Skip to main content
x

सत्पुरुष, साक्षात्कारी संत

साईबाबा

     धुनिक काळातील संत शिर्डीचे साईबाबा हे देश-विदेशांतील भक्तांचे दैवत बनले आहेत. साईबाबांचे संपूर्ण नाव काय? त्यांचे आईवडील कोण? त्यांचे मूळ गाव कोणते? त्यांचे गुरू कोण? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. स्वत: साईबाबांनी याविषयी कोणाला काहीही सांगितलेले नाही. परंतु, काही लोकांच्या मते, त्यांचे मूळ गाव सेलू-मानवत जवळील पाथरी असून त्यांचे आडनाव भुसारी होते. व्यंकूशा हे त्यांचे गुरू होत. पण या गोष्टीस कोणताही सबळ पुरावा नाही.

साधारणत: १८५७ च्या दरम्यान औरंगाबाद जवळील धूपखेडे येथील एका मुसलमानाच्या वरातीसोबत वर्‍हाडी म्हणून साईबाबा शिर्डीस आले. शिर्डी येथे खंडोबा मंदिराच्या पटांगणात वऱ्हाडाच्या बैलगाड्या सोडण्यात आल्या, तेव्हा बाबा खंडोबा मंदिराकडे गेले. तेथील पुजारी म्हाळसापती याने बाबांच्या चेहऱ्यावरील तेज व त्यांचा पेहराव पाहून ‘आवो साई’ म्हणून त्यांचे स्वागत केले. पुढे हेच ‘साईबाबा’ नाव सर्वत्र रूढ झाले. मूळ नाव त्यांनी कोणालाच सांगितले नाही. एका सरकारी चौकशी आयोगापुढे त्यांची एकदा साक्ष झाली. त्या वेळीही त्यांना नाव विचारले गेले, तेव्हा त्यांनी, ‘‘मला लोक ‘साईबाबा’ म्हणतात,’’ एवढेच उत्तर दिले.

साईबाबा शिर्डीत प्रारंभी आले तेव्हा ते पाच घरे भिक्षा मागून खात होते व गावातील जुन्या पडक्या मशिदीत राहत होते. या मशिदीचा पुढे भक्तांनी जीर्णोद्धार केला व बाबांनी या मशिदीस ‘द्वारकामाई’ असे नाव दिले आणि तिथे कायमची धुनी पेटती ठेवली. अंगणात तुळशी वृंदावन उभे केले.

द्वारकामाई मशीद हा साईबाबांचा सर्वांना सदैव खुला असा साई दरबार होता. इथे हिंदू व मुसलमान, दोघांनाही मुक्त प्रवेश होता. तसेच सर्व जाती-वर्णांना खुला प्रवेश होता. कोणताही धर्म, जाती, वर्ग, उपासना पद्धतीचा भेद साईबाबांना मान्य नव्हता. साईबाबांना काही भक्त दत्ताचा अवतार मानत होते, काही जण त्यांना प्रभू रामचंद्राचा, तर अनेक जण भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानत होते. पण स्वत: साईबाबा आपणांस ‘अल्लाचा बंदा’ मानत होते. आपण ईश्वराचे अवतार आहोत असा त्यांनी कधीही दावा केला नाही.

साईबाबा हे सर्व-धर्म-समभावाचे, मानवधर्माचे प्रचारक होते. भक्ताला सन्मार्गाला व खऱ्या भक्तिमार्गाला लावणे एवढाच त्यांचा उद्देश होता. साईबाबांनी ना कधी प्रवचन केले, ना कीर्तन केले, ना कोणता ग्रंथ लिहिला, ना कोण्या देवतापर स्तुति-स्तोत्रे-माहात्म्य रचले. भक्ताच्या मनात जसा भाव असेल, तसा ते त्याला उपदेश करीत. ‘जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव।’ अशीच त्यांची सर्व भक्तांना प्रचिती होती. भक्ताच्या इच्छेनुसार कोणास ‘गीता’, कोणाला ‘भागवत’, कोणाला ‘भावार्थ रामायण’, कोणाला ‘विष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन / पारायण करण्यास ते सांगत होते. शिर्डी येथे त्यांनी रामनवमी उत्सवाचा प्रारंभ केला. ते १८५७ मध्ये शिर्डीत आले त्यानंतर समाधीपर्यंत म्हणजे १९१८ पर्यंत ते शिर्डी सोडून कोठेही गेले नाहीत. शिर्डीच्या जवळच असलेल्या ‘राहता’ व ‘निमगाव’ या गावी खुशालचंद्र व डेंगळे यांच्या घरी ते जात असत. मात्र, त्यांनी आपणांस दर्शन दिल्याचे अनेक ठिकाणचे अनेक भक्त सांगत. याद्वारे त्यांच्या सर्वव्यापित्वाचे दर्शन घडते.

मराठी वाङ्मयात प्रचंड साहित्याचे योगदान असलेले संतकवी दासगणू, लोकमान्य टिळकांचे सहकारी, काँग्रेसचे नेते बॅरिस्टर दादासाहेब खापर्डे, रेसिडंट मॅजिस्ट्रेट अण्णासाहेब दाभोळकर यांसह ब्रिटिश काळातील अनेक मामलेदार, अधिकारी असा उच्चशिक्षित वर्ग साईबाबांच्या शिष्य-परिवारात होता.

साईबाबा प्रारंभी शिर्डीत रुग्णांना औषध देत असत. पुढे रुग्णांची गर्दी खूप वाढल्यावर त्यांनी औषध देणे बंद केले. केवळ ‘उदी’ कपाळाला लावून अनेक रुग्णांना त्यांनी रोगमुक्त केले. त्यांना वाचा-सिद्धीसह अनेक सिद्धी प्राप्त होत्या. भक्तांना ते स्वत: रांधून प्रसाद वाटत. अन्नदानावर त्यांचा विशेष भर होता. दीन-दुबळ्यांची सेवा हाच त्यांचा धर्म होता. १९१८ साली दसऱ्याच्या दिवशी मध्यान्ही त्यांनी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर, त्यांची द्वारकामाई मशीद आणि ते एक दिवसाआड झोपण्यास जात ती ‘चावडी’, अशी तीन ठिकाणे सध्या शिर्डीत साईबाबांची पवित्र स्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी रामनवमी, गुरुपौर्णिमा व दसऱ्याच्या वेळी समाधी सोहळा असे तीन मोठे उत्सव शिर्डीत साजरे होतात. त्यासाठी लाखो भाविक शिर्डीत जमतात. साईबाबांच्या प्रेरणेने देशातच नव्हे, तर विदेशांतही प्रचंड संख्येत सामाजिक सेवा- प्रकल्प सुरू आहेत. पुट्टपूर्तीच्या सत्यसाईबाबांच्या सेवाकार्याचे प्रेरणास्थानही शिर्डीचे साईबाबाच आहेत. सध्या सरकार नियुक्त विश्वस्त मंडळ संस्थानाचे कार्य पाहत आहे.

विद्याधर ताठे

सत्पुरुष, साक्षात्कारी संत