Skip to main content
x

तुळजापूरकर, विद्यारण्य दत्तात्रेय

    र्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले श्री.विद्यारण्य दत्तात्रेय तुळजापूरकर यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे घराणे मूळचे मराठवाड्यातले. त्यांचे वडील दत्तात्रेय (दत्तो) आप्पाजी तुळजापूरकर आधी हैदराबाद संस्थानात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात वकील होते. ‘माझे रामायण’ ही प्रदीर्घ आणि संस्थानी राजवटीच्या काळाचे चित्रण करणारी कादंबरी त्यांनी लिहिली होती. संस्थानातून त्यांना हद्दपार करण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर ते मुंबईत आले. विद्यारण्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयांमध्ये आणि कायद्याचे शिक्षण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये झाले. एलएल.बी. पदवी मिळविल्यानंतर १ डिसेंबर १९४३ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करू लागले. त्याचबरोबर ते अ‍ॅटर्नी-अ‍ॅट-लॉ आणि सॉलिसिटरही होते. सुमारे १४ वर्षे त्यांनी उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही शाखांत दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारांचे खटले लढविले.

     जुलै १९५६मध्ये तुळजापूरकर यांची बृहन्मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. एप्रिल १९६२मध्ये ते त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. डिसेंबर १९६३मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि नंतर सप्टेंबर १९६६मध्ये कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर १९७३मध्ये आणि पुन्हा डिसेंबर १९७६ ते एप्रिल १९७७पर्यंत त्यांनी उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. ३०सप्टेंबर१९७७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ८ मार्च १९८६ रोजी ते त्या पदावरून निवृत्त झाले.

      जून १९७५ ते जानेवारी १९७७ या १९ महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची अनेक प्रकारे पायमल्ली झाली. हजारो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. वृत्तपत्रांवर ‘सेन्सॉरशिप’ लादण्यात आली. सभा घेण्यास बंदी करण्यात आली. मुंबईत वकिलांच्या एका सभेवर बंदी घालण्यात आली, तर पुण्याच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे अकरा अंक जप्त करण्यात येऊन ‘साधना’ मुद्रणालय बंद करण्यात आले. या दडपशाहीविरुद्ध दाद मागण्यासाठी अनुक्रमे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एन.पी. नाथवानी आणि साधना साप्ताहिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केले. यापैकी पहिला खटला सरन्यायाधीश कांटावाला आणि न्या. तुळजापूरकर यांच्यासमोर चालला, तर दुसरा न्या. तुळजापूरकर आणि न्या. गाडगीळ यांच्यासमोर. या दोन्ही प्रकरणांत न्यायालयाने अर्जदारांच्या बाजूने आणि सरकारच्या विरुद्ध निर्णय दिले. पहिल्यात दोन स्वतंत्र निकालपत्रे होती, तर दुसऱ्यामध्ये एकमताचे निकालपत्र न्या.तुळजापूरकरांचे होते. या दोन खटल्यांमधील निकालांमुळे न्या.तुळजापूरकर यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

       न्या.तुळजापूरकर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा बॉम्बे लॉ रिपोर्टरने ‘द गार्डियन ऑफ सिव्हिल लिबर्टी ऑफ द सिटिझन्स ऑफ इंडिया’ या शब्दात त्यांचे वर्णन केले आणि ‘तुळजापूरकर विल रेज द प्रेस्टीज अ‍ॅण्ड डिग्निटी ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ही विल बी इट्स् सोर्स ऑफ लाइट’ या शब्दांत त्यांचा गौरव केला. सर्वोच्च न्यायालयातील आपल्या साडेआठ वर्षांच्या कारकिर्दीत न्या.तुळजापूरकर यांनी हा गौरव पूर्णपणे सार्थ ठरविला. अत्यंत तत्त्वनिष्ठ, नि:स्पृह आणि शिस्तप्रिय न्यायाधीश म्हणून न्या.तुळजापूरकर यांचा लौकिक होता.  त्यांची तत्त्वनिष्ठा व निर्भीडपणा केवळ निकालपत्रांपुरती नसे. १६जानेवारी१९७७ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश असताना नागपूर येथे जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘आवर ज्युडिशिअल सिस्टिम’ या विषयावर त्यांनी केलेले विचारपरिप्लृत भाषण त्यांच्या निकालपत्रांइतकेच निर्भीड आणि स्पष्टोक्तीपूर्ण होते. सर्वोच्च न्यायालयामधून निवृत्त झाल्यावर न्या.तुळजापूरकर यांनी कोणतेही सरकारी पद किंवा काम स्वीकारले नाही.

       भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील एक सचोटीचे व निर्भीड न्यायाधीश म्हणून न्या.तुळजापूरकर यांचे नाव कायम घेतले जाईल, याबद्दल संशय नाही.

- शरच्चंद्र पानसे

तुळजापूरकर, विद्यारण्य दत्तात्रेय