Skip to main content
x

त्रिंदाद, अँजेला अँटोनिओ

.एक्स. त्रिंदाद

चित्रकार

              . एक्स. त्रिंदाद हे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक समर्थ व्यक्तिचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या चित्रशैलीतील प्रकाशयोजना, रंगसंगती व गूढभाव यामुळे त्यांना ‘रेंब्रां ऑफ द ईस्ट’ असे सन्मानाने म्हटले जाई. व्यक्तिचित्रणासोबतच त्यांनी निसर्गचित्रणातही अत्यंत दर्जेदार चित्रनिर्मिती केली.

              अ‍ॅन्टोनिओ झेविएर त्रिंदाद हे मूळचे गोव्यातले. सारस्वत हिंदू असणार्‍या या कुटुंबाच्या पूर्वजांनी पोर्तुगीज राजवटीत ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला. त्यांच्या कुटुंबाचे गोव्यातील चर्चशी संबंध होते व ते रोमन कॅथलिक धर्म अत्यंत निष्ठापूर्वक पाळत. त्रिंदाद यांच्या वडिलांनी ख्रिश्‍चन धर्मगुरू होण्याचे ठरविले होते. परंतु अचानक त्या शिक्षणाच्या अखेरच्या वर्षी त्यांनी सेमीनरी सोडून गोवा सरकारच्या कस्टम खात्यात नोकरी स्वीकारली. पुढे त्यांचा विवाह झाला व गोव्यातील सांगेम या गावात त्रिंदाद यांचा जन्म झाला. तीन वर्षांनंतर हे कुटुंब आपल्या मूळ गावी अस्नोडा येथे परतले. त्यामुळे गोव्यातल्या बार्देस भागातील अस्नोडा या गावात त्यांचे बालपण गेले. त्रिंदाद यांना पोर्तुगीज आणि लॅटिनसोबतच अन्य विषय शिकवण्यासाठी वडिलांनी घरीच खास शिक्षकाची नेमणूक केली होती. परंतु १८८५ मध्ये वडील झेविएर यांचे निधन झाले व या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.

              वडिलांच्या निधनानंतर स्वतंत्र शिक्षकाकडून घरी येऊन शिक्षण दिले जाण्यात खंड पडल्यामुळे इंग्रजी आणि अन्य विषय शिकण्यासाठी त्रिंदाद यांना सावंतवाडीला काही काळ राहावे लागले. शाळेत शिकताना सगळ्या विषयांच्या अभ्यासाबरोबर चित्रकलेची विशेष आवड वाढू लागली. चित्रकलेत त्यांना असलेली गती पाहून त्यांना मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्रिंदाद मुंबईत आले व धोबीतलाव भागात गोव्यातील संगीतक्षेत्रातील तरुण कलावंतांसोबत राहून त्यांनी घरासमोरच असणार्‍या इंग्रजी हायस्कूलमध्ये उरलेले शिक्षण पूर्ण केले. या काळात एका जर्मन जेसुईट धर्मगुरूंच्या ते संपर्कात आले व त्याच्या मदतीने त्रिंदाद यांनी १८८७ च्या सुमारास सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या काळात त्या जर्मन धर्मगुरूसोबत राहून त्यांनी प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला व अर्थार्जनासाठी धोबीतलाव येथील शाळेत ते चित्रकला शिकवू

              लागले. हे करीत असतानाच त्यांचे जे.जे. स्कूलमधील शिक्षण सुरूच होते. शिक्षणाच्या काळात त्यांना अनेक पारितोषिके, शिष्यवृत्त्या व १८९२ मध्ये प्रतिष्ठेचे मेयो मेडल मिळाले. त्यांनी मिळविलेले प्रावीण्य व दर्जा बघून १८९८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला विभागात शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

