Skip to main content
x

ठाकरे, बाळ केशव

बाळासाहेब ठाकरे

                व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ ते ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ असा बाळ केशव ठाकरे या व्यक्तिमत्त्वाचा विसाव्या शतकातील प्रवास आहे. वडील केशवराव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक बंडखोर समाजसुधारक व पत्रकार होते. ते स्वत: एक उत्तम चित्रकारही होते.

               स्पष्ट, नेमके राजकीय भाष्य, कुशाग्र विनोदबुद्धी, मराठी भाषेशी लीलया खेळण्याची हातोटी, हजरजबाबी स्वभाव, कुंचल्याच्या साहाय्याने केलेले लवचीक अन् जोरकस चित्रांकन आणि या सर्वांवर कडी करणारी त्यांची अर्कचित्रांमधील (कॅरिकेचरिंग) हुकमत ही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेची शक्तिस्थाने मानता येतील. याच शक्तिस्थानांमुळे त्यांनी मराठी माणसाच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले.

               त्यांना टाइम्स ऑफ इंडियातील बॅनबॅरींची चित्रे रोज आवडीने न्याहाळताना पाहून प्रबोधनकारांनी मुलातील चित्रकलेचे सुप्त गुण हेरले व त्या पद्धतीने रोज चित्रे रेखाटायला त्यांना सांगितले. पुढे महाराष्ट्रातील त्या वेळचे प्रभावी चित्रकार दीनानाथ दलाल यांची व्यंगचित्रे ठाकरे यांच्या पाहण्यात आली व आपणही व्यंगचित्रे काढावी असे त्यांना वाटू लागले.

अनंत काणेकर व मो.ग.रांगणेकर १९४५ च्या सुमारास ‘नवशक्ती’चे काम पाहत असत. त्यात किशोरवयीन ठाकरे यांची रेखाटने प्रसिद्ध होऊ लागली.

               ठाकरे यांनी १९४७ साली ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी सुरू केली. घरात प्रबोधनकारांमुळे राजकीय-सामाजिक प्रश्नांची चर्चा सतत होत असल्याने व अनेक बड्या राजकीय असामींचा राबता असल्याने ठाकरे यांना राजकीय दृष्टी प्राप्त व्हायला मदत झाली. त्यातच विनोदबुद्धी व हजरजबाबीपणा हे उपजत गुण असल्याने व चित्रकलेचे धडे लहानपणापासून मिळाल्याने ठाकरे राजकीय व्यंगचित्रकार झाले.

               ‘फ्री प्रेस’मध्ये त्यांची आर.के. लक्ष्मण यांच्याशी ओळख व मैत्री झाली, ती शेवटपर्यंत कायम राहिली. पण ‘फ्री प्रेस’मध्ये त्यांची खरी ओळख ब्रिटिश वृत्तपत्रांतून येणाऱ्या ‘डेव्हिड लो’ यांच्या व्यंगचित्रांशी झाली. यांनाच त्यांनी गुरू मानले.

               व्यंगचित्रकाराच्या स्वातंत्र्यावरून व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यावर त्यांनी ‘फ्री प्रेस’चा राजीनामा दिला. त्यानंतर आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’मधून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कुंचल्याची तलवारबाजी दाखवायला सुरुवात केली. ‘मावळा’ या नावाने त्यांनी अनेक व्यंगचित्रे ‘नवयुग’ व ‘मराठा’साठी काढली. तसेच ‘केसरी’साठीही त्यांनी भरपूर व्यंगचित्रे काढली.

               १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये, बाळासाहेब ठाकरे यांनी बंधू श्रीकांत यांच्यासह ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मुखपृष्ठावर राजकीय व्यंगचित्र, मधल्या पानांवर राजकीय, सामाजिक खिल्ली उडवणारी ‘रविवारची जत्रा’ ही व्यंगचित्रमालिका व इतर पानांवर हास्यचित्रे, व्यंगचित्रांसह खुशखुशीत मजकूर असे या अंकाचे स्वरूप होते. ‘मार्मिक’ने बघताबघता मराठी वाचकांमध्ये चांगलेच मूळ धरले व ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा चाहतावर्ग सर्वसामान्य मराठी जनतेमध्येच नव्हे, तर राजकीय नेत्यांमध्येही वाढू लागला. पंचवीस वर्षांहूनही अधिक काळ बाळासाहेब हे साप्ताहिक आपल्या व्यंगचित्रांनी सजवत राहिले.

               सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखणे हा ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू मानावा लागेल. त्यांना पुढे राजकारणात यशस्वी होताना हाच पैलू उपयोगी पडला. या भावनांना स्वत:च्या शब्द आणि चित्रसामर्थ्याने विनोदाच्या सर्व शक्यता अजमावून पाहत. ते वेगळ्याच पातळीवर घेऊन जात.

               राजकीय व्यंगचित्रे : उत्तम विनोदी कल्पना, ठोस राजकीय भाष्य, चित्राची रचना, उत्तम देहबोली दाखवणारी पात्रांची व्यंगपूर्ण शरीररचना आणि विविध पात्रांचे नेमके भाव दाखवणारे अर्कचित्रण (कॅरिकेचरिंग) ही ठाकरे यांच्या राजकीय व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ : जवाहरलाल नेहरू थकल्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाला गोवर्धन पर्वताची उपमा देत ठाकरे यांनी नेहरू फक्त करंगळीने या पर्वताला स्पर्श करताहेत, मात्र त्यांचे इतर सहकारी आपापला आधार देऊन पर्वत उचलताहेत, असे विलक्षण बोलके चित्र काढले! थकलेल्या नेहरूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे आहेत, त्याचबरोबर सत्ता-संपादनाची घाई झालेले मोरारजी देसाईही मजेदारपणे रेखाटलेले आहेत.

