Skip to main content
x

तारकुंडे, विठ्ठल महादेव

      ज्येष्ठ न्यायविद तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  मा. विठ्ठल महादेव तारकुंडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. त्यांचे वडील महादेव राजाराम तारकुंडे हे सासवडला वकील होते. तारकुंडे यांचे प्राथमिक शिक्षण सासवडला आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, र.के.खाडिलकर वगैरे मंडळी त्यांच्याबरोबर शाळेत होती. त्या शाळकरी वयातही तारकुंडे स्वतंत्रपणे चिकित्सक विचार करीत असत. ‘प्रार्थनेचा उपयोग किंवा प्रभाव’ या विषयावर त्यांनी प्रत्यक्ष महात्मा गांधींना पत्रे लिहिली होती.

       १९२५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत तारकुंडे सर्वप्रथम आले. संस्कृत विषयातली प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती तारकुंडे आणि त्यांचे वर्गबंधू डी. पी. शिखरे यांना विभागून मिळाली. (तारकुंडे यांच्याप्रमाणेच शिखरेही पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.) सरकारी नोकरी न करण्याचा तारकुंडे यांचा निश्चय असल्याने त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९२९ मध्ये कृषी मधील बी. एजी. ही पदवी मिळविली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी लिंकन्स इन्मध्ये प्रवेश घेतला; त्याच वेळी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बहि:स्थ विद्यार्थी म्हणून नाव नोंदविले आणि आय.सी.एस.परीक्षेसाठीही अभ्यास केला. तथापि ते आय.सी.एस. परीक्षेस बसले नाहीत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्राचा (‘सोशल अ‍ॅन्थ्रोपॉलॉजी’) अभ्यास केला, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. यथावकाश ते लिंकन्स इन्मधून बॅरिस्टर झाले आणि डिसेंबर १९३२ मध्ये भारतात परत आले.

         बॅरिस्टर म्हणून तारकुंडे यांनी वकिलीची सुरुवात पुण्यामध्ये केली. महिन्यातले पंधरा दिवस ते आपले जन्मगाव सासवडच्या परिसरात जाऊन, तेथील शेतकर्‍यांमध्ये राहून त्यांचे प्रश्न समजावून घेत असत. पुढे १९३४ मध्ये त्यांनी एस.एम., ना.ग.गोरे आणि खाडिलकरांबरोबर काँग्रेस समाजवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान तारकुंडे यांचा एम.एन.रॉय यांच्या तत्त्वज्ञानाशी परिचय झाला आणि ते रॉय यांचे अनुयायी (म्हणजे रॉयवादी किंवा ‘रॉयिस्ट’) बनले. १९३९मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षातून बाहेर पडून ते रॉयवाद्यांनी काँग्रेसमध्येच राहून स्थापन केलेल्या ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन’ या गटाचे सदस्य बनले.

         १९३९मध्येच दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर धोरणात्मक मतभेदांमुळे या गटाच्या काही सदस्यांना काँग्रेसमधून काढून टाकले गेले. या मंडळींनी मग १९४०च्या अखेरीस मूलगामी लोकशाहीवादी पक्ष (‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’) हा नवीन पक्ष स्थापन केला. तारकुंडे यांनी काँग्रेस सोडली आणि ते या नव्या पक्षात गेले. १९४२मध्ये त्यांनी वकिली सोडली आणि ते या पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. १९४४मध्ये त्यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. ते दिल्लीला गेले आणि १९४८पर्यंत तेथे होते. १९४६मध्ये एम. एन. रॉय यांनी ‘इंडियन रिनेसन्सि इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना केली. तारकुंडे या संस्थेच्या संस्थापक-विश्वस्तांपैकी एक होते.

          १९४८च्या आसपास रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवमानवतावादाची सैद्धान्तिक मांडणी केली. यालाच नंतर मूलगामी मानवतावाद असे नाव मिळाले. राजकीय पक्ष आणि संसदीय लोकशाही या दोन्ही गोष्टी लोकांचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ आहेत, आणि साम्यवादाचा ऱ्हास होऊन त्याची जागा एकाधिकारशाहीने घेतली आहे, या मूलगामी मानवतावादाच्या दोन प्रमुख धारणा किंवा सिद्धान्त होत. रॉय यांनी आपल्या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी बावीस सूत्रांमध्ये (‘ट्वेन्टी-टू थीसीज्’) केली. त्यांचे सविस्तर विवेचन तारकुंडे यांनी १९८३मध्ये लिहिलेल्या ‘रॅडिकल ह्युमॅनिझम : द फिलॉसॉफी ऑफ फ्रीडम अ‍ॅन्ड डेमोक्रसी’ या आपल्या पुस्तकात केले आहे. तारकुंडे यांनी पुस्तक असे हे एकच लिहिले. त्यांचे बाकी सर्व लिखाण लेख, निबंध आणि अग्रलेखांच्या स्वरूपात आहे.

           १९४८मध्येच रॉय यांनी मूलगामी लोकशाहीवादी पक्ष अधिकृतपणे विसर्जित केला. याची काहीशी पूर्वकल्पना तारकुंडे यांना असावी, कारण ते त्या आधीच, म्हणजे जून १९४८मध्ये मुंबईला आले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. थोड्याच काळात वकिलीत त्यांचा जम बसला. १९५७मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.  १५ सप्टेंबर १९६९ रोजी ते मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन निवृत्त झाले.

            मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे न्यायाधीश म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही विभागांत यशस्वीपणे काम पाहिले. त्यांच्यासमोर युक्तिवाद करणे हे वकिलांना एक बौद्धिक आव्हान वाटे. करड्या शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या एका तपाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. सोफी केली खटला, जेठवानी खटला आणि ठाकरसी खटल्यातील त्यांचे निर्णय विशेष उल्लेखनीय म्हणता येतील.

             न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यावर न्या. तारकुंडे मुंबईहून पुन्हा दिल्लीला गेले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (आणि क्वचित दिल्ली उच्च न्यायालयात) वकिली सुरू केली. वकिलीच्या या ‘दुसर्‍या डावा’तही त्यांनी एक श्रेष्ठ वकील म्हणून लौकिक मिळविला. परंतु या काळात त्यांचे खरे नाव झाले ते मूलगामी मानवतावादाचे रॉय यांच्यानंतरचे थोर तत्त्वज्ञ आणि एकाधिकारशाही विरुद्ध आणि लोकांच्या मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक खंदे कार्यकर्ते म्हणून. १९७०मध्ये ‘इंडियन रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’ स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९८४ पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. १९७० ते १९९३ पर्यर्ंत ते ‘इंडियन रेनेसान्स इन्स्टिट्यूट’ या संस्थेचेही अध्यक्ष होते. नंतर १९७४मध्ये ‘सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी’ (सी.एफ.डी.) आणि १९७६मध्ये आणीबाणी लागू असताना ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज्’ (पी.यू.सी.एल.) या दोन संघटना जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्या; त्यांचे अध्यक्षपदही न्या.तारकुंडे यांच्याकडे चालत आले. सी.एफ.डी.ने बोहरा समाजाच्या धर्मगुरुंविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते. १९७८मध्ये जयप्रकाशांनी न्या. तारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक निवडणूक सुधारणा समिती नेमली; या समितीने निवडणूक सुधारणांवर अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला.

           १९८०नंतरच्या दोन दशकांदरम्यान ‘जनहित याचिका’ या संकल्पनेचा उदय आणि विकास होऊन भारतीय न्यायव्यवस्थेचा तो एक अविभाज्य घटक बनला. वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक बिनसरकारी संघटना (नॉन-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा एन.जी.ओ.) कार्य करू लागल्या.

           अशा एन.जी.ओ. आणि पी.यू.सी.एल. यांच्या वतीने न्या.तारकुंडे यांनी अनेक विषयांवरील जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांत लढविल्या. दिल्लीतील १९८४च्या शीखविरोधी दंगलीनंतर भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. सिक्री आणि न्या.तारकुंडे यांच्या समितीने दिल्लीच्या अनेक भागांत फिरून ‘नागरिक चौकशी’ केली. अशीच चौकशी न्या.तारकुंडे यांनी पंजाबात आणि काश्मीर खोऱ्यातही केली. १९९०मध्ये अलीगढमध्ये दंगल झाली; त्या घटनेचीही न्या.तारकुंडे यांनी पी.यू.सी.एल. च्या अन्य सदस्यांबरोबर चौकशी केली.

             १९३७मध्ये एम.एन.रॉय यांनी ‘इन्डिपेन्डन्ट इंडिया वीकली’ हे साप्ताहिक कोलकात्यात सुरू केले होते. त्याचे नंतर ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ असे नामांतर झाले. न्या.तारकुंडे त्यात सुरुवातीपासूनच लिहीत असत. १९७०मध्ये  ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’चे कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतर झाले आणि त्याचे मासिकात रूपांतरही झाले. त्याच वेळी न्या.तारकुंडे त्याचे संपादक झाले.

              जवळजवळ एकोणतीस वर्षे, म्हणजे त्यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत त्यांनी ही धुरा समर्थपणे व यशस्वीरीत्या सांभाळली. या मासिकातून त्यांनी विविध विषयांवर विस्तृत आणि मूलगामी लेखन नियमितपणे केले. त्यांतील निवडक लेखांचा संग्रह ‘थ्रू ह्युमॅनिस्ट आईज्’ १९९४मध्ये प्रसिद्ध झाला. १९९७मध्ये न्या.तारकुंडे वकिलीच्या व्यवसायातून निवृत्त झाले, परंतु त्यांचे लेखन आणि इतर विविध स्वरूपाचे कार्य शेवटपर्यंत चालूच होते.

              न्या.तारकुंडे यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९७८मध्ये ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अ‍ॅन्ड एथिकल युनियन’ या संस्थेने त्यांना ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अ‍ॅवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव केला.

              १९८४मध्ये अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ ह्युमॅनिझम’ या संस्थेने त्यांना ‘ह्युमॅनिस्ट लॉरिएट’ हा किताब किंवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला.

              १९९९मध्ये न्या.तारकुंडे यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘व्ही. एम. तारकुंडे ९० : अ रेस्टलेस क्रुसेडर फॉर ह्युमन फ्रीडमस्’ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्या पहिल्या भागात देशभरातील अनेक नामवंंत मंडळींचे न्या.तारकुंडे यांचा गुणगौरव करणारे लेख समाविष्ट आहेत, तर दुसर्‍या भागात न्या.तारकुंडे यांचे विविध महत्त्वाच्या विषयांवरील निवडक लेख आहेत.

- शरच्चंद्र पानसे

तारकुंडे, विठ्ठल महादेव