              यानंतर १९०१ मध्ये ते फ्लोरेंटिनाशी विवाहबद्ध झाले. त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सफल होते. १९०२ ते १९२२ या काळात त्यांना आठ अपत्ये झाली. सुरुवातीच्या काळात हे कुटुंब धोबीतलाव भागात वास्तव्यास होते. एक उत्तम शिक्षक व दर्जेदार चित्रनिर्मिती करणारा तरुण कलावंत म्हणून त्यांची ख्याती होऊ लागली. या पार्श्‍वभूमीवर पेंटिंग विभागात  त्यांची पदोन्नती न करता १९०४ मध्ये कला व कारागिरीचे शिक्षण देणार्‍या जे.जे. मधील त्यावेळी रे आर्ट वर्कशॉपमध्ये ड्रॉईंग टिचर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. याबाबत पेंटिंग विभागातील एक प्रतिस्पर्धी दूर करण्यात आला अशी त्यावेळी चर्चा होती. या अनपेक्षित नेमणुकीमुळे त्यांना फारसा आनंद झाला नाही. या दरम्यान पसरू लागलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांनी मुंबईपासून दूर वास्तव्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला व १९०७ मध्ये त्यांनी आपले वास्तव्य माहीम येथे हलविले. नारळी-पोफळीच्या झाडांनी भरलेले व भरपूर मोकळी जागा आणि बंदर असलेले त्या काळचे माहीम त्यांना अत्यंत आवडले. माहीमहून ते रेल्वेने जे.जे. स्कूलमध्ये जात असत व घरापासून स्टेशनपर्यंत जाण्यासाठी घोडागाडीचा वापर करीत. या विरोधी परिस्थितीतही त्यांनी शांतपणे आपली कलासाधना सुरू ठेवली. यासोबतच कारागिरीची कामे चालणार्‍या या विभागात प्रामाणिकपणे व कसोशीने विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतली. लाकडावरील व धातूवरील नक्षीकाम, भांडी, देवदेवतांच्या लाकडी तसेच धातूच्या आणि दगडाच्या मूर्ती, वस्त्रकला, सिरॅमिक अशा अनेक कारागिरीच्या वस्तू तयार करताना त्यातील कलात्मकता त्यांनी वाढविली. परिणामी या विभागातील अनेक कलावस्तू तत्कालीन ‘ब्रिटिश एम्पायर एक्झीबिशन’मध्ये परदेशात प्रदर्शित झाल्या व या कलावस्तूंची वाहवा झाली. परंतु या सर्व काळात त्यांच्यातील चित्रकार अस्वस्थ होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतून त्यांच्या सुशील व व्यवहारदक्ष पत्नीने त्यांना बाहेर काढले व चित्रनिर्मितीकडे त्यांचे मन वळविले.

              १९२१ मध्ये रे आर्ट वर्कशॉपचे प्रमुख म्हणून त्रिंदाद यांची नियुक्ती झाली. त्यांचा स्वभाव अधिक अंतर्मुख होत गेला. एका स्वतंत्र विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यावर शासकीय काम वाढले. तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांनी या कलावंताची ही अडचण जाणली व अशा कामासाठी वेगळा कारकून नेमला. त्यामुळे शासकीय कामातील कटकटींपासून त्रिंदाद यांची सुटका झाली. त्रिंदाद यांनी रे आर्ट वर्कशॉपमधील आपल्या कार्यालयाचे दोन भाग केले व त्यातील एका भागात छोटासा स्टुडिओ करून त्यात ते आपली चित्रे रंगवू लागले. त्रिंदाद यांची त्या काळातील गाजलेली चित्रे त्यांच्या कार्यालयातील याच स्टुडिओत रंगवली गेली. विशेष म्हणजे आपण एक उत्तम चित्रकार असूनही चित्रकला विभागात काम करता येत नसल्याची कुरकुर त्यांनी कधीही केली नाही. परिणामी जे.जे. मधील पेंटिंग विभागातील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे जाऊ लागले. आर्थिकदृष्ट्याही त्यांचा फायदाच झाला. ड्रॉइंग मास्तर म्हणून त्यांना पन्नास रुपये मिळत त्याऐवजी विभागप्रमुख म्हणून त्यांना त्या काळी दीडशे रुपये वेतन मिळू लागले.

              सुरुवातीच्या काळात त्रिंदाद यांना हैद्राबाद येथील नबाबांची व्यक्तिचित्रे रंगविण्याचे व्यावसायिक काम मिळाले. त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात मात्र त्यांची परिस्थिती बिकट झाली. मोठे कुटुंब, थाटाची राहाणी यामुळे त्यांनी या काळातील आपली चित्रे अत्युच्च किमतीला व प्रसंगी अन्नधान्य, कपडे अशा अत्यावश्यक गोष्टींसाठी विकली. वास्तव्यासाठी माहीम येथे स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींची अनेक तैलचित्रे रंगविली. सुरुवातीला व्यक्तिचित्र-णासाठी त्यांची पत्नी मॉडेल म्हणून बसत असे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मॉडेल म्हणून बसू लागल्या. त्रिंदाद यांनी घरातल्या प्रत्येकाला समोर बसवून त्यांची अप्रतिम चित्रे रंगविली. त्रिंदाद मास्तरांनी त्यांच्या मुलींना समोर बसवून त्यांचीही छान चित्रे काढली. जवळचे मित्र एवढेच नाही तर शेजारी-पाजारीही त्यांच्या चित्रांमध्ये नकळतपणे आले. साधुंना आणि फकिरांनासुद्धा त्यांच्या चित्रांमध्ये स्थान मिळाले.

