Skip to main content
x

सत्यनारायण, नीला पीलरसेट्टी

          हाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त  श्रीमती नीला सत्यनारायण यांचा मुंबई येथे जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात कार्यरत होते. नीला सत्यनारायण यांना घरातूनच आध्यात्मिकतेचा वारसा व संस्कार मिळाले. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शालेय शिक्षण व शालान्त परीक्षा दिल्लीमध्ये, असा त्यांचा शालेय जीवनाचा प्रवास झाला. १९६५ साली दिल्लीत बोर्डाच्या परीक्षेत संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून त्या बोर्डात पहिल्या आल्या. त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला आणि त्या आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र कॅडरमध्ये १९७२ ला रुजू झाल्या.जगामध्ये काहीतरी करून दाखवायचे असेल तर जगात जी भाषा स्वीकारली जाते त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे हाच इंग्रजी विषय मुद्दाम निवडण्याचा त्यांचा हेतू होता.

प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर नागपूरपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. सेवाकाळात त्यांनी भूषविलेली महत्त्वाची पदे त्यांना थोडी उशीराच मिळाली. त्या काळी प्रशासकीय व्यवस्थेला स्त्री अधिकाऱ्यांची सवय नव्हती. त्यामुळे प्रशासनाचा आणि शासनाचा विश्वास संपादन करता करता पहिली काही वर्षे स्वत:ला सिद्ध करण्यात गेली. परंतु एकदा शासनाने त्यांच्यावर विश्वास टाकल्यानंतर नगर विकास, गृह, माहिती व जनसंपर्क, अन्न व नागरी पुरवठा, महसूल व वन विभाग अशा काही महत्त्वाच्या खात्यांमधून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

समाजकल्याण विभागात त्यांनी केलेल्या कामाची पावती आज अनेक स्वयंसेवी सेवा आणि विविध सामाजिक संस्था त्यांना देतात. मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वेमार्गावर अपंगांसाठी सदनिका विकत घेऊन त्या अपंग संस्थांना देण्याची संकल्पना त्यांचीच. हेतू हा की, अपंगांना दक्षिण मुंबईमध्ये दूरवर प्रवास करायला लागू नये. वरळीच्या नॅबसाठी म्हणजे अंध शाळेसाठी परदेशातून वाद्ये मागवून ऑर्केस्ट्रा बनविण्यासाठी निधी देण्याची कल्पनाही त्यांचीच. आज नॅबचा ऑर्केस्ट्रा परदेशात जाऊन कार्यक्रम करतो तो त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम म्हणता येईल. धारावीमधील उभे राहिलेले लेदरचे सेंटर हाही त्यांच्या अभिमानाचाच एक विषय आहे. प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन त्यांनी तेथील लोकांना हा उद्योग मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उद्युक्त केले होते. आज त्याचे एवढे मोठे स्वरूप झाले आहे की धारावीतील चामड्याच्या वस्तू निर्यात होतात.

गृह विभागात असताना कारागृहातील महिलांसाठी  उद्योग प्रशिक्षण, स्त्रियांसाठी खुले कारागृह करणे तसेच बंदिवानांच्या मुलांसाठी योजना हाती घेणे यासारखी काही उदात्त कामे त्यांनी केली .

अन्न व नागरी पुरवठा विभागात एका जपानी कंपनीबरोबर टेट्रा पॅक या विषयावर संशोधन केले. आज सर्वत्र छोट्या पॅकमधून, सॅशेमधून खाद्यपदार्थ, तेल मिळते, हेदेखील त्यांच्याच संशोधनाचे फळ म्हणता येईल .

त्यांच्या संशोधन निबंधाची दखल घेऊन केंद्र शासनानेही त्यांना प्रशस्तिपत्रक दिले. युनायटेड नेशन्समधील एपीसीडब्लू या स्त्रियांच्या कामासाठी झटणाऱ्या संस्थेने त्यांचा शोधनिबंध संदर्भ पेपर म्हणून त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवला आहे. सध्याच्या नवीन पदावर काम करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान त्यांनी सुरू केले .

नीला सत्यनारायण नेहमीच कवियत्री, संगीत दिग्दर्शक, लेखक अशा अनेकविध भूमिकेतून आपल्यासमोर येत राहिल्या . हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून त्यांनी आजवर १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलाला जन्म दिल्यानंतर पालकाला ज्या कटू अनुभवातून जावे लागले आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले त्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. ज्या मातांना अशी मुले आहेत त्यांना धीर आणि सामर्थ्य देण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरले आहे. सत्यकथा हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि एक दिवस (जी)वनातला हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.

प्रशासनाच्या विविध खात्यातून काम करून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून २००९ साली नीला सत्यनारायण सेवानिवृत्त झाल्या. नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या जवळजवळ १५० गीतांचे ध्वनिमुद्रण झाले असून, त्यांनी बसविलेली वेधक नृत्ये आणि त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत. त्यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार - १९८५, महात्मा गांधी पुरस्कार - १९८६, भारत निर्माण पुरस्कार- १९८७,महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २००७, महाराष्ट्र हिंदी साहित्य संस्था पुरस्कार २००८, लोकसत्ता वुमन ऑफ द इयर पुरस्कार २००८, संकल्प प्रतिष्ठान (कल्याण) जीवन गौरव पुरस्कार २००९, मातृवंदन पुरस्कार २००९, मनोविकास विशेष बाल शिक्षण सोसायटी (अमरावती), आशीर्वाद पुरस्कार २००९, हिंदी साहित्य जीवन गौरव आदी पुरस्कार मिळाले आहेत.

अशा ह्या तडफदार अधिकाऱ्याचे  वयाच्या ७१व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

- मीनाक्षी राजेंद्र पाटील

सत्यनारायण, नीला पीलरसेट्टी