Skip to main content
x

ताम्हनकर, वसंत सीताराम

आण्णा  ताम्हनकर

       ज्ञान प्रबोधिनी या शिक्षण, संशोधन, ग्रामविकासात  अग्रेसर असलेल्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी  एक वसंत सीताराम ताम्हणकर होते. १९६२ ते १९८३ प्रबोधिनीचे संचालक म्हणून आणि १९८९ ते २०१० पर्यंत सोलापूर आणि हराळी (भूकंपक्षेत्र) येथील प्रबोधिनीच्या कार्याचे कर्णधार म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मानसशास्त्रातील सुवर्णपदक मिळविले पुणे विद्यापीठात अध्यापन केले. डॉ. वसंतराव सीताराम तथा आण्णा ताम्हनकर यांचा जन्म पुण्यात सीतारामपंत व उमा यांच्या पोटी झाला. आण्णांचा तरुणपणातील काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंत्रित होता. संभाजीनगरचे (औरंगाबाद) ते जिल्हाप्रचारक होते. डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आप्पा यांची ओळख संघातच झाली. त्यांनी आण्णांच्या मनात शिक्षणाची गोडी उत्पन्न केली. आण्णांनी एम. ए. मानसशास्त्र आणि एम. एड. शिक्षण शास्त्रात करून पुणे विद्यापीठाची दोन सुवर्णपदके मिळवली. विद्यापीठातच प्रा. व. कृ. कोठुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘अचिव्हमेंट मोटिव्हेशन’  या विषयावर केवळ दोन वर्षांत पीएच. डी. प्राप्त केली. त्यांचे विदेशस्थ परीक्षक डॉ. मॅक्लेलेंड यांनी त्यांच्या प्रबंधाची मोकळ्या मनाने प्रशंसा केली. त्यानंतर विद्यापीठात काही काळ अध्यापनाचे काम आण्णांनी केले. पण लौकरच  ज्ञान प्रबोधिनीचे काम पूर्णवेळ करता यावे म्हणून त्यांनी त्यागपत्र दिले. त्यानंतर शेवटपर्यंत प्रबोधिनीचे पूर्णसमय कार्यकर्ते म्हणून ते सतत कार्यरत होते.

       शिवगंगा खोरं ग्रामीण युवकाचं तंत्रशिक्षण आणि जीवनशिक्षण आज ज्ञान प्रबोधिनीचे शिवगंगा-गुजवणी नद्यांच्या खोर्‍यातील २३६ खेड्यांमध्ये तंत्रशिक्षण, महिलाविकास, उद्योजकता विकास, आरोग्य, पाणलोट क्षेत्र विकास, व्यसनमुक्ती असे विविध प्रकारचे काम आहे. त्याची पायाभरणी १९६९-७० पासून आण्णांनी केली. किर्लोस्कर-ज्ञान प्रबोधिनी यंत्रशाळेची उभारणी त्यांनी खेड शिवापूर येथे राहून केली. तिथे परिसरातील खेड्यांमधील मुले तंत्रशिक्षण घेण्यासाठी येऊ लागली. आण्णांनी अशा १४०० हून अधिक ग्रामीण मुलांचे शिक्षण प्रेमाने आणि अनुशासनपूर्वक केले. युवकांना त्यांनी उत्तमोत्तम राष्ट्रभक्तीपर गीते सुरेल म्हणायला शिकवली. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ढोलताशे वाजवायला नि बर्च्या घेऊन नाचायला शिकवले. उत्तम कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यवाही जबाबदारीने कशी करायची याचे शिक्षण दिले. त्यांच्यामुळे अनेक मुस्लीम,नवबौद्ध तरूणांनी प्रबोधिनीच्या कार्याची दीक्षा घेतली. या तरुणांमधून उत्तम ग्रामीण उद्योजक घडले.

         शिवगंगा खोर्‍यात हातभट्टी चालविणारे पुष्कळ अड्डे होते. आण्णांनी महिलांची आणि युवकांची हातभट्टी विरूद्ध आघाडी उघडली. हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे घालून ते उद्धवस्त कसे करायचे हे शिक्षण आण्णांनी त्यांना स्वत: करून दाखवून दिले. परिणाम म्हणून काही वर्षे या परिसरातील भट्ट्या आणि देशी दारूची दुकाने बंद पडली.

       या परिसरात साखर नावाचे गाव होते. कावंदी नदीला जेव्हा पूर येई त्यावेळी हे गाव बाकी जगापासून तुटून जाई. इतक्या दुर्गम ठिकाणी पूल बांधकामाचा अनुभव नसतानाही मे १९७७ च्या उन्हाळ्यात त्यांनी प्रा. रामभाऊ डिंबळे यांच्या मदतीने या पुलाचे बांधकाम अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले.

