Skip to main content
x

तीरमारे, शिवराम कृष्णाजी

     शिवराम कृष्णाजी उर्फ अण्णासाहेब तीरमारे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील दुधोंडी या गावी झाला. या गावात शाळा नव्हती. त्यामुळे शिवरामांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी आबा तायप्पा गुरुजींची नेमणूक केली. पुढे आबा तायप्पा दुधोंडी सोडून गेल्यानंतर शिवरामांना भिलवडी गावातील शाळेत प्रवेश मिळाला. त्यावेळी मातंग समाजातील मुलांना शाळेच्या बाहेर वळचणीखाली बसावे लागे.

वर्गात शिकविलेले बाहेरून ऐकून, पाठ करून, फळ्यावर दिसेल ते लिहून तीरमारे यांनी पहिलीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांच्यामुळे इतर ९/१० मुलेही शाळेत येऊ लागली. त्यांची बुद्धी तल्लख होती. इयत्ता चौथीपासून विद्याखात्याची दरमहा दोन रुपयांची शिष्यवृत्ती त्यांना मिळू लागली.

दुधोंडीच्या शाळेत चार विद्यार्थी होते. १९१४ मध्ये चौघे जण व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेसाठी सातार्‍यास गेले. चौघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. शिवराम तीरमारे हे ही परीक्षा उत्तीर्ण झालेले दलित समाजातील पहिले विद्यार्थी होते त्यामुळे सांगलीच्या राजेसाहेबांनी त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या पुण्यातील अहिल्याश्रमात ठेवले. पण घरच्यांचा विरोध असल्याने गुरुजी एकच वर्ष तेथे राहिले. १९१५ मध्ये पुण्याच्या प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये ते दाखल झाले व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पण त्यांच्या भावाचे निधन झाल्याने दुसरे वर्ष पूर्ण करता आले नाही. सांगलीच्या विकासखात्याने त्यांना शाळा क्रमांक चारमध्ये शिक्षकाची नोकरी दिली. तीरमारे गुरुजींचे अध्यापनाचे काम सुरू झाले.

त्या वेळी शाळेत चारच विद्यार्थी होते. शिकवण्याबरोबरच मुलांबरोबर कुस्ती, जोर, बैठका, हुतूतू, लंगडी ते खेळत. मुले शाळेत रमू लागली. विद्यार्थ्यांची संख्या चारवरून पन्नास-साठवर गेली. शिक्षकांचा मुक्काम रात्री शाळेतच असल्याने तरुण मुले जमू लागली. त्यांनाही गुरुजी शिकवू लागले. निधी जमवून सबलापूरच्या शाळेतील मुलांना, शिक्षकांना बोलावून दसर्‍याच्या दिवशी खेळांच्या स्पर्धा गुरुजी घेऊ लागले.

एका सभेतील गुरुजींनी केलेले भाषण ऐकून छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात मामलेदाराची नोकरी त्यांना देऊ केली. पण नम्रपणे गुरुजींनी ती नाकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. पुढे डॉ. आंबेडकर सांगलीत आले असता विचारविनिमय झाला. त्यातूनच ‘बहिष्कृत प्रसारक मंडळा’ची स्थापना झाली. २५बाय१२ ची कुडामेढीची झोपडी करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय मंडळाने केली. १९३८ मध्ये सध्याच्या संस्थेच्या जागेवर वसतिगृह बांधण्याचा निर्णय झाला. १९४२ मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली व जगद्गुरुंच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाने १९४८ मध्ये मान्यता दिली.

याच वर्षी तीरमारे गुरुजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यास वाहून घेतले. वसतिगृहासाठी सरकारी जमीन भुई भाड्याने घेतली, स्वकष्टांनी तिचे रूप बदलले व वसतिगृह स्वावलंबी केले. या शेतीतून ज्वारी, गहू, तांदूळ, ऊस अशी पिके घेतली. मुलांना अन्न मिळवून देण्याचा गुरुजींचा हेतू सफल झाला. पुढच्या काळात इमारतीचा विस्तारही गुरुजींनी केला.

सांगलीतील नाट्यगृहात होणार्‍या नाटकांसाठी तिकिटे काढून मागासवर्गीयांना प्रेक्षक म्हणून प्रवेश त्यांनी मिळवून दिला. त्यांना मतदानाचा हक्कही गुरुजींनी मिळवून दिला. या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जसे गुरुजींनी प्रयत्न केले तसेच त्यांना हक्कही मिळवून दिले. प्लेगच्या साथीत समाजातील लोकांना लस घ्यायला लावली. १९५० मध्ये झालेल्या कायद्यानुसार हरिजनांना घरे मिळावीत म्हणून संस्थेची नोंदणी केली. सतत चौदा वर्षांच्या गुरुजींच्या कष्टांमुळे त्यांच्या समाजातील लोकांना घरे मिळाली, समाजमंदिर बांधून मिळाले. शिवराम कृष्णाजी तीरमारे गुरुजींनी आयुष्यभर संघर्ष करीत नि:स्वार्थ समाजसेवेचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला.

- विजय बक्षी

तीरमारे, शिवराम कृष्णाजी