Skip to main content
x

स्वामी, समर्थ

स्वामी समर्थ

      हाराष्ट्रातील पाच संप्रदायांपैकी दत्त संप्रदाय हा एक असून त्या संप्रदायातील चौथा अवतार म्हणून गणले गेलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आध्यात्मिकदृष्ट्या कार्यकाल पुष्कळ असला, तरी त्यांच्या ऐतिहासिकदृष्ट्या प्रकट असलेल्या कार्यकालाचा अवधी शके १७६० पासून असून त्यांनी शके १८०० मध्ये आपला देह निजानंदी विलीन केला. तिथपर्यंत मानला जातो.  ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या त्यांच्या सुप्रसिद्ध अभिवचनामुळे सत्कार्यास भय नसण्याची आधारशक्ती त्यांच्या उपासकांना लाभली.

‘आम्ही समाधिस्थानी राहून अधिकारपरत्वे भक्तांना दर्शन देऊ, त्यांच्या मनोकामना पूर्ण करू,’ अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आणि आता विदेशांतही त्यांचे भक्तगण विपुल संख्येने असून ठिकठिकाणी त्यांची मठ-मंदिरांच्या स्वरूपात उपासना केंद्रे आहेत. दत्त संप्रदायाची आध्यात्मिकदृष्ट्या अवतार-परंपरा सांगितली जाते ती अशी : वेद-पुराणातील अत्रि ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र श्रीदत्तात्रेय हा पहिला अवतार, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ हे अनुक्रमे दुसरा, तिसरा, आणि चौथा अवतार मानले जातात. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले, तर दत्तपरंपरेतील पहिला अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा होय. पूर्वेकडील प्रांतात (आंध्र) पीठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला.

कुरवपूर येथे त्यांचे वास्तव्य होते. तेथेच त्यांनी पुरश्चरण केले. ‘पुन्हा भेटेन’ असे अभिवचन त्यांनी अवतार संपविताना दिले. तेच पुढे श्री नृसिंह सरस्वती म्हणून वर्‍हाडप्रांती, कारंजानगर येथे जन्मास आले. त्यांचा कार्यकाल शके १४०८ ते १४५८ असा असून शके १४५७ च्या अखेरीस ते श्रीशैल यात्रेस गेले व तेथील कर्दळी वनात गुप्त झाले. त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी त्याच कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ हे एका वारुळातून प्रकट झाले. मात्र, अक्कलकोटला येण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील त्यांचा प्रकटकाल शके १७६० ते १८०० असा ४० वर्षांचा आहे. ते शके १७६० मध्ये मंगळवेढा येथे प्रकटले. तेथून मोहोळ, सोलापूरमार्गे ते शके १७७९ मध्ये अक्कलकोटला आले. तेथे त्यांनी २१ वर्षे वास्तव्य केले. शके १८०० मध्ये त्यांनी अवतार समाप्ती केली. त्यांची समाधी अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील मठात आहे. त्यांनी जिथे देह निजानंदी निमग्न केला व सतत जिथे त्यांचे वास्तव्य असे, त्या वटवृक्षाची साक्ष देत असलेला श्री वटवृक्ष स्वामी महाराज मठही विख्यात आहे.

चोळप्पा व बाळप्पा हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. बाळप्पांच्या मठात त्यांचा दंड, रुद्राक्षमाळ व पादुका असून तो मठ गुरुमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. चोळप्पांच्या घराजवळच त्यांचे समाधिस्थान असल्याने बुधवार पेठेत तो समाधिमठ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘द्या’ म्हणून प्रार्थना केल्यास जे दिले जाते, त्याला ‘दत्तकृपा’ असे म्हणतात. दत्तांची परंपरा व त्यांचे अवतारित्व यांविषयीचा उल्लेख त्यांच्या ‘श्रीगुरुचरित्र’ व ‘श्रीगुरुलीलामृत’ या दोन प्रमाणग्रंथांत पाहावयास मिळतो.

श्री स्वामींची स्वरूप स्थिती व त्यांचे अवतारीत्व यांविषयीचा एक उल्लेख ‘श्री स्वामी लीलामृत’ या पंचाध्यायी पोथीत (नानात्मज गजानन सुत विरचित) पाहावयास मिळतो, तो असा : ‘दत्तनगर मूळ पुरुष । वडाचे झाड विशेष । सत्य तेथ आमुचा वास । मनी संशयास न आणावे । आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण । आमुचे नांव नृसिंहभान । आम्ही काश्यपगोत्रोत्पन्न । राशी मीन जाणावी ॥ जे सत्चित्सुखाचे कोंब । कलियुगी श्रीपाद श्रीवल्लभ । जगताकारणे स्वयंभु । सत्चित्प्रभू प्रकटले ॥ तैसा हा अवतार चवथा । त्याची ऐकावी कथा । वय सारे जाते वृथा । म्हणूनि सत्पथा धरावे । आयुष्य हे चंचलजीवा । या कारणे नित्य सेवा । सत्चित्सुखाचा देतील ठेवा । यात न मानावा संशय ॥’

