Skip to main content
x

सरदेशपांडे, जगदीश सदाशिव

       जगदीश सदाशिव सरदेशपांडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (साखरपा) येथे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरपा येथेच झाले. लहानपणापासून शेतीची कामे यातील आवड पाहून त्यांनी कृषी क्षेत्रातील शिक्षण घ्यावे असे आईवडिलांनी ठरवले. त्यांनी १९६१मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९६५मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. तेथेच त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवी नत्रवायूचे जैविक स्थिरीकरण हा संशोधनासाठी विषय घेऊन डॉ.भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली. त्यानंतर यूएएस बंगलोर व धारवाड येथील कृषी महाविद्यालयात अनुक्रमे कृषि-सूक्ष्मजीवशास्त्र, मृदा व रसायनशास्त्र, यात संशोधन करून १२ शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांनी कानडी भाषाही अवगत केली होती. ते १९७४ साली बा.सा.को.कृ.वि.त वनस्पति-रोगशास्त्र विभागात दापोली येथे सहप्राध्यापक या पदावर रुजू झाले. १९७८मध्ये आयएआरआय नवी दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर पीएच.डी.साठी गेले. तेथे त्यांनी नील हरित शेवाळाचे नवीन वाण शोधून काढले. दापोलीस परत आल्यावर त्यांनी भाताच्या करपा व कडाकरपा या रोगांना बळी न पडणाऱ्या जाती शोधून काढल्या. तसेच फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे नवीन आंब्याची कलमे मरण्याची कारणे शोधून त्यावर उपाय सुचवले. तसेच उपाय काजू कलमाबाबतही सुचवले. त्यांनी आंब्यावरील महत्त्वाच्या १५ रोगांवर अभ्यास करून ‘आंब्यावरील रोग’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यास ‘बळीराजा’ मासिकाचा पुरस्कार मिळाला. त्यांनी या विद्यापीठात संशोधनाबरोबर अध्यापनाचे कार्यही केले. त्यांनी २० विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी मार्गदर्शन केले. तसेच २५ शोधनिबंध, शेतकऱ्यांसाठी ४०-४५ लेख व आकाशवाणीवर अनेक भाषणे दिली. त्यांनी काही पुस्तकांत वनस्पतिरोग या विषयावर काही प्रकरणेही लिहिली आहेत.

       पदभ्रमण आणि दुर्गभ्रमण हे डॉ. सरदेशपांडे यांचे आवडते विषय ! त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गड, किल्ले, दऱ्याखोऱ्यांना आणि समुद्रकिनाऱ्यांना भेटी दिल्या . वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी कवी संमेलनातून अनेक कविता सादर केल्या. त्यांच्या काही कवितांना पुरस्कारही मिळाले. निसर्गावर मनापासून प्रेम करणारे आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणारे कवीमनाचे डॉ.सरदेशपांडे यांचे वास्तव्य पुण्यात असले तरी कर्मभूमी मात्र स्वतःचे गाव साखरपा हीच आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गावी जाऊन मोकळ्या माळरानांवर आणि ओसाड जागांमध्ये ते आणि त्यांचे कुटुंबीय आंब्याच्या कोयी आणि फळझाड्यांच्या बिया लावतात. त्यांच्या या छोट्याशा कृतीतून गावाच्या परिसरात अनेक फळझाडे डोलू लागली आहेत.

- डॉ. अशोक निर्बाण

सरदेशपांडे, जगदीश सदाशिव