या अनेक आव्हानांमुळे शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेतली व ते १९८६ मध्ये राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे आयुक्त झाले. सराफ यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती झाल्यानंतर एका वर्षातच त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती मिळाली. याच काळात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा योग १९८९ मध्ये जुळून आला. यानिमित्त आयोजित भव्य समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरामन उपस्थित होते. भारताचे राष्ट्रपती पोलीस दलाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं हे पहिलं उदाहरण होते.
      वसंतराव सराफांनी डिसेंबर १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाची सूत्रं हाती घेतली आणि अत्यंत कर्तव्यदक्षपणे कार्यभार सांभाळून ऑगस्ट १९९२ ला ते निवृत्त झाले. पोलीस दलात अधिकारी असताना सर्व प्रकारच्या समाजकंटकांबाबतची विश्वासार्ह गुप्त माहिती संकलित करण्यात वसंतराव सराफांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. मुंबईतल्या तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या असामाजिक घटकांविरुद्ध सराफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आघाडी उघडून या व्यापाराला परिणामकारक पायबंद घातला.
     धनिकांकडून जबरदस्तीने खंडणी गोळा करणाऱ्या व टोळीयुद्ध करणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांना नामोहरम करण्यात सराफांनी यश मिळवले. पाकिस्तानी आय.एस.आय.च्या मुंबईत आलेल्या हस्तकांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळवण्यातही ते यशस्वी झाले होते. राज्याचे पोलीस महासंचालक असताना महामार्ग पोलीस संरक्षण यंत्रणेत आवश्यक ते प्रशासकीय बदल करण्यातही सराफांचा पुढाकार होता.
    
 निवृत्तीनंतर त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने संघटित गुन्हेगार टोळ्यांविरुद्धचा संशोधन अहवाल तयार करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. राज्य पोलीस दलांच्या अगदी गावपातळीपर्यंतच्या पोलीस स्टेशनात आवश्यक त्या संख्येत मनुष्यबळ कसं पुरवावं याचा सांख्यिकी आलेख त्यांनी तयार केला होता. आज गुजरातमध्ये या अहवालाच्या आधारे मनुष्यबळ कार्यरत आहे. शासनातर्फे पुण्यात स्थापन झालेल्या पोलीस संशोधन केंद्राचे ते पहिले मानद संचालक होते.
      आपल्या पोलीस खात्यातील अनुभवांवर आधारित वृत्तपत्र लेखांबरोबर कादंबरी आणि कथा असे विपुल लेखन सराफांनी केले आहे. व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयांवरही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भगवद्गीतेतील कर्म या विषयावर सराफ यांनी लिहिलेले ‘दी मिस्ट्री ऑफ कर्म’ (कर्माचं गूढ) हे अभ्यासपूर्ण आणि वाचनीय पुस्तक वाचकांमध्ये लोकप्रिय ठरलं आहे.
       पोलीस दलातील नोकरीत महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल सराफांना १९७४ ला पोलीस पदक मिळालं. तर १९८६ साली त्यांना विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांना ‘इंटरनॅशनल जायंट्स अ‍ॅवार्ड फॉर पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा पुरस्कार १९८९ ला मिळाला. तसंच १९९० ला पोलीस प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सराफ यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘नॅशनल सिटीझन्स अ‍ॅवार्ड’ मिळाले आहे. वसंतराव सराफ आज निवृत्तीनंतरचं आयुष्य लेखन आणि सामाजिक कार्यात मग्न राहून सफल करत आहेत.

           - सुधाकर कुलकर्णी

 

सराफ, वसंत केशव