Skip to main content
x

शर्मा , इंद्र

       हिंदू पुराणकथांत वर्णिलेल्या देवीदेवतांना चेहरे देणारे चित्रकार म्हणून इंद्र शर्मा सबंध भारतात सुपरिचित आहेत. नाथद्वारा या पारंपरिक लघुचित्रशैलीतील चित्रकार शर्मा यांचा जन्म राजस्थानातील कुरावड येथे झाला. त्यांचे चुलत भाऊ प्रख्यात चित्रकार बी.जी. शर्मा यांच्याप्रमाणेच त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे गोपीलाल व खुबीलाल या श्रेष्ठींकडे घेतले. याच काळात पारंपरिक पद्धतीने रंग व कुंचले तयार करण्याचे तंत्रही त्यांनी अवगत केले.

त्यांना १९४३ मध्ये कराची येथील काही मंदिरांतील पिछवाई चित्रांचे नूतनीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या दरम्यान सेठ गोकुळदास यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना कलकत्त्यास पाचारण केले. त्यांच्या आश्रयाखाली इंद्र शर्मांची चित्रकला बहरली. त्यानंतर गोकुळदासांच्याच पुढाकाराने त्यांना १९४६ मध्ये मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला.

शुभेच्छापत्रे व दिनदर्शिकांवरील त्यांच्या चित्रांनी सबंध भारतवर्षात नावलौकिक मिळवला. छपाईतील आधुनिक तंत्राने भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीदेवतांच्या व संतांच्या प्रतिमा जागोजागी पोहोचल्या. विदेशांतही त्यांच्या चित्रांना प्रचंड मागणी असे. त्यांनी आजवर देवदेवतांची असंख्य चित्रे काढली आहेत. शर्मा यांनी लघुचित्रशैलीच्या माध्यमातून मोठ्या आकारात प्रसन्न शैलीत चितारलेली चित्रे हा एक दुर्मीळ आणि अनमोल ठेवा आहे. त्यांनी रेखाटलेल्या देवादिकांच्या चेहर्‍यांवर ‘देवत्व’ दिसते.

हिंदूंमध्ये जरी ३३ कोटी देवता आहेत असे मानले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र तेहेतीसच देवता आहेत; पण त्या प्रत्येकाचे आगळे वैशिष्ट्य आहे. ते शारीरिक आहे, तसेच त्यांच्या वर्तनातही आहे. गेली अनेक शतके हे सारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत गेले. लघुचित्रशैलीच्या दृश्यरूपातही ते टिकवले गेले. मुद्रणाच्या शोधाने जन्माला आलेल्या दिनदर्शिका (कॅलेण्डर) संस्कृतीने घराघरांतील भिंतींवर देवादिकांच्या प्रतिमा वेगळ्या रूपात विराजमान केल्या. त्यात राजा रविवर्माबरोबरच इंद्र शर्मा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अर्धनारीश्‍वर, हनुमान, राम, कृष्ण यांचे दृश्यरूप जनमानसात निश्‍चित करण्यात शर्मा यांच्या चित्रांचा मोठा वाटा आहे.

भारतीय पारंपरिक लघुचित्रशैलीची जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये शर्मा यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये दिसतात; पण त्यांनी संतांचे वा देवदेवतांचे चेहरे केवळ प्रोफाइल पद्धतीनेच दाखविण्याच्या पारंपरिक नियमाला मुरड घालून बहुतांश चेहरे समोर पाहिल्यावर जसे दिसतील तसे चित्रांकित केले आहेत. देवदेवतांचे चेहरे व त्यांचे अर्धोन्मीलित, पूर्णोन्मीलित डोळे अतिशय सुबक असून  शर्मा यांचे रेखाटनावरील प्रभुत्व सिद्ध करतात. पुराणात दिलेल्या वर्णनाबरहुकूम मूर्तिविज्ञानानुसार (आयकोनोग्रफी) विविध देवदेवतांची आसने, आयुधे, वस्त्रे, आभूषणे, वाहनादिकांचे वस्तुनिष्ठ चित्रांकन करणे व त्यातील लालित्य कायम ठेवणे हे त्यांच्या चित्रांचे बलस्थान आहे.

जे.जे. मधील विद्यार्थिदशेत त्यांना ‘डॉली कर्सेटजी’ सुर्वणपदक प्राप्त झाले, तसेच त्यांना ‘महाराणा मेवाड’ हा उदयपूर येथील प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाला. श्रील भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांच्या आमंत्रणावरून ते लॉस एंजेलिसला गेले. तेथील स्थानिक चित्रकारांना त्यांनी चित्रांचे प्रात्यक्षिक दिले. कार्य हीच ईश्‍वरसेवा हे त्यांच्या कलात्मक जीवनाचे ब्रीद होते. चित्रनिर्मितीत सतत व्यग्र असल्याने नेहरू सेंटर, मुंबई येथील चित्र प्रदर्शनाचा अपवाद सोडला तर त्यांनी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतात वा परदेशांत भरविली नाहीत.

अमेरिकेतील मंडला या प्रकाशनाने त्यांचे ‘इन अ वर्ल्ड ऑफ गॉड्स अ‍ॅण्ड गॉडेसेस : मिस्टिक आर्ट ऑफ इंद्र शर्मा’ हे शीर्षक असलेले पुस्तक प्रकाशित केले. अमेरिकी वंशाचे आणि हिंदू धर्म स्वीकारून धर्मगुरुपदापर्यंत पोहोचलेले जेम्स बे यांनी या पुस्तकातील चित्रांवर हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे विवेचन केले आहे, तर  या पुस्तकाला प्रा. योगेश अटल यांची प्रस्तावना आहे.

त्यांच्या पुस्तकाला न्यूयॉर्क येथे २००२ मध्ये ‘बेन फ्रँकलिन’ व ‘गोल्ड इंक’ हे अमेरिकन प्रकाशनविश्‍वातील दोन सर्वोच्च पुरस्कार मिळाले. त्यांचे २००६ मध्ये निधन झाले. इहलोकात राहून देवलोक प्रभावीपणे चितारणाऱ्या इंद्र शर्मांचे हे ‘दैवी’ योगदान अलौकिक आहे.

- पंकज भांबुरकर

शर्मा , इंद्र