               रविवारची जत्रा : ‘मार्मिक’च्या मधल्या दोन पानांत येणारी ही व्यंगचित्रमालिका. विविध सामाजिक-राजकीय विषय वेगळ्याच रंगाने, ढंगाने आणि अंगाने फुलवलेला विलक्षण व्यंगचित्रकला प्रकार. वेगळा आणि बहारदार! उदाहरणार्थ, एकदा राजकीय पक्षांची चिन्हे घेऊन त्यांनी ‘जत्रा’ सजवली. काँग्रेस आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात निवडणुकीसाठी वाटाघाटी ही या चित्राची पार्श्वभूमी. काँग्रेसचे त्या वेळचे चिन्ह होते गाय-वासरू. चित्राला नाव दिले आहे ‘सौदा’ आणि जमात-ए-इस्लामीवाला खाटिक हातात सुरा घेऊन गाय-वासराकडे बोट दाखवून इंदिराजींना विचारतोय, ‘‘किती मतांना विकाल?’’

               याच मालिकेत जनसंघाचे नेते नुसती पणती व वात घेऊन ‘तेलऽ तेलऽऽ’ असे ओरडताहेत, तर कम्युनिस्ट पक्षाची (निशाणी : विळा-हातोडा) ‘कामगारांचा गळा चिरणारा विळा’ अशी संभावना केलीय.

               कधी खाद्यपदार्थ, तर कधी पाळीव जंगली प्राणी, कधी फळे, भाज्या, कधी फटाके, तर कधी विविध सण यांसारख्या प्रतिमांचा वापर करून त्यांनी राजकीय भाष्य करणारी ‘जत्रा’ रेखाटली. ठाकरे यांनीही एक स्वत:चा ‘कॉमन मॅन’ रेखाटला. झुपकेदार मिशांचा हा सामान्य माणूस सामान्य माणसांच्या भावभावना घेऊन ‘जत्रे’त कोपऱ्यात भेटायचा. शब्दांवरचे ठाकरे यांचे प्रभुत्वही अचंबित करणारे आहे. मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, उपमा, उपहास, श्लेष, यमक यांचा उत्कृष्ट वापर करून त्यांनी व्यंगचित्रांची गुणवत्ता (खरे म्हणजे धार!) वाढविली.

               ‘कॅरिकेचरिंग’ अर्थातच ‘अर्कचित्रण’ जो राजकीय व्यंगचित्रकलेतील महत्त्वाचा भाग, हा ठाकर्‍यांचा सर्वांत मोठा गुण मानला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचे, कोणत्याही कोनातून कोणत्याही हावभावासह चित्र काढणे हा त्यांचा हातखंडा होता. ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकांसाठी राजकीय व्यंगचित्र असलेले बहुरंगी मुखपृष्ठ हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल.

               या सर्व गुणांमुळे बाळासाहेब ठाकरे हे सामान्य मराठी वाचकांचेच नव्हे, तर अनेक व्यंगचित्रकारांचेही लाडके व्यंगचित्रकार बनले. त्यांची चित्रे डोळ्यांसमोर ठेवून अनेक मराठी व्यंगचित्रकारांनी स्वत:ची कारकीर्द घडवली, यातच त्यांचे मोठेपण आहे.

               ‘मार्मिक’च्या निमित्ताने मराठी व्यंगचित्रकलेकडे बाळासाहेब वळले नसते, तर निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव दीर्घकाळ झळकले असते. कारण, इंग्रजीतून काम करत असताना ‘असाही शिंबून’ या जपानी व ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकन नियतकालिकांत त्यांची चित्रे प्रकाशित झाली होती. सर विन्स्टन चर्चिल यांच्या व्यंगचित्र चरित्रात भारतातून फक्त ठाकऱ्यांचेच व्यंगचित्र समाविष्ट केले गेले आहे.

               शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाल्यानंतर बत्यांच्या व्यंगचित्रांतून पक्षविषयक धोरण उमटणे स्वाभाविक होते. शिवसेनेचा पसारा वाढत गेल्यानंतर तो महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचा पक्ष बनला. राज्याच्या अनेक पालिकांतूनच नव्हे, तर विधानसभेवरही या पक्षाने राज्य केले. राजकीय व्यंगचित्रकाराने अशा रितीने राजकारणातही यशस्वी होण्याचे जगातील हे कदाचित एकमेव उदाहरण असावे.

               अशा रितीने यशस्वी कलाकार आणि यशस्वी राजकारणी असे लोकप्रिय (आणि वादग्रस्तही) व्यक्तिमत्त्व लाभलेल्या, जागतिक कीर्तीच्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्यावर दिनांक १८ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे सरकारी इतमामाने, प्रचंड प्रमाणात उपस्थित असलेल्या अभूतपूर्व जमसागराच्या साक्षीने अंतिम संस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव हे उत्कृष्ट छायाचित्रकार असून ते शिवसेनेचे कार्याध्यक्षही आहेत. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे हेही उत्कृष्ट व्यंगचित्रकार असून ते ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द ठामपणे साकारत आहेत.

- प्रशांत कुलकर्णी

ठाकरे, बाळ केशव