              त्रिंदाद यांनी स्वत:च्याच पत्नीची अनेक चित्रे काढली. त्यातील तैलरंगातल्या ‘फ्लोरा’ या त्यांच्या कलाकृतीला १९२० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे मानाचे सुवर्णपदक मिळाले. हे चित्र अनेकांना विलक्षण आवडले. त्यांची चित्रे समाजाच्या सर्वच थरात मोठ्या कौतुकानं पाहिली गेली.

‘न्यू इयर्स साँग’ हे त्रिंदाद मास्तरांनी स्वत:च्या मुलीला समोर बसवून काढलेले चित्र त्यांना स्वत:ला खूप आवडायचे. महाराष्ट्रीय स्त्रीच्या चित्रणात तिच्या शालीनतेचे दर्शन त्रिंदाद मोठ्या कौशल्याने घडवीत. महाराष्ट्रीय स्त्रीचे चित्रण करताना तिच्या अंगावरच्या साडीला असलेला मराठमोेळा काठ आणि पदर यांचे लोभसवाणे दर्शन घडवण्यात त्यांचा हातखंडा होता. जे.जे. स्कूलच्या संग्रहातील एका चित्रात मराठमोळी वेषभूषा परिधान केलेली आणि घड्यावर हात ठेवून बसलेली स्त्री दिसत आहे. अशी कलाकृती हा

              त्रिंदाद मास्तरांच्या तैलरंगातल्या चित्रणाचा एक सर्वोत्तम नमुना ठरावा.

              व्यक्तिचित्रणाचे सखोल ज्ञान त्यांना होते. त्याचबरोबर विशुद्ध रंग, रंगछटांचा तजेलाही त्यांच्या चित्रांत दिसतो. या सगळ्यांच्या बरोबर त्रिंदाद मास्तरांच्या तैलचित्रांमध्ये त्रिमिती या अर्थाने खोलीचा आभास होतो. त्याचप्रमाणे चित्रातल्या तपशीलाची रचना अत्यंत वेधक पद्धतीने केलेली दिसते. युरोपियन व विशेषत: डच चित्रांमधील भासमान सत्यता किंवा वास्तवदर्शनाचे तंत्र त्रिंदाद मास्तरांनी अल्पावधीत आत्मसात केले. तैलरंग हे माध्यम पाश्‍चात्यांकडून येथे आले. त्रिंदादांनी ते उत्तमरित्या आत्मसात करून त्यावर प्रभुत्व मिळविले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे तैलरंगात व्यक्तिचित्रे काढताना त्यांनी भारतीयांच्या गव्हाळ, सावळ्या अंगकांतीला जुळणार्‍या रंगछटा अप्रतिमतेने वठविल्या. त्यामुळे त्याचा एक वेगळाच प्रभाव पडत असे.

              आपल्या चित्रात असलेला प्रकाशाचा स्रोत विलक्षण प्रभावी ठरेल याचीही ते नकळत काळजी घेत. त्यांच्या या गुणांमुळे जाणकार पाश्‍चिमात्य कलासमीक्षकांकडून अ‍ॅन्टोनिओ झेविएर त्रिंदाद या बुजुर्ग भारतीय चित्रकाराचा मोठ्या कौतुकाने ‘रेम्ब्रां ऑफ द ईस्ट’ असा उल्लेख केला जातो.

              त्रिंदाद मास्तर अन्य खाजगी कामेही करीत. परंतु ही कामे वेगळ्या स्वरूपाची असत. ब्रिटिश राजवटीत संस्थानिक व राजे-रजवाडे पाश्‍चिमात्य कलावंतांना आपली तैलचित्रे रंगविण्यासाठी भरमसाठ मोबदला देऊन आमंत्रित करीत. पण या पाश्‍चिमात्त्य कलावंतांना  ‘भारतीय वर्ण’ मिळवणे कठीण होत असे. एतद्देशीय माणसाचा काळा वर्ण रंगविण्यात त्रिंदादांचा हातखंडा होता. त्यांची ही कीर्ती पाश्‍चिमात्त्य कलावंतांपर्यंत पोहचलेली असे. त्यामुळे या कामासाठी त्रिंदादांना आमंत्रणे येत व ते या संस्थानिकांचा वर्ण भारतीय करण्याचे कार्य पार पाडीत!