त्यांच्या वचनबोधातून पाहावयास मिळणारी शिकवण अशी : ही शिकवण कधी श्री स्वामींच्या मुखातून प्रत्यक्षपणे प्रकट वेळी वा चरित्रकाराकडून सांगितली अशा स्वरूपात आहे : सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठीच आपण अवतार घेतला असून इच्छापूर्ती व ज्ञानप्राप्ती हे भक्तांचे दोन्ही हेतू आपण पूर्ण करतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. इच्छापूर्ती झाल्यानंतर तरी भक्तिमार्गी होण्यासाठी नामस्मरणात्मक साधना करावी. त्यासाठी गुरुबोधाची आवश्यकता आहे. ‘गुरुवीण ज्ञान व्यर्थचि असे’ असे सांगून साधकाने प्रयत्नवादी असावे, असे ते सांगतात. ‘प्रयत्ने देवे होय सारथी’ असे त्यांचे वचन आहे. ‘द्यावे तैसेचि घ्यावे’, ‘पेरावे ते उगवते’, ‘शेत पिकवावे, शेत राखावे, शेत नित्य खावे’, म्हणजेच नामाने देहरूपी शेतात बीज पेरून साधनमार्गाने ईश्वरदर्शनाचे फळ सदैव खावे, असे ते सांगतात.

‘मैं गया नहीं । जिंदा हूँ । मैं तो अक्कलकोट में हूँ ।’ असे स्वामी म्हणाले. त्याचा अर्थ चरित्रकारांनी फार सुंदर सांगितला आहे. ‘‘अक्कल’ म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानस्वरूप आत्म्याभोवती इंद्रियांची तटबंदी आहे. ती तटबंदी म्हणजेच ‘कोट’ होय. एरव्ही ही इंद्रिये बहिर्मुख असतात. पण त्यांना नामसाधनबळे अंतर्मुख करावे, म्हणजे ती ज्ञानस्वरूप आत्म्यास ओळखतील. तसा मी अंतर्यामी सदैव असतोच. इंद्रियांना परमार्थानुकूल करून तुम्ही मला पाहावे.’ ‘ध्यानासी मूलाधार’ गुरूची मूर्ती । पूजेसी मूल गुरुचरण असती । गुरुवाक्य हेचि मूलमंत्रबीज शंकर वदती । मोक्षासी मूल गुरुकृपा पाहिजे ॥’ या ओवीत पूर्णत्वाने भक्तिमार्गाचे विवेचन येऊन गेलेले आहे. ‘नवस केला, तर तो फेडावा’, तसेच ‘निंदा, द्वेष, अहंकार नसावा’, सद्गुरूकडे जाताना विनम्रपणाने जावे हे सुचविताना त्यांनी सत्ता आणि धन यांचा दिमाख असलेल्या अधिकार्‍यास ‘लहान घोडे घेऊन ये’ असे म्हटले, तर सेवेत स्वार्थ शिरू देऊ नये अन्यथा पुण्यसंचयास ओहोटी लागेल, हे सुचविताना ‘गौ दाल खा गई’ असे म्हटले आहे.

‘नित्य कर्मे करावीत’ असे सांगताना कर्मयोग व ध्यानयोग यांची सांगड घालावी, असे उपदेशिले आहे. ‘अधिकारपरत्वे दर्शन देऊ’ असे म्हणण्यात अधिकार म्हणजे ‘उपासनाबळ’, असे त्यांना अभिप्रेत आहे. आजकाल आणि फार वर्षांपूर्वीपासूनही दत्त संप्रदायातील अवतारीत्वांची उपासना करणाऱ्यांची संख्या पुष्कळच आहे आणि ती आणखी वाढतच आहे. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने तर अशा अवतारी सत्पुरुषांची उपासना करणे ही गोष्ट तर महत्त्वाची आहेच; पण सामाजिक दृष्टीने अशा सत्पुरुषांचे कार्य कोणते? तसेच, त्यांच्या उपासनेची फलश्रुती कोणती?, हा प्रश्न सर्वांच्याच मनात येऊन जातो. त्याची प्रधान तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे : दर्शन सुखाने त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊन त्यांच्या स्मरणाने संकल्प करून तो सिद्धीस जावा यासाठी पूजा-अभिषेक, पालखी-प्रदक्षिणा, भजन-निरूपण, नित्य स्वरूपात जप करणे आणि चरित्रग्रंथांचे पारायण करणे हा सोपा, सुलभ मार्ग उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे : कडक सोवळे-ओवळे आणि आचरण वा उपासना खंडित झाली तर त्याची शिक्षा घडते या श्रद्धा वा समजुतीने नामसाधना व सदाचरणाचे पालन करण्याची काळजी घेतली जाते.

तिसरे कारण म्हणजे : सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिकूलता आणि व्यक्तिगत जीवनातील दु:ख-संकटे एवढी वाढली आहेत, की अशासारख्या दैवताची उपासना करून मनोबल वाढवण्यासाठी आधारशक्ती प्राप्त करून घेणे, ही गरज निर्माण झाली आहे. या तीनही कारणांचा व्यापक हित-कल्याणाच्या दृष्टीने विचार केला तर सर्व समाज नव्हे; पण किमानपक्षी श्रद्धा-उपासना मार्गाने जाणाऱ्या उपासकांकडून अंशत: का होईना, पण नैतिकतेचे सामर्थ्य वाढविणे आणि सामाजिक शुद्धीसाठी सन्मार्ग दाखविणे हे कार्य प्रत्यक्ष घडून येत आहे, असे निश्चितपणाने म्हणता येईल.

नरेंद्र कुंटे

स्वामी, समर्थ