Skip to main content
x

तालीम, बाळाजी वसंत

शिल्पकार

           विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वास्तववादी शैलीत सर्जनशील, भावपूर्ण आणि स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात दर्जेदार शिल्पनिर्मिती करणारे शिल्पकार म्हणून बाळाजी वसंत तालीम ख्यातनाम होते.

           बाळाजी तालीमांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील वसंत हे निजाम संस्थानचे मान्यवर बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना एकूण तीन अपत्ये होती. ती लहान असतानाच वसंत तालीम यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांची पत्नी हैदराबाद सोडून मुलांसह मुंबईत वास्तव्यास आली.

           मुळातच कलेची आवड असलेल्या बाळाजींनी प्राथमिक शिक्षणानंतर शिल्पकला शिक्षणासाठी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला विभागात प्रवेश घेतला व अल्पावधीतच ते शिल्पकला विभागाचे हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले. या काळात त्यांना डॉली करसेटजी पारितोषिक मिळाले. तसेच, शिल्पकला विभागात शिकत असताना सातत्याने दाखविलेली प्रगती व दर्जेदार शिल्पनिर्मितीमुळे तालीम यांना महत्त्वपूर्ण असे व्हाइसरॉयचे ‘लॉर्ड मेयो पदक’ १९११ मध्ये मिळाले.

           त्या काळात जे.जे.त पाश्‍चात्त्य यथार्थवादी अभ्यासक्रम राबविला जात असल्याने तालीम यांच्यावर वास्तववादी शैलीचाच प्रभाव होता. त्याबद्दलची त्यांची जाण व प्रभुत्व उत्तम होते. व्यक्तिशिल्पामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे अथक प्रयत्नांनी तालिमांनी म्हात्रे, करमरकर अशा समकालीनांप्रमाणे पाश्‍चात्त्यांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या वास्तववादी व्यक्तिशिल्पाच्या कलेत प्रावीण्य मिळविले व या भारतीय शिल्पकारांनी पाश्‍चात्त्य शिल्पकारांच्या दर्जाची शिल्पे तयार करून ब्रिटिशांना धक्का दिला. त्यामुळेच भारतात उभारली जाणारी स्मारक शिल्पेे घडविण्याचे काम परदेशात न पाठवता म्हात्रे, तालीम, करमरकर अशा भारतीय शिल्पकारांवर ही कामे सोपवली जाऊ लागली. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षण संपल्यावर त्यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिल्पकला विभागात आमंत्रित करण्यात आले व ते या संस्थेत शिल्पकला विभागात शिकवत असत. त्यांचा विवाह सुमती डेरे यांच्याशी झाला.

           बाळाजी तालीम यांनी १९१८ मध्ये मुंबईत ‘तालीम आर्ट स्टूडिओ’ सुरू केला. स्मारकशिल्पांच्या व्यावसायिक कामांबरोबरच त्यांनी स्वानंदासाठी अनेक शिल्पे घडविली. समाजातील दुर्बळ घटकांचे कष्टमय जीवन व्यक्त करणार्‍या कलात्मक व मनाला चटका देणार्‍या या व्यक्तिशिल्पांना अनेक पारितोषिके व बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक दोन वेळा मिळाले. ‘बेगर अँड हिज सन’ या शिल्पाला १९२३ चे बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. या शिल्पात मुलाने आपल्या आंधळ्या बापाचा हात भिकेसाठी उचलून धरला असून, भिकार्‍याचा फकिरी पेहराव आणि इस्लामी पोशाखातील मूल यांच्या आविर्भावातून त्यांच्या कारुण्यमय जीवनाची यथार्थ जाणीव होते. या शिल्पातील मृदलेपनाद्वारे मिळवलेला पोत या शिल्पाच्या कलात्मकतेत भर घालतो.

           पुढे १९३२ साली बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळालेले त्यांचे ‘टकळी’ हे  शिल्प लयदार व कमनीय शिल्पाचा उत्कृष्ट आविष्कार आहे. टकळी फिरवून सूत काढणार्‍या स्त्रीची स्त्रीसुलभ बैठक, कापसाचा हलकेपणा स्पष्ट करणारी पंजाच्या बोटांची पकड, टकळीला गती देणारी उजव्या हाताची बोटे या सर्वांची योजना व रचना अप्रतिम आहे. या स्त्रीचा डौलदार बांधा व स्त्रीत्वाचे मुग्ध दर्शन घडविणारे चेहर्‍यावरील भाव या सर्व गोष्टी बाळाजी तालीम यांनी या शिल्पात कल्पकतेने योजिल्या आहेत. सूत काढताना झालेली देहाची हालचाल व त्यानुसार ताणल्या गेलेल्या साडीच्या चुण्यांची योग्य रचना त्यांच्या निरीक्षणाची साक्ष देतात. लंडनमध्ये भरलेल्या ‘वेम्ब्ले’ प्रदर्शनात त्यांच्या ‘गारुडी’ (स्नेक चार्मर) या शिल्पाची खूप प्रशंसा झाली.