              ए.एक्स. त्रिंदाद यांनी संस्थानिकांचा भारतीय वर्ण रंगवून भरपूर पैसे मिळवले. असे पैसे मिळवून आल्यानंतरची रात्र ही त्यांच्या घरात संगीत, आनंद आणि मद्याची असे. स्वत: त्रिंदाद यांंना उत्तम आवाजाची देणगी होती व ते गिटार घेऊन गात असत. उत्तम गिटारवादक म्हणून मित्रमंडळीत ते प्रसिद्ध होते. त्यांची पत्नी फ्लॉरेंटिना व्हायोलिन वाजवत असे. अशी कामे सहजतेने करणार्‍या या महान चित्रकाराला भारतीय संस्थानिकांनी सन्मानाने क्वचितच आमंत्रित केले. आर्टस्कूलपासून जवळच असलेल्या राजा दीनदयाळ यांच्या स्टुडिओमध्ये जाऊनही मास्तरांनी अनेक चित्रे काढली. पण ती त्यांची नाममुद्रा घेऊन प्रसिद्ध झाली नाहीत.

              सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून सुपरिटेंन्डेन्ट या पदावरून त्रिंदाद वयाच्या ५८ व्या वर्षी म्हणजे १९२७ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना जे.जे. स्कूलमध्ये अभ्यागत व्याख्याता म्हणून आवर्जून आमंत्रित केले जाई. या सोबतच त्यांची कलानिर्मितीही सुरू असे, परंतु १९३० नंतर मधुमेहाचा आजार वाढल्यामुळे त्यांनी अभ्यागत व्याख्याता म्हणून जाणे बंद केले. आर्टस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कलानिर्मिताला बहरच आला. याच काळात त्यांनी तैलरंगांच्या बरोबरीने जलरंगांमध्येही चित्रनिर्मिती केली. १९३० च्या सुमारास त्यांनी नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या काठालगत दिसणारी अनेक दृश्ये तैलरंगात व जलरंगात चित्रित केली. माहीमच्या किल्ल्याची आणि माहीमच्या खाडीची अनेक चित्रे त्यांनी काढली. चित्रातला तपशील आणि चित्राचा एकूणच मूड या अर्थाने गोव्याचा संदर्भ अपरिहार्यपणे त्यांच्या चित्रांमध्ये येतो. चित्राचा आकार लहान आहे की मोठा, याचा त्यांच्यावर कधीच परिणाम होत नसे. तपशीलात चित्रण करण्याचे ते टाळत असत. असे त्रिंदाद यांचे विद्यार्थी माधवराव बागल यांनी एका लेखात नोंदविले आहे. बगल लिहितात, ‘त्रिंदादांना समकालीन असलेल्या धुरंधरांची कल्पकता व प्रतिभा त्यांच्या चित्रात दिसत नसे. आगासकरांचे ‘बोल्ड ब्रशिंगही’ त्यांच्या चित्रात नसे. परंतु छायाप्रकाशाचा मनोरम खेळ करीत त्यांची चित्रे तयार होत. त्यातील मोहकता व सौंदर्य आजही खिळवून ठेवते.’ अशा प्रकारची चित्रे रंगविण्यातच त्रिंदाद मास्तर आयुष्यभर रमले. १९०५ ते १९२० या काळातील बंगाल स्कूलच्या भारतीयत्व जपणार्‍या कलाप्रवाहाचा व १९१९ ते १९३६ या काळात मुंबईत अस्तित्वात आलेल्या बॉम्बे रिव्हायवलीस्ट स्कूल या भारतीयत्व जपणार्‍या कला चळवळीचे त्यांना कधीही आकर्षण वाटले नाही.