       डॉ. अप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर सहा वर्ष आण्णांनी प्रबोधिनीच्या संचालकपदाचे दायित्व सांभाळले. योग्य निर्णय करीत प्रबोधिनीला कर्जमुक्त केले. युवकांचे कन्याकुमारीला प्रेरणाशिबिर घेतले. अनेक युवक-युवतींना प्रबोधिनीच्या कार्यात जीवन समर्पण करण्याची प्रेरणा दिली. विविध धर्मीयांशी संवाद करीत व्यापक हिंदुत्वाचा विचार मांडला. विदेशातही प्रबोधिनीसाठी अनेक साहाय्यक व  शुभचिंतक जोडले. या काळात सोलापूरच्या बालविकास मंदिर या संस्थेशी विचारविनिमय चालू होता. ही संस्था तिच्या संस्थापकांनी - केळकर पतिपत्नींनी - ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतरित केली. ज्ञान प्रबोधिनी- सोलापूर या न्यासाचे ते कार्याध्यक्ष झाले. ते सोलापूरला निवासाला आले. ज्ञान प्रबोधिनीच्या संचालकपदाची सूत्र डॉ. गिरीश श्रीकृष्ण बापट यांनी स्वीकारली.

       आण्णांच्या नेतृत्वाखाली प्रबोधिनीचे सोलापुरात काम सुरू केल्यावर तेथील शैक्षणिक जगतात लक्षणीय बदल झाले. पंधरा-पंधरा शिक्षणसंस्था एकत्र येऊन गणेश विसर्जनाच्या भव्य सुंदर मिरवणूका निघू लागल्या. त्यात हजारो विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक-पालकांचाही सहभाग होता. ‘स्पर्धा केवळ नव्हे तर उत्तमतेसाठी सहकार्य’ हा नवा मंत्र आण्णांनी दिला. मागासवर्गीय शाळांमध्ये प्रबोधिनीचे शिक्षक - कार्यकर्ते विद्याव्रत संस्कार रुजवू लागले, व्यसनांपासून दूर राहून उत्तम विद्याभ्यास करीन, शरीरसंपदा मिळवीन अशा शपथा विद्यार्थी अग्निसाक्षीने घेऊ लागले. साहसशिबिरे- साहससहली निघू लागल्या. सर्वधर्म प्रार्थना होऊ लागल्या. प्रतिभाविकास, वाचनविकास इ. बुद्धिकौशल्याचे प्रशिक्षण वर्ग व आध्यात्मिक व्याख्यानमाला योजल्या जाऊ लागल्या. १९९३-९४ मध्ये प्रबोधिनीच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या ३० झोपड्यांमध्ये १८०० साक्षरता वर्ग दोन वर्ष चालले. त्यात शिक्षक-विद्यार्थी असा सर्वांचा सहभाग होता.

       बाबूभाई कराणी यांनी जपानी राजदूतांची हराळी भेट घडवली. डॉ. आण्णा ताम्हनकर ही व्यक्ती हराळीच्या बरड माळरानावर शिक्षण रुजवण्यासाठी सर्व गैरसोयी-अडचणीत निश्‍चय व निष्ठेने उभी आहे हे पाहून राजदूतांनी साहाय्याचा हात पुढे केला. त्यातून हराळीचे शिक्षणतीर्थ उभे राहिले. एक मंदिरसदृश वास्तू झाली. २००६ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाची मान्यता असलेले कृषितंत्र पदविका विद्यालय सुरू झालं. आण्णा या सर्व मुलांशी संवाद करत, त्यांना गीतं शिकवत, त्यांच्याबरोबर भजन दिंडीत खेळत. उत्तम जीवनाची सूत्रे त्यांना शिकवत. उत्तम माणूस घडवत.

       हराळीच्या ६० एकर भूमीवर काजू-आंबा- पेरू-लिंब-बोरांच्या हिरव्यागार फळबागा डोलत आहेत, सौर-पवन ऊर्जांचा कल्पक उपयोग केलेला आहे.  साडेसहा कि.मी. वरून माकणी तलावातून पुरूषार्थ प्रयत्नाने जलप्रवाह आणला आहे. या कार्यासाठी शासनाने हराळी प्रबोधिनीला ‘वृक्षमित्र’ पुरस्कार दिला आहे. आण्णांचा डोंबिवलीच्या टिळक शिक्षण संस्थेने डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या हस्ते सत्कार केला आहे. नवनीत जीवन गौरव पुरस्कार, अंबरनाथचा दधिचि  पुरस्कार हे त्यांना मिळालेले पुरस्कार होत. पूजनीय कै. माधवनाथ महाराज हे आण्णांचे आध्यात्मिक दीक्षा गुरू होते.

- स्वर्णलता भिशीकर

ताम्हनकर, वसंत सीताराम