           सध्या जे.जे.च्या संग्रहात असलेलेे त्यांचे ‘दरिद्री नारायण’ हे कांस्य धातूतील अप्रतिम अर्धशिल्पही भावदर्शनाचा व अभिव्यक्तीचा उत्कृष्ट नमुना आहे. या शिल्पात एक वृद्ध, दरिद्री मनुष्य आपला अंगरखा, त्याची दृष्टी मंद असल्याने अगदी वाकून शिवत असल्याचे दिसते. शिल्पातील कारुण्य व आशय अत्यंत प्रभावीपणे या शिल्पाच्या हाताळणीतून व्यक्त होतो. ‘अमीरी इन फकिरी’ हे गरीब मुसलमान फकिराचे व्यक्तिशिल्प असून या शिल्पात त्याच्या मुखावर सिगारेट ओढल्यानंतर त्याची तल्लफ भागल्याने झालेले समाधान व हळुवारपणे धूर सोडतानाची ओठांची रचना अशा तपशिलातून व्यक्त होणारा कलाविष्कार थक्क करतो.

           बाळाजी तालीम यांच्या कोणत्याही माध्यमात शिल्पे घडविण्याच्या सामर्थ्यामुळे स्मारक-शिल्पांची कामे त्यांना तरुण वयातच मिळू लागली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश सरकारने मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी समिती नेमली होती. या समितीत सुरुवातीला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक सेसिल बर्न्स व त्यानंतर ग्लॅडस्टन सॉलोमन होते. त्यांना बाळाजींच्या शिल्पकौशल्याची जाणीव होती.

           दादाभाई नवरोजी यांचा पूर्णाकृती पुतळा करण्याचे ठरल्यावर या पुतळ्याचे प्राथमिक मॉडेल करण्याचे काम एका पाश्‍चात्त्य शिल्पकाराला व तालिमांना देण्यात आले. समितीला तालिमांचे काम पसंत पडले व कांस्य धातूतील पुतळ्याचे काम त्यांनाच मिळाले. हा पुतळा हुतात्मा चौक येथे आहे. या पुतळ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, वयपरत्वे झुकलेली त्यांची खुर्चीवर बसण्याची ढब, विचारमग्न चेहरा, पारसी टोपी, भरदार दाढी राखलेला चेहरा, चष्मा, पारसी अंगरखा हे सर्व त्या देशभक्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविते व पुतळा जिवंत असल्याचा भास होतो.

           तालिमांच्या संगमरवरी शिल्पांची उत्तम उदाहरणे म्हणजे त्यांनी घडविलेली ‘जस्टिस जेन्कीन्स’, ‘रावबहादूर पेट्टीगार’ यांची शिल्पे व तालिमांच्या जीवनात महत्त्वपूर्ण ठरलेले शिर्डीच्या साईबाबांचे संगमरवरी शिल्प ही होत. साधुसंतांबद्दल आदर असलेल्या बाळाजी तालिमांनी रामकृष्ण परमहंसांचा चिंतनशील भाव, संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम यांचे भक्तिभाव दाखविणारे पुतळे, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा उग्रभाव व्यक्त करणारा पुतळा, असे अनेक पुतळे निर्माण केले.

           व्यक्तिशिल्प निर्मितीपूर्वी तालीम ज्या व्यक्तीचे शिल्प करायचे असेल, त्या व्यक्तीचा समग्र व सखोल अभ्यास करीत. याशिवाय साधर्म्य, स्वभाव व व्यक्तिमत्त्व व्यक्त होईल याची खबरदारी घेत. त्यात व्यक्तीच्या शरीराची ठेवण, चेहर्‍यावरील भाव, उभे राहण्याची अथवा बसण्याची पद्धत, स्वभाव, पेहराव अशा अनेक गोष्टी विचारात घेत. ते जरी फोटोवरून शिल्प करीत असले, तरी त्या व्यक्तीने हयात असल्यास एकदा तरी त्यांच्या स्टुडिओत येऊन सिटिंग द्यावे याबाबत ते आग्रही असत. त्यामुळेच इतर अनेक मान्यवरांप्रमाणे संत गाडगेबाबांनीही त्यांच्या स्टुडिओत येऊन व्यक्तिशिल्पासाठी सिटिंग दिले होते.

           स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या बाळाजी तालीम यांचे पुतळे मुंबईत इतर शिल्पकारांपेक्षा जास्त संख्येने आढळतात. स्मारकशिल्पे व स्वानंदासाठी केलेल्या त्यांच्या भावपूर्ण शिल्पांमधून समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींचे व विविध वयोगटांतील व्यक्तिमत्त्वांचे दर्शन होते. भारतातील शिल्पकला क्षेत्राची शान वाढविणार्‍या या शिल्पकाराला पाश्‍चिमात्य जाणकारांचीही दाद मिळाली होती.

           बाळाजी तालीम यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांचा स्टूडिओ त्यांचे पुत्र हरीश तालीम व नंतर त्यांच्या पुढील पिढीने सुरू ठेवला असून आजही तेथे शिल्पनिर्मितीचे कार्य सुरू आहे.

- विठ्ठल शानभाग

तालीम, बाळाजी वसंत