              त्रिंदाद यांच्या चित्र काढण्याच्या पद्धतीबद्दल आपल्या ‘रापण’ या पुस्तकात प्रा. धोंड लिहितात, ‘पेंटींग करीत असताना त्रिंदाद यांना बघणे हे दृश्य विलोभनीय असे. त्यांचे निरुंद कपाळ, उलटेे फिरवून मागे गुंडाळ्या झालेले काळे करडे केस, तशाच भरघोस दाढी-मिश्या आणि तोंडातला पेटता चिरूट... जणू काही विलायती गोष्टीतला चित्रकारच त्यांच्या रूपाने आमच्यासमोर साकार होत असे. ते कामात जसजसे रंगून जात, तसतसा चिरूटातून धुराचा लोट वाढत जाई. सुरूवात केल्यापासून चित्र पूर्ण होईपर्यंत ते अत्यंत वेगाने काम करीत. चारकोलने कधीच रेखाटन करीत नसत. सरळ ब्रशनेच त्या आकृतीचा मुख्य आराखडा थोडक्यात रेखांकित करत. ब्रशचे फटकारे एकमेकांमधे बेमालूम मिसळत. चित्र रंगवताना ते त्या चित्राचा समग्र विचार करत. मुख्य आकृती, वेषभूषा, पार्श्‍वभूमी या सर्वच भागावर त्यांचे एकाच वेळी रंगलेपन सुरू असे. तत्कालीन बहुसंख्य कलावंतांमध्ये ही दृष्टी क्वचितच दिसे.

              सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पत्नीने गुपचूप वाचवलेल्या पैशांतून त्यांचे स्वत:चे घर झाले. माहीमला कॅसाबियांका नावाच्या या स्वत:च्या मालकीच्या दुमजली घरात त्यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. आयुष्यात उदरनिर्वाहासाठी स्वत: काढलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे विकण्याची वेळ त्यांच्यावर आली, पण त्याच वेळी जेव्हा हातात पैसा आला, तेव्हा घोडागाडीतून फिरण्याचा शौकही त्यांनी मोठ्या आनंदाने केला. अगदी अखेरच्या दिवसात - म्हणजे मधुमेहाचा आजार बळावल्याने १९३३ मध्ये त्यांचा दुसराही पाय कापावा लागला. त्यानंतर याही परिस्थितीत ते हॉस्पिटलमध्ये अंथरूणावर असतानासुद्धा चित्र काढतच राहिले. अंथरुणावर बसूनच त्यांनी येशूचे डोक्यावर काटेरी मुकुट असलेले चित्र काढणे सुरू ठेवले होते. ‘एक्को होमो’ (एलि कि) हे त्रिंदाद मास्तरांनी काढलेले अखेरचे चित्र ठरले. येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर काटेरी मुकुट असलेले हे चित्र, १५ मार्च १९३५ रोजी त्रिंदाद मास्तरांचे निधन झाल्याने अखेर अपुरेच राहिले.

              त्यांच्या काही कलाकृती आज छत्रपती शिवाजी म्युझियम (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), औंधचे भवानी वस्तुसंग्रहालय, कलासंचालनालय, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (नवी दिल्ली) अशा ठिकाणी पाहायला मिळतात. या कलाकाराची आज जी काही चित्रे शिल्लक आहेत, ती सगळी नीट डागडुजी करून गोव्यात पणजी येथे कायमस्वरूपी संग्रहालय म्हणून जतन करण्याची योजना त्रिंदाद यांच्या वारसांनी १९९६ मध्ये आखली होती. तसे खरोखरच झाले असते तर त्रिंदाद मास्तरांच्या कलाकृती गोव्यातच कायमस्वरूपी पाहायला मिळाल्या असत्या. याच्याही आधी बर्‍याच वर्षांपूर्वी, त्रिंदाद यांच्या उपलब्ध असलेल्या सगळ्याच कलाकृती माहिम येथील ‘कॅसाबियांका’ या घराच्याच एका भागात कायमस्वरूपी संग्रहालय करून ठेवल्या जाव्यात अशी अँजेला आणि इस्टर या त्रिंदाद मास्तरांच्या दोन्ही मुलींची इच्छा होती. पण त्यांना काही ती पूर्ण करता आली नाही. १९८४ मध्ये तेव्हाचे कला संचालक प्रा. बाबूराव सडवेलकर यांच्या प्रयत्नांतून मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत त्रिंदाद यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्यानंतर या कलाकृतींची अमेरिकेमध्ये डागडुजी केल्यानंतर मुळातच तजेलदार असलेल्या चित्रांना अधिकच ताजेपणा आला. १९९६ मध्ये जॉर्जिया म्युझियम ऑफ आर्ट व जॉर्जिया युनिव्हर्सिटीतर्फे ‘अँटोनिओ झेवीएर त्रिंदाद: अ‍ॅन इंडियन पेंटर फ्रॉम पोर्तुगीज गोवा’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्रिंदाद यांच्या कलाकृती युरोपातील रसिकांना पाहता याव्यात यादृष्टीने ९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २००५ या काळात लिस्बन येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. 

              - श्रीराम खाडिलकर

त्रिंदाद, अँजेला अँटोनिओ